व्यवस्थापन केळी बागेचे..

Cultivation of wind break trees and use of shadeNet is beneficial for banana orchards in  summer season
Cultivation of wind break trees and use of shadeNet is beneficial for banana orchards in summer season

केळीची वाळलेली पाने (रोगविरहित), उसाचे पाचट, गव्हाचा अथवा सोयाबीन भुसा यांचा वापर आच्छादनासाठी करावा किंवा दोन ओळीतील मोकळ्या जागेत ३० मायक्रोन जाड चंदेरी काळ्या रंगाचे पॉलिइथिलिन पेपर अंथरावा. यामुळे जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. उन्हाळ्यातील अधिक तापमान व अल्प आर्द्रता यांचा संयुक्तरीत्या केळीच्या झाडावर विपरीत परिणाम होतो. केळी पीक ३५ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकते. तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. दुपारच्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे झाडांची पाने पिवळी पडून वाळतात.

निसवलेल्या घडांतील वरील बाजूच्या फण्यातील केळी तीव्र प्रकाशामुळे काळी पडतात. तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्यास जमिनीतील पाण्याचा अंश बाष्पीभवनामुळे कमी होतो. अशा वेळी पाणीपुरवठा न केल्यास मुळे कमकुवत होतात, काही वेळा झाडे उन्मळून पडतात. सद्यःस्थितीत मृगबाग ही घड पक्वता आणि कांदेबाग मुख्य वाढीच्या अवस्थेत असून निसवणीला सुरुवात होईल. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यात केळी बागेचे योग्य व्यवस्थापन करावे. व्यवस्थापनातील प्रमुख बाबी

  • बाग तणमुक्त करावी. मुख्य खोडालगतची पिले धारदार विळीने जमिनीलगत कापावी. कापलेली पिले व तणांचा खोडाजवळ आच्छादन म्हणून वापर करावा.
  • खोडाभोवती लोंबकळणारी रोगविरहित वाळलेली अथवा पिवळी पाने कापू नयेत. त्यामुळे खोडाचे उष्ण हवेपासून संरक्षण होण्यास मदत होते.
  • घड पक्वतेच्या अवस्थेतील मृगबागेस सिंचनाच्या पाण्यातून खत द्यावे. हजार झाडांसाठी प्रतिआठवडा साडेपाच किलो युरिया व ७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ठिबक सिंचनातून द्यावे.
  • कांदे बागेतील हजार झाडांसाठी प्रतिआठवडा १३ किलो युरिया व साडेआठ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ठिबक सिंचनातून द्यावे.
  • घड पूर्ण निसवल्यावर व केळफूल तोडल्यानंतर ५ ग्रॅम पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक १० ग्रॅम युरिया अधिक १० मिलि स्टिकर प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे लांबी आणि घेर वाढून केळीच्या वजनात वाढ होते.
  • वातावरणातील तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. अशा वेळी ठिबक सिंचन पद्धतीने गरजेइतका पाणीपुरवठा करावा. पाण्याचा ताण पडू देऊ नये. मृगबागेसाठी प्रतिदिन प्रतिझाड २० ते २२ लिटर पाणी तर कांदेबागेसाठी १८ ते २० लिटर पाण्याची आवश्‍यकता असते.
  • लागवडीच्या वेळी बागेभोवती शेवरी, बांबू, गजराज गवत या झाडांची सजीव कुंपण म्हणून लागवड करावी किंवा बागेभोवती हिरव्या शेडनेटची वारारोधक म्हणून उभारणी करणे फायद्याचे ठरते. यामुळे केळी बागेचे उष्ण हवेपासून संरक्षण होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो.
  • केळीची वाळलेली पाने (रोगविरहित), उसाचे पाचट, गव्हाचा अथवा सोयाबीन भुसा यांचे आच्छादन करावे किंवा दोन ओळीतील मोकळ्या जागेत ३० मायक्रोन जाड चंदेरी काळ्या रंगाचे पॉलिइथिलिन प्लॅस्टिक अंथरावे. यामुळे जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. जमिनीचे तापमान नियंत्रित राहिल्याने मुळांना इजा होत नाही तसेच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • केळीच्या पानांतून होणारा बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी बाष्पीरोधकांचा वापर करावा. पावसाळा सुरू होईपर्यंत १५ दिवसांच्या अंतराने प्रतिलिटर पाण्यात ८० ग्रॅम केओलिन मिसळून फवारणी करावी.
  • संपर्क-  प्रा. एन.बी. शेख, ०२५७-२२५०९८६ (केळी संशोधन केंद्र, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com