महत्त्वाच्या बाजार समित्या अद्याप ‘लॉक’च; शेतकरी त्रस्त

राज्यात कोरोनास्थिती उद्भवल्यानंतर बंद करण्यात आलेल्या पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर या महत्त्वाच्या बाजार समित्यांत अद्याप बंदच असल्याने फळे-भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
vegetable
vegetable

पुणे : राज्यात कोरोनास्थिती उद्भवल्यानंतर बंद करण्यात आलेल्या पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर या महत्त्वाच्या बाजार समित्यांत अद्याप बंदच असल्याने फळे-भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र-राज्य सरकारने याबाबत निर्णय जाहीर केल्यानंतरही स्पष्ट अशा हालचाली सुरू झालेल्या नाही. किमान पर्याय उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न होत नसल्याबद्दल शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. विविध विभागातील प्रशासकीय समन्वय न साधल्या जात असल्यामुळे नियोजनात अडथळे निर्माण होत असल्याचा सूर आहे.  राज्यात सध्या भाजीपाला-फळांचा हंगाम सुरू आहे. चांगल्या पाऊसमानामुळे यंदा उत्पादनही अधिक असतानाचा कोरोना स्थितीमुळे शेतकरी पुन्हा एकदा कोंडीत सापडला आहे. सर्व प्रकारचा फळभाज्या-भाजीपाल्यासह द्राक्ष, कलिंगड, खरबूज, आंबा, केळी, संत्रा, मोसंबी आदी फळे काढणी अवस्थतेत आहेत, तर काहींची काढणी सुरू होणार आहे. मात्र, महत्त्वाच्या बाजार समित्या बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर काही नुकसान होण्याच्या चिंतेत आहेत.  कोल्हापुरात भाजीपाला सौदे बंदच कोल्हापूर बाजारसमितीतील भाजीपाल्याचे सौदे सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.१६) बंदच राहिले. येथून पुढील काळात शुक्रवारपर्यंत गर्दी टाळण्यासाठी भाजीपाल्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय झाला होता. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भाजीपाल्याची आवक झाली नाही. कांदा-बटाटा व फळांचे सौदे नियमित झाल्याची माहिती बाजारसमितीचे सचिव मोहन सालपे यांनी दिली. सोलापुरात शेतकरी हवालदिल सोलापूर बाजार समितीत पंधरवड्यापासून कांदा मार्केट आणि सध्या भाजीपाल्याचे लिलाव बंद आहेत. अशावेळी कृषी विभागाने महसूल आणि पोलीस विभागाशी योग्य पद्धतीने समन्वय ठेवून काम करायला हवे, पण असेच कोणतेच काम दिसत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ या भागातून सर्वाधिक शेतमाल सोलापूर बाजार समितीत येतो. मात्र याकरिता आवश्‍यक परवाने शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने स्वतः पुढाकार घेऊन काम करायला हवे, पण त्याबाबतही कोणीही संपर्क करत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  नाशिकचा शेतकरी कोंडीत नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक उन्हाळ्यात नियोजनपूर्वक करत लागवडी करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे मागणी व पुरवठा साखळी अडचणीत सापडली आहे. प्रामुख्याने नाशिक जवळील दिंडोरी, निफाड, सिन्नर, इगतपुरी तालुक्यांमधून भाजीपाला नाशिक, वाशी, कल्याण बाजारात जातो तर कसमादे पट्ट्यातील सटाणा, कळवण, मालेगाव व देवळा तालुक्यातील भाजीपाला सुरत बाजारासाठी जातो. मात्र, सध्या ठोस धोरण राबविण्यात न आल्याने बाजार समित्यांच्या धरसोडीच्या निर्णयांचा फटका भाजीपाला आणि फळ उत्पादकांना बसला आहे.  पुण्यात बाजार समिती बंदच  गुलटेकडी येथील बाजार समितीचे मुख्य आवार हॉटस्पॉट कक्षेत आल्यामुळे १० एप्रिलपासून बंदच आहे. मात्र, याकरिताच्या पर्यायांचा विचार झाल्याने पुण्यासाठी म्हणून उत्पादन करत असलेल्या किमान आठ जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळ उत्पादक मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. फळे-भाजीपाल्याचे डोळ्या देखत शेतातच नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बाजार बंदचे परिणाम...

  • फळे-भाजीपाला पिकांचे थेट शेतातच नुकसान
  • शेतकऱ्यांच्या हातातील खेळते भांडवल संपुष्टात
  • मजुरटंचाई असल्याने मजुरीत वाढ
  • निविष्ठांच्या दरातही वाढ; उत्पादन खर्च वाढला
  • भांडवलाची गुंतवणूक व मेहनत वाया
  • कर्जबाजारीपणा वाढला; खरीप नियोजन अडचणीत
  • पूर्वमोसमी, वादळीवारे, गारपिटीच्या सावटाखाली पिके
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com