आंबा बागावरील संकटाचे ढग गडद

​ आंब्यासाठी यंदाचं वर्ष ‘ऑफ इयर’च दिसत. अजूनही बहरासाठी पोषक व आवश्यक वातावरण नाही त्यामुळे बहराचा प्रश्न कायम आहे - डॉ. एम. बी. पाटील, फळबाग संशोधन केंद्रप्रमुख, हिमायतबाग, औरंगाबाद.
mango flowering
mango flowering

औरंगाबाद ः पोषक वातावरणाची निर्मिती न झाल्याने यंदा आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे असून, त्यामुळे केशरची चव किती प्रमाणात चाखायला मिळेल हा प्रश्न आहे. दुसरीकडे आंबे बहरासाठी ताणाचा कालावधी न संपलेल्या मात्र ऑक्टोबरच्या अवेळी पावसानंतर आता पुन्हा पाऊस झालेल्या मोसंबी बागांच्या आंबेबहराच ताळतंत्र बिघडलं आहे.  आंब्याला चांगला बहरासाठी पावसाळ्यानंतर ऑक्टोबर हिट व साधारणतः एकवीस दिवस रात्रीचे तापमान सतत १४ डिग्री खाली असणे आवश्यक असते. यंदा मात्र तसं अजून झालेले नाही. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये अवेळी पावसामुळे ना आक्टोबर हिट जाणवली ना त्यानंतर थंडी पडली. त्यामुळे यंदा आंब्याचा खासकरून केशर आंब्याच्या उत्पादनाचा मार्ग खडतर असल्याचे तज्ज्ञ व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले होते. आता डिसेंबर संपून चालला, तरी आंब्याला बहरण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत नसल्याने आंबा बागावरील चिंतेचे ढग अधिक गडद झाल्याचे मत हिमायतबाग फळसंशोधन केंद्राचे प्रमुख डॉ एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.  बदनापूरच्या मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील म्हणाले, की नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान मोसंबीच्या बागा आंबे बहरासाठी ताणावर सोडल्या जातात. त्या बागांमध्ये पाऊस झाला त्यांच्या ताणाच्या कालावधीत खोडा घातला गेला आहे. त्यामुळे मोसंबी बागांमधील झाडांना फुला ऐवजी पालवी फुटण्याची शक्यता जास्त आहे. लिंबूची हीच अवस्था आहे. दुसरीकडे मोसंबी भागात मृग बहराची फळ असणाऱ्या मात्र पाऊस झालेल्या भागांमध्ये फळ पोसण्यासाठी पाऊस फायद्याचा ठरेल. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसानंतर आंब्याच्या झाडांना बहराएवजी नवती फुटली होती. ही नवती केशर च्या उत्पादनावर तसेच आधीच लांबणीवर असणाऱ्या केशरचा हंगाम आणखी लांबणीवर टाकण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत होते. प्रतिक्रिया आंबे बहराचा ताणाचा कालावधी न संपलेल्या काही मोसंबी भागांमध्ये पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे त्यांच्या ताणाचं ताळतंत्र बिघडलं. दुसरीकडे मृग बहाराचे नियोजन असलेल्या बागांमधील फळ पोसण्यासाठी त्या भागांमध्ये झालेला पाऊस फायद्याचा आहे. - डॉ. संजय पाटील, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना.

आंब्याला थोडाबहुत आलेला बहर पाऊस वातावरणाने जळून गेला आहे. पोषक वातावरण नसल्याने आंब्याला बाहेर येईना. डिंकाचे प्रमाणही बागेमध्ये वाढले आहे. सूर्यग्रहण सुटलं पण आंब्याच ग्रहण काही सुटण्याचा नाव घेईना. - मिठुभाऊ चव्हाण, आंबा उत्पादक, भांडेगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com