नियंत्रण भातावरील दाणे रंगहीनता रोगाचे...

सध्या पाऊस कमी झाला असून अति दमट व उष्ण हवामान तसेच लोंब्या निसवणे ते फुलोऱ्याची अवस्था आहे. रोग साथीच्या स्वरूपात वाढण्याची दाट शक्यता आहे.
management of colorlessness disease in rice grains
management of colorlessness disease in rice grains

सध्या पाऊस कमी झाला असून अति दमट व उष्ण हवामान तसेच लोंब्या निसवणे ते फुलोऱ्याची अवस्था आहे. रोग साथीच्या स्वरूपात वाढण्याची दाट शक्यता आहे.   मागील पंधरवड्यात राज्यात बहुतेक भागात भरपूर व जोराचा पाऊस झाला. परंतु भात पट्ट्यामध्ये त्यामध्ये सातत्य नव्हते. काही ठिकाणी अति तर काही ठिकाणी सौम्य वृष्टी झाली. सतत ढगाळ वातावरण, कमी जास्त व अधून मधून पाऊस यामुळे अनेक ठिकाणी दाणे रंगहीनता रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे.  रोगकारक बुरशी आणि जिवाणू दाणे रंगहीनता हा रोग अनेक प्रकारच्या बुरशी (उदा. सॅरोक्लॅडियम ओरायझी, बायपोलॅरिस ओरायझी, मॅग्नापोर्था ग्रिसिया, फ्यूजारियम ऑक्सिस्पोरम, अल्टरनेरिया, कर्व्हुलॅरिया, अस्परजिलस आदी) तसेच जीवाणूमुंळे ( उदा. झान्थोमोनास ओरायझी, बर्कहोल्डरिया ग्लुमी आदी) होतो. रोगाची लक्षणे

  • लोंबीतील दाण्यांवर विविध लक्षणे दिसतात. प्रादुर्भावाची तीव्रता बुरशी किंवा जिवाणू यांवर अवलंबून असते. 
  • दाणे रंगहिनतेचा थेट परिणाम आकार, रंग आणि आकारमानावर दिसून येतो. 
  • सॅरोक्लॅडियम जातीत दाणे फिकट तपकिरी ते राखाडी रंगाचे होतात. बायपोलॅरिस जातीत ते मध्यम ते गडद तपकिरी किंवा काळसर होऊन त्याचा मध्य फिकट रंगाचा होतो. 
  • मॅग्नापोर्था स्पे. मध्ये दाण्यावरील ठिपक्यांचा रंग मध्यभागी राखाडी असून कडा तपकिरी किंवा काळसर असतात. फ्युजारियम जातीमुळे दाणे फिकट गुलाबी किंवा लालसर तपकिरी होतात.
  • अल्टरनेरिया, कर्वुलॅरिया व अस्परजिलस जातीत फिकट ते गडद तपकिरी ठिपक्यांवर काळसर रंगाचे सूक्ष्म बिंदू दिसतात. 
  • जीवाणूजन्य रोगात (लोंबीवरील करपा) लोंबीतील दाणे पिवळसर तपकिरी ते तांबूस तपकिरी होऊन थोडेसे चिकट होतात. दाण्यांचा रंग बदलला तरी लोंबीचा मधला दांडा व पोटरीचे वा शेवटचे पान गर्द हिरवे दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव बुरशीजन्य दाणे रंगहिनतेपेक्षा जास्त असतो. रोगामुळे लोंबीतील काही किंवा सर्व पाकळ्या (स्पाइकलेट्स) संक्रमित होऊन आतील दाणे रंगहीन होतात. परिणामी दाणे आणि भुसकट यांचे उत्पादन कमी होते. लोंब्या पोकळ होऊन दाणे भारत नाहीत. याव्यतिरिक्त बियाणांची उगवण क्षमता कमी होणे, मुळे व रोपांची वाढ खुंटणे, दाणे सडणे, रोपमर आदीही लक्षणेही दिसतात. 
  • एकात्मिक रोग नियंत्रण  

  • किडींचे तातडीने नियंत्रण करावे. कारण त्यांच्यामार्फत रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. 
  • शेत व बांध स्वच्छ व तणविरहित ठेवावेत.  
  • बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण ( फवारणी ः प्रति १० लिटर पाणी)

  • अझोक्झीस्ट्रॉबीन (२५० एससी) ४ मिलि किंवा ग्रॅम  किंवा
  • प्रोपिकोनाझोल १० मिलि किंवा
  • कार्बेन्डाझिम १० ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २० ग्रॅम किंवा
  • हेक्झाकोनॅझोल १० मिलि
  • द्रावणात स्टिकर १० मिलि मिसळावे. 
  • पहिली फवारणी लोंबी पोटरीत असताना व दुसरी फवारणी ७५ टक्के लोंब्या बाहेर पडल्यानंतर आणि तिसरी फवारणी आवश्यकता  वाटल्यास ७ ते १० दिवसांनी करावी. 
  • लोंबीवरील करपा (अणुजीवजन्य दाणे रंगहीनता)

  • स्ट्रेप्टोसायक्लीन २ ते २.५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम अधिक स्टिकर १० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
  • किडींचे नियंत्रण ( फवारणी ः प्रति १० लिटर पाणी )

  • कारटाप हायड्रोक्लोराईड (५० एसपी) २० ग्रॅम किंवा 
  • क्लोरपायरीफॉस (४० इसी) १५ मिलि 
  • अधिक स्टिकर १० मिलि 
  • टीप ः सर्व रसायनांना ॲग्रेस्को शिफारस आहे.
  • संपर्क- डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११ (कृषी अणूजीवशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com