Major damage to crops by free animals in Paithan taluka
Major damage to crops by free animals in Paithan taluka

पैठण तालुक्यात मोकाट जनावरांकडून पिकांचे मोठे नुकसान

चार दिवसांपूर्वी मोसंबीची २२५ कलमे लावली होती. रात्रीतून मोकाट जनावरांनी ती कलमे संपवून टाकली. निवेदने देऊनही मोकाट जनावरांचा बंदोबस्त होत नसल्याने नुकसान सुरूच आहे. - अण्णासाहेब गीते, शेतकरी देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद मोकाट जनावरांचा मुक्काम असलेल्या झाडीजवळच माझे शेत आहे. शेताला तारेचे कंपाउंड केले, पण त्याचा उपयोग नाही. ही मोकाट जनावरे तार कंपाउंड तोडून माझ्या पिकाचे नुकसान करतात. - गजानन राजगुडे, शेतकरी, एकतूनी, ता. पैठण, जि. औरंगाबाद

औरंगाबाद : शेकडोंच्या संख्येने कळपाने येऊन पिकांची नासधूस करणाऱ्या मोकाट जनावरांमुळे पैठण तालुक्यातील ८ ते १० गावांतील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दुसरीकडे मागणी करूनही या जनावरांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली जात नाहीत. उगवलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

जवळपास चार वर्षांपासून पैठण तालुक्यातील एकतूनी गाव शिवारातील दाट झाडीत ३०० ते ४०० मोकाट जनावरांचा कळप पावसाळ्याच्या सुरुवातीपासून साधारणतः चार ते पाच महिने मुक्कामाला असतो. दिवसा झाडीत मुक्काम, तर रात्री देवगाव, रजापूर, दाभरूळ, एकतूनी, घारेगाव, हिरापूर, थापटी, एकतूनी तांडा, थापटी तांडा आदी गाव शिवारातील खरिपाच्या पिकासह फळपिकांना हा कळप लक्ष्य करतो. आठवडाभरापूर्वी या कळपाने देवगाव येथील एका शेतकऱ्याची मोसंबीची चारशे कलमे संपून टाकली. आता पुन्हा देवगाव येथील अण्णासाहेब गीते या शेतकऱ्याची जवळपास २२५ मोसंबीची कलमे संपवून टाकली. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. 

याशिवाय देवगाव परिसरातील जवळपास शंभर एकरावरील खरिपाच्या पिकासह घारेगाव, एकतूनी, दाभरूळ आदी गावातील जवळपास चारशे एकरच्यावर शेतीपिकांचे चालू खरीप हंगामात मोकाट जनावरांनी उगवणीनंतर नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

निवेदनांचा उपयोग होईना 

शेती पिकांचे नुकसान करणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी देवगावसह इतर गावांतील त्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासन वनविभागाकडे वारंवार निवेदने दिली. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे होणारे नुकसान सहन करण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती त्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

जीव धोक्यात घालून जागरण

मोकाट जनावरांपासून आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी त्रस्त शेतकऱ्यांना रात्री शेतशिवारात गस्त घालण्याशिवाय पर्याय नाही. पाऊस, वारा वादळ व इतर धोके पत्करून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात जागरण करण्याची वेळ आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com