जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार हेक्टरवर लागवड शक्य

जळगाव ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा सुमारे २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मूग, उडदाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पूर्वमशागत सुरू आहे.
Maize can be cultivated on 90,000 hectares in Jalgaon district
Maize can be cultivated on 90,000 hectares in Jalgaon district

जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा सुमारे २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मूग, उडदाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पूर्वमशागत सुरू आहे. कोरडवाहू पिकांची लवकरच पेरणी करण्याचे नियोजन काही शेतकरी करीत आहेत. रब्बीसाठी अनुकूल वातावरण खानदेशातील तापी, गिरणा, पांझरा, अनेर, गोमाई नदीकाठी आहे. कोरडवाहू क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी वाढणार आहे. याच वेळी जळगाव जिल्ह्यात मक्याची गेल्या वर्षाच्या तुलनेत १० ते १२ हजार हेक्टर अधिक म्हणजेच सुमारे ९० ते ९१ हजार हेक्टरवर लागवड शक्य आहे. 

कृत्रीम जलसाठे उपलब्ध असलेले शेतकरी मक्याची लागवड अधिक करतील. कारण, मक्याचा हमीभाव १८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. बाजरी, गहू या शेतमालास बाजार समितीत दर कमी आहेत. शासन गहू, बाजरीची हमीभावात खरेदी करीत नाही. तर, कोरडवाहू क्षेत्रात हरभरा व त्यापाठोपाठ ज्वारीची पेरणी होईल.

हरभऱ्याची सुमारे ८० ते ८५ हजार हेक्टरवर पेरणी शक्य आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन लाख ७५ ते ८० हजार हेक्टरवर रब्बी हंगाम उभा राहील. तर, खानदेशात मिळून सुमारे साडेचार लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक क्षेत्रात रब्बी हंगाम असणार आहे.  ज्वारीसाठी खानदेशात तापी नदीकाठावरील भाग प्रसिद्ध आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात कोरडवाहू ज्वारी किंवा दादरची पेरणी केली जाते. धुळ्यात सुमारे सव्वालाख आणि नंदुरबारातही एक लाख ते सव्वालाख हेक्टरवर रब्बी हंगाम उभा राहू शकतो. 

हरभऱ्याची पेरणी खानदेशात मिळून सुमारे दीड लाख ते एक लाख ७० हजार हेक्टरवर होऊ शकते. उडदाची मळणी जवळपास पूर्ण झाली आहे. या क्षेत्रात पूर्वमशागत करून त्यात रब्बी पिकांची पेरणी केली जाईल. तर, सोयाबीन पिकाखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रातही पेरणी सुरू होईल. ऑक्टोबरअखेर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अधिक दिसेल. तर, डिसेंबरमध्ये पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र रिकामे होण्यास सुरवात होईल. त्यात मका लागवडीचे नियोजन अनेक कृत्रिम जलसाठाधारक शेतकरी करीत आहेत. 

ज्वारी, हरभऱ्याची पेरणी यंदा कोरडवाहू क्षेत्रात बऱ्यापैकी होईल. परंतु, कृत्रीम जलसाठे उपलब्ध असलेले शेतकरी मका पिकाकडे वळतील. कारण, मक्याचे दर सुधारू लागले आहेत. बाजरी, गव्हाचे दर गेले सात-आठ महिने बाजारात कमीच आहेत. बाजरी, गव्हाची खरेदी शासन करीत नाही. यामुळे मका पिकाकडे शेतकरी वळतील.  - रमेश पाटील, शेतकरी, पाचोरा, (जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com