मका संशोधन केंद्राचे भिजत घोंगडे

maize
maize

औरंगाबाद : कार्यकारी परिषदेच्या ठरावानंतर पत्रप्रपंचाच्या जंत्रीत अडकून पडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात प्रस्तावित मका संशोधन केंद्राच्या निर्मितीचे भिजत घोंगडे कायम आहे. औरंगाबादनंतर जिल्ह्यातील गल्लेबोरगाव की सिल्लोड, या दोनपैकी कोणत्या ठिकाणी केंद्र उभारावे हा प्रश्न कायम आहे. परंतु औरंगाबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राकडे उपलब्ध प्रक्षेत्रावरच या संशोधन केंद्राची निर्मिती का केली जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.   वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथे मका संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला कार्यकारी परिषदेने मान्यता दिली होती. त्यानंतर `वनामकृवि’चे संचालक संशोधन यांच्या माध्यमातून मका संशोधन केंद्र स्थापनेचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार मका संशोधन केंद्रासाठी २०१० ते २०१५ दरम्यान जवळपास ३ कोटी ६२ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यानंतर हे संशोधन केंद्र औरंगाबाद ऐवजी खुल्ताबाद तालुक्‍यातील गल्ले बोरगाव येथे करण्याचा विषय कृषी परिषदेच्या प्रस्तावावरून पुढे आला. त्याला वित्त विभागाने अमान्य केल्याचे व कृषी परिषदेस व ‘वनामकृवि’ला कळविण्यात आले. त्यानंतर त्यावर खल सुरू झाला.  कोल्हापूर येथे मका संशोधन केंद्र असले तरी तेथील व मराठवाड्यातील हवामान, भौगोलिक स्थिती व जमीन वेगवेगळी शिवाय राज्यात सर्वाधिक क्षेत्र मराठवाड्यात खासकरून औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत असल्याने मका पिकावरील विविध समस्या व उत्पादन वाढीकरिता स्थितीला पूरक वाणांचे संशोधन करण्यासाठीचा मुद्दा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्यावतीने रेटण्यात आला. दरम्यान, सिल्लोड येथे हे केंद्र करण्याच्या हालचालींना जागेच्या अभावाने पूर्णविराम मिळाल्यानंतर पर्यायी जागेत औरंगाबाद येथील पैठण रोडवरील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या अखत्यारीत उपलब्ध असलेल्या १०१ हेक्‍टर जमीन मका संशोधन केंद्रास देण्याची मान्यता मिळविण्याचा विषय पुढे आला. परंतु, अजूनही मका संशोधन केंद्रनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला नाही. अलीकडच्या काळात मक्यावर लष्करी अळीने केलेल्या आक्रमणात मका उत्पादकांचं मोठ नुकसान झालं. वेळेत संशोधन केंद्राची निर्मिती झाली असती तर या संकटाचा सामना करणारे व उत्पादकता वाढविणारे संशोधन झाले नसते का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.   कार्यकारी परिषदेच्या मान्यतेनंतर विविध प्रश्नांच्या जंत्रीला संशोधनाच्या गरजेनुसार समर्पक उत्तरे न मिळाल्यानंतरही ''मका हब'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात मका संशोधन केंद्र तातडीने निर्माण करण्याचा मार्ग का मोकळा केला जात नाही. मका उत्पादकांच्या हितासाठी राज्यातले महाविकास आघाडीचं नवं सरकार याविषयी पुढाकार घेईल का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.  अशी आहेत संशोधन केंद्र स्थापण्यामागील उद्दिष्टे

  • अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणाचा करता येईल शोध
  • संकरित व सुधारित वाणांचे जास्त उत्पादन व बियाण्यांचा पुरवठा 
  • सुधारित तंत्रज्ञान शोधून प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना माहिती देणे
  • लवकर तयार होणारे, उच्च उत्पादकता, उच्च प्रतीचे तसेच विविध भौगोलिक वातावरणात येणारे सुधारित व संकरित वाण शोधणे 
  • कीड, रोगास प्रतिकारक्षम सुधारित वाणांवर संशोधन करणे
  • मका पिकाच्या बहुउपयोगितेविषयी (औद्योगिक उपयोग) शेतकऱ्यांना माहिती देणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com