शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
अॅग्रो विशेष
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकार
गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर पदार्थांपासून (नॉन डेअरी) उत्पादित होणाऱ्या दुधाबाबत शास्त्रीय अभ्यास करावा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
पुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर पदार्थांपासून (नॉन डेअरी) उत्पादित होणाऱ्या दुधाबाबत शास्त्रीय अभ्यास करावा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
बिगर गोवंशापासून (उदा. सोयाबीन, बदाम, नारळ) तयार होणाऱ्या दुधाच्या विक्रीबाबत ग्राहकांना माहिती देताना सध्या देशभर वेगवेगळी माहिती दिली जात आहे. यातून गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाच्या दर्जाला कमी लेखणारी माहिती दिली जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम तयार होतो आहे. त्यामुळे देशाच्या मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘गाय, म्हैस अशा गोवंशाच्या दुधापासून मिळणाऱ्या पोषणमूल्यांची उपयुक्तता मोठी आहे. वयोवृद्ध, तरुण तसेच तरुणांसाठी पूर्णान्न म्हणून या दुधाचे महत्त्व शेकडो वर्षांपासून सिद्ध झालेले आहेत. अशा स्थितीत या दुधाचे महत्त्व कमी करणारी माहिती देशभर पसरवली जात आहे. ही बाब केंद्रीय पशुसंवर्धन सचिव अतुल चतुर्वेदी यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेला (आयसीएआर) कळवली आहे.”
‘आयसीएआर’चे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले आहे, की कृषी मंत्रालयाने सर्व कृषी विद्यापीठे आणि डेअरी तंत्रज्ञान महाविद्यालयांना दोन्ही दुधांबाबत अभ्यास करण्यास सूचित करावे. याशिवाय गोवंशाच्या दुधाबाबत सुरू असलेल्या अपप्रचाराला तोंड देणारी योग्य माहिती देखील ग्राहकांपर्यंत न्यावी. त्यासाठी देशभर विविध माध्यमांमधून माहिती दिली जावी.’’
अधिसूचनेबाबत अस्पष्टता
भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसआयए) दुधाची व्याख्या स्पष्ट करणाऱ्या अधिसूचनेचा नवा खर्डा तयार केला आहे. त्यात नॉन डेअरी दुधाला किंवा प्लॅन्ट बेस्ड् (सोया) उत्पादनापासून तयार केलेल्या द्रवाला ‘दूध’ म्हणता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘एफएसएसआयए’च्या या भूमिकेला ‘नॉन डेअरी मिल्क’च्या लॉबीने मोठा विरोध सुरू केला आहे. या विरोधात खऱ्या दुधाला (गोवंशाचे दूध) चुकीचे ठरविण्याचा प्रकार होत असल्याचा दावा केंद्रीय दुग्धविकास खात्याकडून केला जात आहे.
- 1 of 670
- ››