रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापन

रब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, विभागनिहाय शिफारशीत वाणाची निवड, अधिक उत्पादन देणाऱ्या, रोग प्रतिकारक्षम वाणाची निवड, बीजप्रकिया, वेळेवर पेरणी, शिफारस केलेले आधुनिक तंत्रज्ञान, तणनियंत्रण, पाण्याचे योग्य व्यवस्थापन यातून उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होते.
use improved sowing machine for sowing of rabi crops.
use improved sowing machine for sowing of rabi crops.

रब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, विभागनिहाय शिफारशीत वाणाची निवड, अधिक उत्पादन देणाऱ्या, रोग प्रतिकारक्षम वाणाची निवड, बीजप्रकिया, वेळेवर पेरणी, शिफारस केलेले आधुनिक तंत्रज्ञान, तणनियंत्रण, पाण्याचे योग्य व्यवस्थापन यातून उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होते.  राज्यात परतीचा पाऊस नेहमीपेक्षा दोन आठवड्याने उशिरा झाल्यामुळे खरीप हंगामातील विशेषतः सोयबीन पिकाची काढणी व कापूस पिकाची वेचणी वेळेवर करता आली नाही. या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात कोरडवाहू पिकांसाठी जमिनीत चांगला ओलावा झाला आहे. रब्बीतील पिकांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास त्यातून अधिक उत्पादन मिळेल, ही आशा आहे.  मुख्यत्वे रब्बी हंगामात हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, सूर्यफूल, करडई, मोहरी व जवस इ. पिके घेतली जातात. या पिकांच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक घटकाची माहिती घेऊ. जमिनीची निवड, मशागत व ओलावा 

  • कोरडवाहू पिकासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. 
  • खरीप हंगामातील पिकाची काढणी केल्यानंतर वखराच्या साहाय्याने उतरला आडवी मशागत केलेली असल्यास उत्तम. यामुळे पावसाचे पाणी ओलाव्याच्या रूपात जमिनीत साठविले जाऊन पिकाची वाढ व उत्पादनासाठी उपयुक्त ठरेल. 
  • अति उथळ जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा जमिनीत रब्बी हंगामातील कोणतेही पीक घेण्यास फायदेशीर ठरत नाही. 
  • मध्यम खोल ते खोल जमिनीसाठी आंतरपीक पद्धतीचा आणि दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा.
  • हरभरा 

  • हरभऱ्याचे देशी व काबुली असे दोन प्रकार आहेत. 
  • देशी हरभरा समशीतोष्ण प्रदेशात चांगला येतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने याच हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. यात पाण्याचा ताण सहन करण्याची चांगली क्षमता आहे. डाळ व बेसनपीठ उद्योगामध्ये प्रामुख्याने देशी हरभरा वापरला जातो.
  • हरभरा पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ,  क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. 
  • सिंचन व्यवस्था असल्यास उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येते.
  • बागायत हरभरा पिकाची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करता येते.
  • बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बीजप्रकीया आणि जिवाणू संवर्धन करून घ्यावे. 
  • हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान, जमिनीत पुरेशा ओलावा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असे वातावरण मानवते.
  • पीक विशेषतः २० दिवसांचे झाल्यावर किमान तापमान १० अंश ते १५ अंश आणि कमाल तापमान २५ अंश ते ३० अंश सेल्सिअस असेल तर पिकाची वाढ चांगली होते.
  • सिंचनाचे नियोजन 

  • जमिनीत ओलावा खूप कमी असल्यास व एखादे पाणी देणे शक्य असल्यास हरभरा पीक घाटे धरतेवेळी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी फुले येऊ लागताच आणि दुसरे पाणी घाटे धरतेवेळी द्यावे.  
  • हरभरा हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते. उत्पादनात घट होते. पीक उभळणार नाही, याकडे लक्ष द्यावे.शक्य असल्यास पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.   
  • करडई     

  • करडई हे पीक रब्बी हंगामातील एक मुख्य तेलवर्गीय पीक आहे. 
  • करडई पीक कमी पाण्यासाठी किंवा अपुऱ्या ओलाव्यासाठी सहनशील आहे.
  • करडई पिकासाठी २२ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल आहे. उगवणीच्या कालावधीत सरासरी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश  सेल्सिअस तर किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस असावे.
  • पीक फुलोऱ्यात असताना सरासरी कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ ते १३ अंश सेल्सिअस असल्यास चांगले उत्पादन मिळते.
  • करडई पिकात पाणी साचून राहिल्यास पिकावर त्याचा वाईट परिणाम होतो.
  • फुलोरा ते दाणे भरणे या मुख्य अवस्था आहेत. या कालावधीत जमिनीत योग्य ओलावा असल्यास चांगले उत्पादन मिळते. पाणी उपलब्ध असल्यास या कालावधीत पाणी व्यवस्थापन करावे.
  • जवस 

