खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करुन द्या ः कृषिमंत्री भुसे

अकोला ः या खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते, बियाणे व अन्य कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत या निविष्ठा शेतकरी गटांमार्फत पोचविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बियाणे, खतांची कमतरता भासू देऊ नका, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले.
Make fertilizers and seeds available directly on the dam: Agriculture Minister Bhuse
Make fertilizers and seeds available directly on the dam: Agriculture Minister Bhuse

अकोला ः या खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते, बियाणे व अन्य कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत या निविष्ठा शेतकरी गटांमार्फत पोचविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बियाणे, खतांची कमतरता भासू देऊ नका, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले. अकोला येथे खरीप हंगाम विभागीय आढावा बैठकीत ते बुधवारी (ता. २७) बोलत होते.

अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा त्यांनी अकोला येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. या बैठकीस विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तारेणीया आदी उपस्थित होते. श्री. भुसे यांनी वाशीम, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला या क्रमाने जिल्हानिहाय आढावा घेतला.

यंदा उत्पादकता वाढ वर्ष भुसे म्हणाले की, शासनाने यंदाचे वर्ष हे उत्पादकता वाढ वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घ्यावी. युरियाचा ५० हजार टन साठा राज्यात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना युरिया कमी पडणार नाही. मात्र, जमिनीचा पोत चांगला राहावा यासाठी शेतकऱ्यांनी युरियाचा वापर हा कमीत कमी वा आवश्यक तितकाच करावा. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. तथापि, याबाबत सूक्ष्म नियोजन करून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्धता करावी.

थकबाकीचा विचार न करता पीककर्ज द्यावे पीक कर्जाबाबत ते म्हणाले की, जे शेतकरी मागणी करतील त्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांकडील थकबाकीचा विचार करू नका. पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंका व बॅंकांचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. जिल्ह्यात पीककर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दर चार दिवसांनी आढावा घेऊन कोणीही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही भुसे यांनी दिले. शेतकऱ्यांकडील कापूस, तूर, हरभरा, मका, ज्वारी या शेतमालाची खरेदी प्रक्रिया येत्या १५ जून पर्यंत पूर्ण करावी, असेही ते म्हणाले.

विभागात ३२.६० लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन अमरावती विभागात यावेळी खरीप हंगामाचे क्षेत्र ३२.३२ लाख हेक्टर इतके आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यंदा बुलडाणा जिल्ह्यात ७.४८ लाख हेक्टर, अकोला ४.८१ लाख हेक्टर, वाशीम ४.४ लाख हेक्टर, अमरावती ७.२८ लाख आणि यवतमाळ जिल्ह्यात ८.९९ लाख असे एकूण ३२ .६० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे.

उत्पादकता वाढीसाठी लक्ष्यांक यंदाचे वर्ष हे उत्पादकता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा पीकनिहाय उत्पादकता वाढीसाठी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यात सोयाबीन पिकासाठी १३५३० हेक्टर क्षेत्रावर १५ हजार ७२२ टन, कापूस ११५४६ हेक्टरवर २५५३८ टन, तूर ४४५२ हेक्टरवर ४६०८ टन, मूग ९८३ हेक्टरवर ५५१ टन, उडिद ७५६ हेक्टरवर ४१३ टन, खरीप ज्वारी ७०० हेक्टरवर ६४६ टन तर मका ३६५ हेक्टरवर ७२६ टन इतका उत्पादनाचा लक्ष्यांक ठरविण्यात आला आहे.

अशी असेल बियाणे व खतांची उपलब्धता या हंगामासाठी सोयाबीनचे ५.५८ लाख क्विंटल बियाणे आवश्यक आहे. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्राकडून २.८८ लाख क्विंटल व खासगी कंपन्यांकडून २.७० लाख क्विंटल बियाण्याची उपलब्धता होणार आहे. बीटी कापूस बियाण्याची आवश्यकता ६० लाख ६४ हजार पाकिटांची असून ७८ लाख ३८ हजार पाकिटांची उपलब्धता होणार आहे. तूर पिकासाठी ३९ हजार क्विंटल, मूग ७ हजार क्विंटल, उडिद सहा हजार क्विंटल, मका पाच हजार क्विंटल, खरीप ज्वारी सहा हजार क्विंटल बियाण्याची आवश्‍यकता आहे. विभागात खतांचे ५ लाख ४९ हजार टनाचे आवंटन मंजूर असून ३१ मार्चअखेर विभागात ९२ हजार टन शिल्लक साठा आहे. खरीप २०२० साठी ६ लाख १९ हजार टन खतांची मागणी करण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com