जनावरांचे आगीपासून करा संरक्षण

मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास आगीसारख्या अपघातांपासून प्रतिबंध होऊ शकतो.
मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास आगीसारख्या अपघातांपासून प्रतिबंध होऊ शकतो.

अागीची झळ बसलेली जनावरे पूर्णपणे बरी होण्यासाठी प्रदीर्घ कालावधीसाठी औषधोपचार करावा लागतो, जो की पशुपालकाला आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो. त्यामुळे आगीपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना काळजीपूर्वक अमलात आणाव्यात.   साधारणपणे उन्हाळ्याच्या हंगामात चराऊ कुरणे, पडीक जमिनीवरील गवत तसेच शेतातील व रस्त्यालगतचे बांध विशेषतः संध्याकाळच्या वेळी वातावरणात हवा कमी असल्याने जाळले जातात. अशा वेळी आगीचा थोडासा विस्तव अजाणतेपणे शिल्लक राहिल्यामुळे परिसरात असणाऱ्या कडबा किंवा गवताच्या गंजी तसेच जनावरांचे गोठे यांना रात्रीच्या वेळी आग लागण्याची शक्‍यता असते. लातूर जिल्ह्यातील उदगीर व जळकोट परिसरात नुकत्याच वेगवेगळ्या कारणांमुळे जनावरांच्या गोठ्यांना आग लागल्यामुळे काही किमती जनावरे दगावली, तर काही जनावरे औषधोपचाराने वाचली. उपाययोजना

  • गोठ्याची जागा शक्‍यतो विद्युतवाहक खांब किंवा तारा यांच्यापासून सुरक्षित अंतरावर असावी.
  • गोठ्याचे बांधकाम शक्‍यतो लाकूड, बांबू व शेतातील काड, पालापाचोळा किंवा उसाची पाचट यांपासून केलेले नसावे.
  • सिमेंट किंवा लोखंडी खांब व पत्र्याचा वापर करून केलेला गोठा आगीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उपयुक्त असतो.
  • - चरायला जाणारी जनावरे गोठ्यात बांधताना साखळदंड व नायलॉन दोर ऐवजी सुती दोर वापरून बांधावीत.
  • जनावरांवर वेळोवेळी लक्ष देण्याच्या दृष्टीने गोठ्याचे बांधकाम राहत्या घरापासून दूर न करता घराच्या जवळ करावे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना अमलात आणता येतील.
  • गोठा व परिसरात ज्वलनशील पदार्थ ठेऊ नयेत.
  • जनावरे गोठ्यात बांधताना वेसणीऐवजी म्होरकीने बांधल्यास आग किंवा तत्सम अपघातावेळी जनावरांना दोर तोडून गोठ्यातून तत्काळ मुक्त होण्यासाठी सुकर होईल.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत शेतात वाळलेले गवत किंवा शेतातील पिकाचे टाकाऊ घटक जाळण्याची पद्धत अवलंबली जाते. अशा ठिकाणी जनावरांना चरावयास बांधणे धोक्‍याचे ठरू शकते. असे अपघात टाळण्यासाठी शेतात जनावरे चरावयास नेल्यास पशुपालकांचे पूर्णवेळ जनावरांवर लक्ष असणे गरजेचे असते.
  • गोठ्यात आग लागलेली असताना गोठ्यातील सर्व जनावरांना तात्काळ सोडून बाहेर काढण्याला प्राधान्य द्यावे व त्यानंतर आग विझविण्यासाठीच्या उपाययोजना अमलात आणाव्यात.
  • उन्हाळ्याच्या दिवसात जनावरे शक्‍यतो शेतात किंवा गोठ्याशेजारील उपलब्ध झाडांच्या सावलीत बांधावीत.
  • मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास जनावरे खुली असल्यामुळे व त्यांना वावर करण्यासाठी भरपूर मुक्त जागा असल्याने आगीसारख्या अपघातांपासून प्रतिबंध होऊ शकतो.
  • उन्हाळ्यात शेतातील पाचट, चराऊ कुरणे, गवतांचे बांध तसेच शेतातील पिकांचे टाकाऊ घटक जाळण्याची पद्धत ही शास्त्रीयदृष्ट्या चुकीची व पर्यावरणास हानिकारक आहे. यापेक्षा शेतातील पालापचोळ्यापासून खत तयार करावे किंवा उन्हाळ्यात पिकामध्ये आच्छादनासाठी पाचटाचा चांगला उपयोग होतो. अत्यावश्‍यक परिस्थितीत अाग लावण्याचे नियोजन शक्यतो लवकर करावे जेणेकरून पूर्ण दिवस निरीक्षणाखाली ठेवू अागीपासून घडणारे अपघात टाळता येतील.
  • संपर्क ः डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३ (चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com