agriculture news in marathi management of wild boar | Page 2 ||| Agrowon

सामुहिक पद्धतीने करा रानडुक्करांचे नियंत्रण

डॉ. प्रशांत उंबरकर, डॉ. निलेश वझीरे, प्रविण देशपांडे
शनिवार, 23 मे 2020

रानडुक्कर प्रामुख्याने रात्री आणि पहाटे सुर्योदयापुर्वी सक्रिय असतात. रानडुक्करांच्या नियंत्रणासाठी शेताच्या बाजूने नैसर्गिक कुंपण करावे. याचबरोबरीने सामुहिक पद्धतीने भौतिक, रासायनिक पद्धतींचा अवलंबदेखील फायदेशीर ठरतो.
 

रानडुक्कर प्रामुख्याने रात्री आणि पहाटे सुर्योदयापुर्वी सक्रिय असतात. रानडुक्करांच्या नियंत्रणासाठी शेताच्या बाजूने नैसर्गिक कुंपण करावे. याचबरोबरीने सामुहिक पद्धतीने भौतिक, रासायनिक पद्धतींचा अवलंबदेखील फायदेशीर ठरतो.

रानडुक्कर ऊस, मका, ज्वारी, तूर, हरभरा, भुईमूग, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. रानडुक्कर प्रामुख्याने रात्री आणि पहाटे सूर्योदयापूर्वी सक्रिय असतात. त्यांची डोळ्यांनी बघण्याची क्षमता कमी असली तरी हुंगण्याची क्षमता उत्तम असल्यामुळे ते दूर अंतरावरील पिकांचा शोध घेतात.

रानडुक्कराचे खाद्य
कंद मुळे, झाडाखाली पडलेली फळे, कोवळे कोंब तसेच शेतातील कंदवर्गीय तण जसे लव्हाळा देखील रानडुक्कर खाते. त्याचप्रमाणे किडे, प्राण्यांचे मांस, साप व इतर प्राण्यांवर देखील ते उपजीविका करतात. रानडुक्कर अन्न शोधण्यासाठी डोळ्यांपेक्षा नाकाचा उपयोग जास्त करतात. हुंगून शोधलेले अन्न खोदण्यासाठी ते पुढचे पाय आणि सुळ्यांचा वापर करतात. त्यामुळे शेतात बऱ्याच ठिकाणी जमीन उकरलेली दिसते.

नियंत्रणाच्या पद्धती
जैविक अडथळा पद्धत

 • शेताच्या बाजूने नैसर्गिक कुंपण म्हणून काटेवर्गीय उदा. करवंद, सागरगोटा, निवडुंग इत्यादी वृक्षांची लागवड करावी. यामुळे रानडुक्करांना शेतामध्ये येण्यास अडथळा निर्माण होतो.
 • भुईमुगाच्या पिकाभोवती करडईच्या चार ओळी लावाव्यात.
 • मका पिकाभोवती एरंडीच्या चार ओळी लावाव्यात.

रासायनिक आणि रसायन विरहित पद्धती

 • २० मिलि अंड्याचा बलक प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची पिकावर फवारणी करावी. या नैसर्गिक गंधामुळे होणारे नुकसान ५५ ते ७० टक्केपर्यंत कमी होते.
 • फोरेट या रसायनांचा वास अतिशय तीव्र असल्यामुळे शेतातील पिकांचा वास रानडुक्करापर्यंत पोहचत नाही. रेतीमध्ये फोरेट २०० ग्रॅम मिसळून सछिद्र पॉलिथिन किंवा कापडी पिशवीमध्ये बांधून घ्यावे. ही पिशवी पिकाच्या कडेला बांबूच्या सहायाने जमिनीपासून १०० सें.मी. उंच आणि ३ मीटर लांबीवर लावावी. यामुळे पिकाचे नुकसान ५० ते ६० टक्क्यांनी कमी होते. या शेताच्या जवळ जनावरांना चरायला सोडू नये.
 • नारळ काथ्याची जाड दोरी केरोसीनमध्ये भिजवून पिकाच्या चारही बाजूला जमिनीपासून एक फूट उंचीवर असे एकूण तीन थर बांधावेत. केरोसीनच्या वासामुळे रानडुक्कर पिकाचे नुकसान करत नाही.
 • नारळाची दोरी सल्फर आणि डुक्करापासून तयार केलेल्या तेलाच्या मिश्रणामध्ये भिजवून घ्यावी. पिकाच्या चारही बाजूने लाकडी काठीच्या सहायाने पिकापासून एक फूट अंतरावर तीन फूट उंचीचे नारळाच्या दोरीचे कुंपण लावावे. यामुळे एक विशिष्ट प्रकारचा वास येत असल्यामुळे रानडुक्कर या भागात येत नाही. नारळाची दोरी १० दिवसांच्या अंतराने भिजवून वरील प्रमाणे लावल्यास जवळपास ६० ते ८० टक्के नुकसान कमी होण्यास मदत होते.
 • दोरीला ३० मिनिटे एरंडी अर्काच्या मिश्रणात भिजवून जमिनीपासून एक फुटावर लावावे. असे एकूण तीन थर शेताच्या चारही बाजूने लावावेत. एरंडीच्या अर्काच्या वासामुळे रानडुक्कर येत नाही.

