रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३ कोटी मंजूर

वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या आंबा, काजू बागायतदारांना विमा परताव्याचा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बागायतदारांसाठी ५३ कोटी ३५ लाख ९० हजार ७१८ रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे.
Mango, cashew insurance return Rs 53 crore sanctioned
Mango, cashew insurance return Rs 53 crore sanctioned

रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या आंबा, काजू बागायतदारांना विमा परताव्याचा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बागायतदारांसाठी ५३ कोटी ३५ लाख ९० हजार ७१८ रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे. १४ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रावरील बागांचा विमा उतरवण्यात आला होता; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी परतावा मंजूर झाला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रामुख्याने आंबा, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगवान वारे आणि गारपीट यामुळे फळ पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. सर्वाधिक फटका किनारी भागातील बागांना बसलेला आहे. यामधून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विमा योजना लागू करण्यात आला आहे.

स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल केले जातात. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील २४ हजार ६४४ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. त्यातील २१ हजार ३५१ आंबा आणि ३ हजार २९३ काजू बागायतदार आहेत. त्यात आंब्यासाठी ५० कोटी ७६ लाख रुपये, तर काजूचे २ कोटी ५९ लाखाचा परतावा आहे. गतवर्षी जिल्ह्याला विक्रमी ८४ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला होता. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या हप्ता वाढूनही परतावा तुलनेत पन्नास टक्केच मिळाला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत विमा उतरवण्याचा कालावधी होता. जानेवारीपासून होणाऱ्या बदलांवर आधारित विमा रक्कम दिली जाणार आहे. सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हंगामा केला. अचानक आलेल्या पावसामुळे फळगळ झाली होती.

तौक्तेच्या नुकसानीचे काय? मे महिन्याच्या तिसऱ्या टप्प्यात तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. परंतु विमा कालावधी १५ मे रोजी संपुष्टात आला आणि दुसऱ्या दिवशी वादळ धडकले. या कालावधीत मोठे नुकसान झाले होते, पण कालावधी संपल्याने त्याचा समावेश परताव्यात नाही.

रकमेची प्रतीक्षाच कालावधी संपल्यानंतर चार महिने झाले तरीही विमा परतावा मिळालेला नाही. सध्या विमा कंपनीकडून परतावा मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाकडून हप्त्यापोटीची रक्कम विमा कंपनीकडे जमा केलेली नसल्यामुळे प्रत्यक्ष परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी कालावधी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com