आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घ्या 

शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेत पूरक धोरण राबविले तरच शेतकरी आत्महत्या थांबतील. यासाठी स्वतंत्र विधेयक सादर करण्यात यावे.
Make strategic decisions for suicide control
Make strategic decisions for suicide control

चंद्रपूर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेत पूरक धोरण राबविले तरच शेतकरी आत्महत्या थांबतील. यासाठी स्वतंत्र विधेयक सादर करण्यात यावे व त्याआधारे शेतकरी हिताच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी, आत्महत्याग्रस्त शेतकरी पुत्र मारोती डोंगे यांनी केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, कृषिमंत्री दादा भुसे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, राजुरा आमदार सुभाष धोटे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार वामनराव चटप, संजय धोटे यांना लिहलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. पत्रानुसार, घरची जेमतेम ८७ आर जमीन. त्याच्या जोडीला वडिलांनी पाच एकर शेती करारावर केली होती. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून शेती उत्पन्नात वाढ होत नव्हती. या वर्षी उत्पन्नातील ही तूट पोषक वातावरणाच्या माध्यमातून भरून निघेल, अशी अपेक्षा असताना सततच्या पावसाने फुलपाती गळली आणि पाच एकरातून अवघा १७ क्विंटल कापूस झाला. पावसामुळे सोयाबीनचा दाणा भरला नाही, तुर बुरशीजन्य रोगामुळे वाळून गेली. याच दरम्यान २०१७-१८ मध्ये घेतलेल्या कर्जाचे शासनाने परस्पर पुनर्गठण केले. पुनर्गठणा ऐवजी शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला असता तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यातून मोठा दिलासा मिळाला असता. परंतु शासनाकडून असे निर्णय घेतले जात नाहीत ही शोकांतिका आहे. कर्जाचा डोंगर वाढत असतानाच आईची प्रकृती बिघडली. त्यामुळे वडिलांना तिच्या उपचारावर देखील खर्च करावा लागला. आईच्या सततच्या आजारपणामुळे महिन्याला मोठा खर्च होत होता. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे पिकाच्या वाढीसाठी वातावरण पोषक राहात नव्हते. त्यामुळे उत्पादकता आणि उत्पन्नही कमी झाले होते, असा दुहेरी मार असह्य झाल्याने वडिलांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. अशा प्रकारची परिस्थिती इतरांवर येऊ नये याकरिता एखाद्या विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी पाठबळ देण्याची गरज आहे. त्याकरिता कर्जमाफी व इतर उपाययोजना शासनाने हाती घ्याव्यात अशी अपेक्षा कोरपना येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी पुत्र मारुती बाबाराव डोंगे यांनी व्यक्त केली आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com