पारंपारिक पद्धती 
मानवी केसांचा वापर

रानडुक्कराचे डोळे कमी विकसित असल्यामुळे ते वास घेऊनच खाद्याचा शोध घेते. जमिनीचा वास घेत रानडुक्कर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. न्हाव्याच्या दुकानातील नवीन केस गोळा करून शेताच्या बांधावर टाकावेत. यामुळे त्यांना वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.

रंगीत साड्यांचा उपयोग 
पिकाच्या चारही बाजूने वेगवेगळ्या रंगाच्या साड्या लावाव्यात. यामुळे रानडुक्करांना मानवी उपस्थितीचा आभास होतो आणि अशा भागात येणे टाळतात.

इलेक्‍ट्रॉनिक भोंग्याचा वापर
या उपकरणामध्ये स्पिकर ऍम्पीलीफायर आणि सोलर चार्जिंग युनिट असते. हा भोंगा लाकडी स्टॅंडवर लावला जातो. यात रानडुक्करांमध्ये भिती निर्माण करण्याकरिता विविध प्राण्यांचे आवाज विशिष्ट क्रमाने लावलेले असतात. दर तीन दिवसानंतर आवाजामध्ये बदल करण्यात येतो. या भोंग्याची किंमत १० ते १५ हजार रुपये इतकी आहे. हा भोंगा शेतामध्ये लावल्यामुळे जवळपास ४ ते ५ एकर परिसर संरक्षित होतो.

भौतिक पद्धती 

 • पिकांचे संरक्षण करण्याकरिता शेताभोवती साधारण ३ फूट रुंद आणि ३ फूट खोल चर खोदावेत. चर केल्यामुळे रानडुक्कर शेतामध्ये येण्याची शक्‍यता कमी असते.
 • शेताभोवती तीन पदरी तारांचे कुंपण करावे. या तीन पदरांमध्ये एक फूट अंतर ठेवावे. यामुळे त्यांना शेतामध्ये यायला अडथळा निर्माण होईल.
 • शेताभोवती पिकांपासून एक फूट अंतरावर चारही बाजूने गोलाकार टोकदार पात्याचे तार कुंपण लावावे.
 • शेताच्या चारही बाजूने पिकापासून एक फूट अंतरावर तीन फूट उंचीचे साखळी जोडणीयुक्त तारांचे कुंपण लावावे.
 • पिकांपासून एक फूट अंतरावर जमिनीलगत बांबूच्या साहाय्याने शेताभोवती मत्सजाळ्याचे कुंपण उभारावे. यामुळे रानडुक्करांचे पाय मत्स जाळ्यामध्ये अडकतात.
 • शेताभोवती सौरउर्जाचलित कुंपण उभारावे. या कुंपणामध्ये तारेतून १२ व्होल्ट विद्युत वहन होते. त्यामुळे वन्य प्राण्यांना विजेचा झटका बसतो. मात्र जीवित हानी होत नाही. फक्त त्यांच्यामध्ये भिती निर्माण होते.

संपर्क - डॉ. प्रशांत उंबरकर, ९४२११३८९३६
(कृषी विज्ञान केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)


इतर ताज्या घडामोडी
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनकोरडवाहू शेतीमध्ये पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
पुण्यातील पश्चिम तालुक्यांत हायअलर्ट...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८...
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वांनी...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड अत्यंत...
कोरोनाच्या संकटात कृषी, पणन खाते अपयशी...नाशिक : ‘‘कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा...
परभणी जिल्ह्यात पीककर्जासाठी पेरणीच्या...परभणी : जिल्ह्यातील अनेक गावातील तलाठी पीककर्ज...