गारपिटीने आंबा डागाळला

बदलत्या वातावरणाच्या तडाख्यात सापडलेल्या आंबा बागायतदारांना चार दिवसांपूर्वी पडलेल्या गारांच्या पावसाने दणका दिला.
mango damage
mango damage

रत्नागिरी ः बदलत्या वातावरणाच्या तडाख्यात सापडलेल्या आंबा बागायतदारांना चार दिवसांपूर्वी पडलेल्या गारांच्या पावसाने दणका दिला. रत्नागिरी तालुक्यातील करबुडे, वेतोशीही जाकादेवी परिसरातील सुपारीएवढ्या गारा पडल्या. त्यामुळे कैरीवर डाग पडलेले आहेत. त्यामुळे या परिसरात मोठे नुकसान झाले असून, त्याचे सर्व्हेक्षण व्हावे, अशी मागणी होत आहे. 

चार दिवसांपूर्वी मुसळधार पावसासह पडलेल्या गारांनी हापूसचे नुकसान केले. फेब्रुवारी महिन्यात कोकणात कधीच गारपीट झालेली नाही. बदलत्या वातावरणामुळे आंबा बागायतदार त्रस्त झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात करबुडे, वेतोशी, नेवरेसह लांजा तालुक्यात पालू आणि परिसरात गारपीट झाली. नोव्हेंबर, डिसेंबर कालावधीत आलेल्या मोहोराला फळधारणा होत आहे. अनेक ठिकाणी सुपारीएवढी कैरी लागलेली आहे. या अवस्थेत मुसळधार पावसासह गारा पडल्यामुळे त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत गारांचा आकार मोठा होता. त्या वेगाने कैरीवर येऊन आदळल्याने नुकसान झाले आहे. कैऱ्यांवर डाग पडलेले आहेत. डागाळलेली कैरीचा भाग कुजण्याची शक्यता आहे. करबुडे, वेतोशी परिसरासह जाकादेवी, चाफे येथील आंबा बागायतदारांना गारांमुळे नुकसान सहन करावे लागणार आहे. 

यंदा आंबा उशिराने आणि कमी राहणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामध्ये गारांनी केलेल्या नुकसानीने बागायतदारांचे आर्थिक गणितच कोलमडण्याची भीती आहे. मुसळधार पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करण्याशिवाय बागायतदारांपुढे पर्याय उरलेला नाही. गेले दोन दिवस बागायतदार कीटकनाशक दुकानात चकरा मारत आहेत. पावसामुळे नुकसान झाले असले तरीही आवश्यक भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अशक्य आहे. राज्यात सगळीकडेच गारांचा पाऊस झाला असल्याने सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. रत्नागिरीतही बाधित बागायतदारांची माहिती एकत्रित करण्याच्या सूचना तालुकास्तरावर प्राप्त झालेल्या आहेत.  विम्याच्या लाभाबाबत साशंकता  आंबिया बहरासाठी विमा योजना यंदा लागू केली आहे; परंतु त्याचे निकष बदलण्यात आल्याने यंदा नुकसान होऊनही लाभ मिळणे अशक्य आहे. सलग २५ मिलिमीटर पाऊस पडला, तर लाभासाठी शेतकरी पात्र ठरणार आहे. चार दिवसांपूर्वी बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरीही २५ मि.मी. नोंद झालेली नाही. त्यामुळे परतावा मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरणे अशक्य आहेत. 

प्रतिक्रिया गारा पडलेल्या परिसरातील बागांमध्ये कैरीची स्थिती गंभीर आहे. याची दखल शासनाने घेतली पाहिजे. यंदा वातावरणातील बदलामुळे पीक कमी राहणार आहे. याचा विचार करणे आवश्यक आहे.  - राजेंद्र कदम, बागायतदार, करबुडे, जि. रत्नागिरी 

मुसळधार पाऊस, गारांमुळे यंदाच्या हंगाम अडचणीत आला आहे. भुरी, अ‍ॅथ्रॅक्सनोजसह करप्याचा ॲटॅक हापूसवर होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पालवीला मोहोरच फुटलेला नसल्याने मे महिन्याच्या अखेरीस आंबाच दिसणार नाही. फळाच्या दर्जावर परिणाम होणार असून औषध फवारण्यांच्या खर्चात वाढ होईल.  - आनंद देसाई, बागायतदार, पावस, जि. रत्नागिरी     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com