  • बागायती जवस पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते.
  • लागवडीसाठी मध्यम ते भारी,ओलावा टिकवून ठेवणारी जमीन असावी.
  • जवस हे थंड हंगामातील पीक असून मुख्यतः रब्बी हंगामात घेतले जाते. जवस पिकाच्या वाढीसाठी उष्ण आणि थंड हवामान अनुकूल आहे. 
  • जवस  पिकासाठी १० ते ३८ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल आहे. उगवण ते वाढीच्या अवस्थेत सरासरी तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस आणि दाणे भरणे अवस्थेत सरासरी १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान असल्यास चांगले उत्पादन मिळते.
  • दाणे भरण्याच्या काळात जमिनीत योग्य ओलावा नसल्यास उत्पादनात व पिकाच्या प्रतीमध्ये घट होते. पाणी उपलब्ध असल्यास पीक फुलोऱ्यात असताना आणि बोंड्या धरण्याच्या कालावधीत योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास जवळपास उत्पादनात दुप्पट वाढ मिळू शकते.
  • गहू 

  • गहू हे एक रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे.
  • गव्हाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते.
  • गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.
  • ञपेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करून घ्यावी.
  • प्रथम जमीन ओलावून घ्यावी आणि चांगला वापसा आल्यावर (पुरेशी थंडी सुरु झाल्यावर) १० ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान पेरणी करावी.
  • बागायती गव्हाची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत केली तरी चालते.
  • सिंचन व्यवस्थापन

  • पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास कांडी धरण्याची अवस्था असताना पाणी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत तर दुसरे पीक फुलोरा ते चीक धरण्याच्या अवस्थेत असताना द्यावे.
  • तीन पाणी देणे शक्य असल्यास मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी, कांडी  धरण्याची अवस्थेत, तर तिसरे पीक फुलोरा ते चीक धरण्याच्या अवस्थेत असताना द्यावे.
  • महत्त्वाचे मुद्दे 

  • बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रकीया आणि जीवाणू संवर्धन करून घ्यावे. 
  • ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी गव्हाऐवजी, हरभरा, मोहरी, सूर्यफूल ही पिके पेरावीत.
  • पेरणीच्या वेळी द्यायची मिश्र किंवा संयुक्त खते जमिनीत पेरूनच द्यावीत.
  • शक्यतो रब्बी पिकांची पेरणी दक्षिणोत्तर दिशेने करावी, यामुळे पिकांना भरपूर सूर्यप्रकाश व वाढीस पोषक वातावरण मिळते.
  • कोरडवाहू फळ झाडांना आच्छादनाचा व मटका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.येत्या काळात केळीच्या बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळीच पाणी द्यावे. पाण्याची बचत करण्यासाठी फळ झाडांना शक्यतो ठिबक संचाद्वारे व पिकांना तुषार सिंचनाद्वारे  पाणी द्यावे.
  • पाण्याची कमतरता असल्यास एक सरी आड पाणी द्यावे.
  • रब्बी हंगामातील पिकांची पेरणी उशिरा करावी लागणार आहे, तिथे लवकर तयार होणारी आणि कीड रोगास बळी न पडणाऱ्या वाणांची निवड करावी. पेरणीनंतर लगेच पाणी देण्यासाठी सारे पाडावेत.
  • कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करावी. कापूस वेचताना त्यात काडीकचरा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. कपाशी ओलसर असल्यास स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवून कोरड्या जागेत साठवण करावी. तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात.
  • जमिनीतून होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी योग्य आच्छादनाचा वापर करावा. यामुळे पाणी व्यवस्थापन केल्यास पाणी बचत होते. जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकांची अवस्था व हवामान यांचा विचार करून पाण्याच्या पाळ्यामधील अंतर ठरवावे. ताण पडू देता सिंचन व्यवस्थापन करावे.
  • पीक फुलोऱ्यात असताना व फळाची वाढ होत असताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक असते. या काळात पाण्याचा पिकांना ताण पडल्यास उत्पादनात घट होते. यामुळे या काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे.
  • बीजप्रक्रिया ः गहू, ज्वारी, करडई, जवस बियाण्यास पेरणीपूर्वी २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात अ‍ॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धन यांची बीजप्रक्रिया करून घ्यावी.
  • हरभरा बियाण्यास पेरणीपूर्वी २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात रायझोबियम व स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धन यांची बीजप्रक्रिया करावी.
  • रब्बी ज्वारी 

  • ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. 
  • रब्बी ज्वारीसाठी मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. पाण्याची सोय असल्यास पेरणी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत करता येते.
  • शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर दिशेने करावी. यामुळे पिकांना भरपूर सूर्यप्रकाश व वाढीस पोषक वातावरण मिळते.
  • पिकाला ताण बसल्यास व ओलिताची सोय उपलब्ध असल्यास १ ते २ संरक्षित पाणी द्यावे. शक्य असल्यास पाणी तुषार सिंचन पद्धतीने दिल्यास फायदेशीर ठरते. 
  • संपर्क : डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२  (अखिल भारतीय समन्वयक संशोधन कृषी हवामानशास्त्र योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com