ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन

नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या थंडीमुळे सध्याच्या तापमानामध्येही मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. सकाळी धुके, दव व थंड वातावरणामुळे उसाच्या पानावर बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी व प्रसारासाठी अनुकूल हवामान तयार होत आहे.
rust disease in sugarcane
rust disease in sugarcane

पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या पावसामुळे हवेमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक सापेक्ष आर्द्रता तयार झाली. तसेच नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या थंडीमुळे सध्याच्या तापमानामध्येही मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. सकाळी धुके, दव व थंड वातावरणामुळे उसाच्या पानावर बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी व प्रसारासाठी अनुकूल हवामान तयार होत आहे.  सध्या १५ जुलै ते १५ ऑगस्ट या काळात लागवड झालेल्या आडसाली उसावर तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये आडसाली हंगामासाठी लागवड केलेल्या सर्व प्रचलित जातींवर याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनुकूल वातावरणामुळे आडसाली उसामधील ऊस संख्या, कांड्याची लांबी व गोलाईवर परिणाम होतो. साहजिकच ऊस उत्पादन व उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो.  लागवडीसाठी रोगग्रस्त बेण्याचा वापर, नियंत्रण उपाययोजनांचा वेळीच अवलंब न करणे यामुळे उसावरील रोगाचे प्रमाण वाढत आहे. उसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी तांबेरा रोगाचे सामूहिकरीत्या प्रभावी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. लक्षणे 

  • उसाच्या पानावर तांबेरा हा रोग पुक्सिनिया मिल्यानोसेफिला व पुक्सिनिया कुहिनीय या दोन बुरशींमुळे होतो. ही बुरशी फक्त ऊस पिकावर उपजीविका करते. 
  • सुरुवातीस बुरशीचा प्रादुर्भाव पानांच्या दोन्ही बाजूंस होऊन पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसतात.  
  • कालांतराने ठिपके लालसर तपकिरी होतात. ठिपक्यांच्या भोवती फिकट पिवळसर हिरवी कडा तयार होते. पानांच्या खालच्या बाजूस ठिपक्यांच्या जागेवर उंचवटे तयार होतात. असे ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. हवेद्वारे हे बिजाणू विखुरले जाऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो. 
  • रोगग्रस्त ठिपक्यांतील पेशी मरून पाने करपतात. प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळे येऊन उत्पादन घटते. साखर निर्मितीवरसुद्धा परिणाम होतो. 
  • रोग वाढीस अनुकूल बाबी 

  • सकाळचे धुके, दव व थंड वातावरण 
  • बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड
  • नत्र खतांचा आडसाली उसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वापर 
  • व्यवस्थापन  ऊस पिकाचे सर्वेक्षण करून, रोगांची लक्षणे, तीव्रता व पिकाची अवस्था पाहून उपाययोजना कराव्यात.

  • प्रतिबंधक शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.  
  • निरोगी बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.
  • रोगप्रतिकारक्षम जातीची (को ८६०३२) लागवड करावी. 
  • योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत ऊस लागवड करावी.
  • लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास उसामध्ये सूर्यप्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
  •  नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • नियंत्रण   जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर (फवारणी प्रति लिटर पाणी) 

  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम अथवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि. 
  • गरजेनुसार १०-१५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करून २-३ वेळा फवारणी करावी.
  • बुरशीचा जीवनक्रम व रोगाचा प्रसार  उसाच्या पानावर दवाच्या स्वरूपातील असलेले पाणी प्रामुख्याने रोगवाढीसाठी महत्त्वाचा व अनुकूल घटक आहे. पानावर ओलसरपणा असताना बिजाणू रुजून बुरशी तयार होते. ही बुरशी पानांच्या आंतरभागात प्रवेश करून रोगनिर्मिती करते. पानामध्ये रोगनिर्मिती प्रक्रिया सुरू झाल्यापासून ३ ते ४ दिवसांत पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसतात. दोन आठवड्यांत नारंगी / तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. रोगाचा जीवनक्रम १० ते १२ दिवस इतक्या कमी कालावधीत पूर्ण होतो. प्रामुख्याने या रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो. या रोगाचा प्रसार बेण्यामार्फत अगदी कमी प्रमाणात होतो.  संपर्क ः डॉ. भरत रासकर, ९९६०८०२०२८ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com