बहुजन वंचित आघाडी विजयापासून ‘वंचित’च
बहुजन वंचित आघाडी विजयापासून ‘वंचित’च

वंचित बहुजन आघाडी विजयापासून ‘वंचित’च

अकोला ः राजकारणात विजयापेक्षा दुसरे कशालाही महत्त्व नसते, हे आता तरी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना उमजले असेल. कारण लोकसभा निवडणुकीत राज्यात जोरदार हवा केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत या आघाडीने ‘एकला चलो’चा नारा दिला. वंचित आणि महाआघाडी एकत्र लढले असते, तर कालचे निकाल कदाचित खूप वेगळे असते, असे म्हणण्यास मोठा वाव आहे. अनेक जागी महायुतीचे उमेदवार हे थोड्या मताधिक्याने विजयी झाले. काही मतदारसंघांत वंचितच्या उमेदवारांनी निश्चितच लढत निर्माण केली खरी; पण ही मते मात्र त्यांना विजयापर्यंत घेऊन जाऊ शकलेली नाहीत. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेतही विजयापासून वंचितच राहली असे म्हटले जात आहे.

अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाचा पॅटर्न तयार करीत काही वर्षांपूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणात बहुजन समाजाला व्यासपीठ तयार करून दिले. हा पॅटर्न राज्यभर गेला. मागील काही निवडणुकांमध्ये किमान या भागात तरी भारिप-बमसंचे उमेदवार विधानसभेत जात होते. लोकसभेपूर्वी उदयाला आलेल्या बहुजन वंचित आघाडीत भारिप-बमसंचे विलिनीकरण झाले. त्यानंतर या वेळी उमेदवार वंचितच्या चिन्हावर लढले. वऱ्हाडात अकोला पूर्व, मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर, बुलडाणा, जळगाव जामोद, खामगाव या मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी कुठे दुसरे, तर कुठे तिसरे स्थान मिळवले. मूर्तिजापूरमध्ये थोडी अधिक मते मिळाली असती तर कदाचित वंचितचे खाते उघडले गेले असते. परंतु, राजकारणात जर-तर याला काहीच महत्त्व नाही. ज्याने विजय मिळवला तो जिंकला, असे स्पष्ट गणित आहे.

वंचित आघाडीच्या उमेदवारांना समाधानकारक मते मिळाली, असे कदाचित दावे होऊ शकतात. परंतु, सत्तेत येण्यासाठी ही कामगिरी पुरेशी नाही. आगामी चार-पाच वर्षे आता मोठ्या निवडणुका नाहीत. आता केवळ आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. वंचितला स्थान बळकट करण्यासाठी विधानसभेत संधी होती. ही संधी पूर्णपणे हातातून निघून गेलेली आहे. वंचितची स्थिती ही चर्चा अधिक आणि निकाल कमी अशी झालेली आहे. 

निवडणुकीत उमेदवार निवडताना काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत. दुसऱ्या पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून ऐनवेळी वंचितमध्ये संधी देऊन आयातांना उमेदवाऱ्या वाटण्यात आल्या. त्याचा परिमाण एकनिष्ठ असलेल्यांवर झाला. त्याचा रोष मतदान यंत्रातून बाहेर आला, हे सांगण्यासाठी कुठल्याही तत्ववेत्त्याची गरज नाही. वंचितच्या उमेदवारांनी महाआघाडीच्या उमेदवारांची गणिते नक्कीच बदलली. कदाचित वंचित सोबत असती तर, निकाल सकारात्मक आले असते हे त्यामुळेच म्हटले जात आहे. वंचित आघाडी आता या चुकांवर कसे मंथन करते हे आगामी काळात पाहण्यासारखे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com