जनावरांच्या आहारात करा योग्य वेळी बदल

Make changes to the diet of animals at the right  time  
Make changes to the diet of animals at the right time  

जनावरांच्या आहारात अचानक बदल केल्यामुळे पोटफुगी, अपचन, पातळ शेण यांसारख्या समस्या दिसून येतात. हिरवा चारा, वाळला चारा व पशुखाद्य मिसळूनच एकाचवेळी जनावरांना खाण्यास द्यावे. यामुळे कोटीपोटातील सामूमध्ये तत्काळ बदल न होता पचनक्षमता उत्तम राहते.   गाय, म्हैस, शेळी, मेंढी हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये मोडतात. या प्राण्यांमध्ये त्यांची रवंथ क्रिया जेवढी जास्त वेळ होईल, तेवढी चाऱ्याची पचनक्षमता जास्त असते. जेवढे चाऱ्याचे पचन जास्त, तेवढे उत्पादन जास्त मिळू शकते. पशुपालक जास्तीचे उत्पादन मिळवण्यासाठी तसेच अज्ञानाने जनावरांच्या आहारात दररोज किंवा पंधरा दिवसाला किंवा जसा चारा उपलब्ध असेल त्या पद्धतीने जनावरांच्या आहारात अचानक बदल करतात. यामुळे जनावरांमध्ये बऱ्याच वेळा पोटफुगी, अपचन, पातळ शेण यांसारख्या समस्या दिसून येतात.

  • जनावरांच्या कोटीपोटात वेगवेगळ्या पोषणतत्त्वांचे पचन करणारे जवाणू, प्रीटोझुआ, कवक उपलब्ध असतात. जनावरांच्या आहारात जर सहज पचणाऱ्या चाऱ्याव्यतिरिक्त तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असणाऱ्या चाऱ्याचा वापर केल्यास तंतुमय पदार्थांचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे चाऱ्याचा बराचसा भाग न पचता शेणातून बाहेर टाकला जातो. यामुळे असा चारा दिल्यामुळे उत्पादनात घट होते.  
  • जास्त तंतुमय पदार्थ असणाऱ्या चाऱ्याचे पचन व्यवस्थित होण्यासाठी हा चारा हळूहळू जनावरांच्या आहारात वाढवावा, त्याचबरोबर अशा चाऱ्यामध्ये अर्धा किलो गूळ, भरड धान्य किंवा १ ते २ किलो मळी मिसळून द्यावी म्हणजे कोटीपोटातील जिवाणूंची कार्यशिलता चांगली राहून पचनही सुलभ होते.  
  • चराऊ कुरणातही एक पिकाऐवजी दुसऱ्या पिकांत जनावरे अचानक चारल्यामुळे चाऱ्याची पचनक्षमता घटते. म्हणून एका चाऱ्याऐवजी दुसरा चारा देण्याचा बदल हा हळूहळू करावा, म्हणजेच जुना चारा बंद संपण्याच्या अगोदर ८ ते १५ दिवस नवीन उपलब्ध होणारा चारा जनावरांना द्यायचा आहे, तो हळूहळू जुन्या चाऱ्यात मिसळून द्यावा, तसेच जुन्या चाऱ्याचे प्रमाण दररोज हळूहळू कमी करून नवीन चाऱ्याचे प्रमाण वाढवत राहावे, यामुळे चाऱ्याची पचनक्षमता चांगली राहून दूध उत्पादन चांगले मिळते, अपचन टाळले जाते.  
  • जनावर व्याल्यानंतर उत्पादन वाढवण्यासाठी बरेचसे पशुपालक पशुखाद्याचे प्रमाण एकदम जास्त वाढवतात. यामुळे एकतर अपचन, पोटफुगी उद्‌भवते. अशा पशुखाद्यात जर ज्वारी, मका, बाजरी अशा धान्याचे प्रमाण जास्त असेल तर कोटीपोटात आम्ल जास्त प्रमाणात तयार होऊन कोटीपोटातील सामू (पीएच) कमी होतो. यामुळे कोटीपोटातील बरेचसे उपयुक्त जीवजंतू मरून जातात.  
  • आम्लधर्मीय अपचनामुळे जनावर दगावण्याचीही शक्‍यता जास्त असते. कोटीपोटातील सामू एकदम कमी झाल्यामुळे दुधाला फॅट लागत नाही. चाऱ्याची पचनीयताही घटते, तर याउलट जर पशुखाद्यात ढेप/ पेंडीचे प्रमाण जास्त असेल तर कोटीपोटातील द्रवाचा सामू (पीएच) वाढतो म्हणजेच अल्कलीधर्मीय होतो. यामुळेही जनावरांत अपचन होऊन उत्पादन घटते. जनावर मृत्युमुखीही पडू शकते. यासाठी जनावरांच्या आहारात एकदम जास्त प्रमाणात तत्काळ वापर न करता हळूहळू पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे.  
  • हिरवा चारा, वाळला चारा व पशुखाद्य मिसळूनच एकाच वेळी जनावरांना खाण्यास द्यावे. यामुळे कोटीपोटातील सामूमध्ये तत्काळ कोणताही बदल न होता पचनक्षमता उत्तम राहते.  
  • जनावरांना कुरणात चारताना अचानक एकदलीय चारा कुरणातून द्विदल चारा पिकाच्या कुरणात चरायला सोडू नये. यामुळे पोटफुगीची शक्‍यता जास्त असते. पोटफुगी अतितीव्र प्रकारची असू शकते. पोटफुगी तीव्र स्वरूपाची असेल, तर जनावरांच्या फुफ्फुसावर ताण येऊन श्‍वास गुदमरून जनावर मृत्युमुखी पडते. यासाठी जनावरांच्या आहारात अचानक बदल टाळा.  
  • जनावरांना एकदम जाडे-भरडे धान्याऐवजी पीठ खाण्यास देऊ नये, यामुळे कोटीपोटातील आम्लता जलद वाढते. अपचन जास्त प्रमाणात होते. दिलेल्या खाद्य घटकांचा दूध उत्पादनासाठी उपयोगही होत नाही.
  • संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील ८३२९७३५३१४ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com