नाशिकच्या 'कृषक'मधून होणारी आंब्याची निर्यात ठप्प 

जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणू संशोधन केंद्राच्या (मुंबई) कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन एप्रिल महिन्यापासून आंबा निर्यात सुरू होते.
hapus
hapus

नाशिक: जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणू संशोधन केंद्राच्या (मुंबई) कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन एप्रिल महिन्यापासून आंबा निर्यात सुरू होते. हा आंबा अमेरिका, ऑस्ट्रेलियात निर्यात होतो. मात्र, ऐन हंगामात टाळेबंदीमुळे येथे आंब्यावरील विकिरण प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. त्यातच विमानसेवाही बंद असल्याने निर्यात थांबली आहे. मागील वर्षी ६८९ टन आंबा निर्यात झाला होता. चालू वर्षी १ हजार टनाचे उद्दिष्ट असताना कामकाज ठप्प झाले आहे, अशी माहिती 'कृषक'चे निवासी विकिरण सुरक्षा अधिकारी संजय आहेर यांनी दिली.  भारतीय आंब्याच्या हापूससह केशर, बदामी, रत्ना, चौथा, लंगडा व पायरी या वाणांची यापूर्वी प्रक्रिया करून निर्यात झालेली आहे. याकामी मुंबई येथील अॅग्रोसर्ज ईरेडियेटर्स (इंडिया) प्रा.लि. कंपनीचे व्यवस्थापन कार्यरत आहे. कामकाज सुरू झाल्यानंतर अमेरिका येथील कृषी विभाग व भारत सरकारद्वारा फाइटोसॅनरी प्रमाणपत्र देऊन काटेकोर व्यवस्थापन कार्यरत असते. यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच कोरोना प्रदूर्भावामुळे अमेरिकेतील निरीक्षक अद्याप या केंद्रात पर्यवेक्षणासाठी आलेले नाहीत. त्यामुळे आता आंबा निर्यातीची शक्‍यता धूसर आहे.  मागील वर्षी आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन मागणी चांगली राहिल्याने गेल्या ५ वर्षातील विक्रम मोडीत निघाले होते. अमेरिकेत प्रामुख्याने कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यूजर्सी, होस्टन, सॅन अंतानिओ, फिनिक्स या शहरांमध्ये प्रमुख मागणी नोंदविली गेली होती. या प्रकल्पाची क्षमता अधिक असल्याने मुख्यत्वे लासलगाव केंद्र विकिरण प्रक्रियेसाठी महत्वपूर्ण मानले जाते.  अमेरिकेन मानकाप्रमाणे निर्यातपूर्व आंब्यावर विकिरण प्रक्रिया केली जाते. गॅमा किरणांचा मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढव‌िली जाते. मात्र टाळेबंदीचा परिणाम या केंद्रावर झाल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे. 

२५ कोटींवर फटका  लासलगावहून दर वर्षी एप्रिल ते जुलैदरम्यान विकिरण प्रक्रिया होऊन अमेरिका व ऑस्ट्रेलियात आंबा पाठविला जातो. त्यामुळे चालू वर्षी २५ कोटींवर फटका बसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. ३१ ऑक्टोबर २००२ रोजी लासलगाव येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते भाभा अणू संशोधन केंद्राच्या माध्यमातून कांदा विकिरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. हा प्रकल्प कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी आहे मात्र सध्या तो आंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यासाठी वापरला जातो.  गेल्या पाच वर्षातील आंबा निर्यातीचा आढावा: 

वर्ष आंब्याची निर्यात(टन) 
२०१५ ३५० 
२०१६ ५४४ 
२०१७ ५६७ 
२०१८ ४९० 
२०१९ ६८९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com