अंगणगाव परिसरात मका भुईसपाट

अंगणगाव परिसरात मका भुईसपाट
अंगणगाव परिसरात मका भुईसपाट

चिचोंडी, जि. नाशिक ः अंगणगाव (ता. येवला) येथे शनिवारी (ता. ५) दुपारी साडेतीनला अचानक आलेल्या वादळी पावसाने मका पिकाचे नुकसान झाले. ३६ चारी नजीक आप्पा गायकवाड, भास्कर गायकवाड, नंदू गायकवाड, विलास गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संतोष गायकवाड, वसंत गायकवाड यांच्या शेतातील मका वादळी पावसाने भुईसपाट झाला.

यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, शेतातील पिके सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत. परतीच्या पावसाने अंगणगाव परिसरात दुपारी जोरदार हजेरी लावली. सुरवातीला जोराचा वारा असल्याने शेतातील मका भुईसपाट झाला. ३६ चारीनजीक असलेले भास्कर गायकवाड यांचे दोन एकर, नंदू गायकवाड यांचे दोन एकर, आप्पा गायकवाड यांचे दोन एकर याशिवाय वसंत गायकवाड, संतोष गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, विलास गायकवाड, तसेच परिसरातील अनेक शेतांतील मका वादळी पावसाने आडवा झाला. आधीच लष्करी अळीने संकटात असलेला मका कसाबसा वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले; मात्र परतीचा पाऊस अनेक भागात वादळी वाऱ्यासह पडत आहे. यामुळे काढणीयोग्य झालेले पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे आता संकटात सापडले आहे. येथील नीलेश गायकवाड, गणेश गायकवाड, महेश गायकवाड यांनी कांदा पिकातील पाणी काढून देत शेतातील पाणी कमी केले.

कसबे सुकेणे, दिक्षी परिसरात तब्बल तीस तास पाऊस सायंकाळी पाचला सुरू झालेल्या वादळी पावसाने जवळपास तीन तासभर सुकेणे व दिक्षी परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची छाटणी झालेली आहे. मोगरलेल्या व फेल काढलेल्या द्राक्षबागांचे या पावसाने मोठे नुकसान होणार आहे. रात्रभर बागांवर पाणी असल्याने फवारणी करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

येवल्यात तासाभरात  ५० मिलिमीटर पाऊस येवला : शहर व तालुक्‍यात शनिवारी (ता. ५) दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसाने मका, बाजरी व कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. शहरात तासाभरात सुमारे ५० मिलिमीटर पाऊस पडला. इतके दिवस प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस मात्र आता धो धो कोसळताना दिसतोय.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com