खरेदी बंद; शेतकऱ्यांचा मका घरातच 

१२ तारखेला मका आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी घेऊन येण्याचा संदेश मिळाला. पण आता मात्र पोर्टल बंद पडलंय. खरेदी थांबली मका आणू नका असं सांगतात. मोठ्या आशेने नोंदणी केली होती. आता काय करावं ते सुचेना. - संजय पवार, मका उत्पादक,मुर्शिदाबाद वाडी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद
maize
maize

औरंगाबाद : आधारभूत किमतीने सुरु असलेली मका खरेदी सोमवारी (ता.१३) सायंकाळी थांबली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मका खरेदी विना घरातच पडून राहण्याची वेळ आली आहे.  प्राप्त माहितीनुसार, मक्याची आधारभूत किंमत योजनेअंतर्गत १ हजार ७६० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदीची योजना कार्यान्वित झाली होती. या योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, कन्नड, करमाळ, खुलताबाद, सिल्लोड,सोयगाव व वैजापूर या आठ केंद्रांवर केंद्रांवरून जवळपास ७६०५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४९२० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठवण्यात आले होते. तर जवळपास २६८५ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविणे बाकी होते. एसएमएस पाठवलेल्या शेतकऱ्यांपैकी २७५० शेतकऱ्यांकडील ७८ हजार ७०५ क्विंटल मका खरेदी करण्यात आला.  सूत्रांच्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ४८५५ शेतकऱ्यांकडील मका खरेदी अजूनही बाकी आहे. खरेदीचे पोर्टल बंद पडल्याने आता आपला मका आधारभूत किमतीने खरेदी केला जाणार की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. माहितीनुसार राज्यात ६ लाख ५० हजार क्विंटल मका खरेदीचा लक्षांक पूर्ण झाल्याने पोर्टल बंद पडले. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याचा विचार व्हावा, असे पत्र आधीच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले.  राज्यातील इतर ठिकाणाहून आलेल्या पत्राचा संदर्भ देऊन मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयाने राज्य शासनाला याविषयी अवगत केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यभरात इतर ठिकाणी होत असलेली खरेदी पाहता कोणत्याही क्षणी खरेदी पूर्ण होऊन पोर्टल बंद पडू शकते अशी आगाऊ सूचना सर्वच केंद्रांना देण्यात आली होती, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली. आता पोर्टल बंद पडल्याने नोंदणी केलेल्या मात्र खरेदी होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. नेमका किती मका जिल्ह्यात शिल्लक आहे याचा गतीने आढावा घेण्याचे काम मंगळवारी यंत्रणेकडून सुरू होते. त्यामुळे आधारभूत किमतीने मका खरेदीला मुदतवाढ मिळते की नाही याची चिंता नोंदणी करूनही मका खरेदी होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांना लागली आहे.

प्रतिक्रिया उत्पादित जवळपास दोनशे क्विंटल मका आधारभूत किमतीने खरेदी व्हावी म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून पाठपुरावा करतोय. नंतर नोंदणी करणाऱ्यांचे नंबर येऊन गेले, पण माझा मका अजूनही खरेदी होणे बाकी आहे. - ईश्वर सपकाळ, मका उत्पादक, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com