लासूर (ता. चोपडा, जि.
अॅग्रो विशेष
बदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंब
रत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण बदलले असून, त्याचा परिणाम संवेदनशील आंबा पिकावर होत आहे. सध्या पालवलेल्या कलमांवर मोहर येण्याची स्थिती आहे; मात्र पाऊस, ढगाळ वातावरणाने मोहराला उशीर होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहरासह पालवीला कीड लागण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे.
रत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण बदलले असून, त्याचा परिणाम संवेदनशील आंबा पिकावर होत आहे. सध्या पालवलेल्या कलमांवर मोहर येण्याची स्थिती आहे; मात्र पाऊस, ढगाळ वातावरणाने मोहराला उशीर होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहरासह पालवीला कीड लागण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवर, तर सिंधुदुर्गात ३० हजार हेक्टरवर आंब्याची लागवड होते. यंदा दोन मोठ्या चक्रीवादळांमुळे पाऊस लांबला आहे. त्याचा फटका आंबा पिकाला बसला आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला २५ ते ३० टक्के कलमांना फूट येते. तर देवगड भागातील कलमांना ४० टक्के फूट येते. त्यानंतर थंडी पडली की डिसेंबरअखेरीस कणी तयार होऊ लागते. पुढे आंबा तयार होण्यासाठी मार्च महिना उजाडतो; परंतु यंदा ऋतुचक्रच बदलले असून, थंडीचा अद्याप पत्ता नाही.
जिल्ह्यात काही भागांमध्ये कलमांना मोहर आला आहे. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या बदलत्या वातावरणात हा मोहर किती टिकेल हे सांगणे शक्यच नाही. पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने मोहरावर परिणाम झाला आहे. गेले दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण असून, मोहर अद्यापही आलेला नाही. फक्त काही पालवीवर मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. त्याला थंडी आवश्यक आहे. मात्र, अद्यापही थंडी पडलेली नाही.
पालवीसह आलेल्या मोहरावर ढगाळ वातावरणामुळे कीड रोगांसह तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंबा उत्पादनावर परिणाम निश्चित होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात किती उत्पादन येणार यावरच बागायतदारांचे आर्थिक गणित अवलंबून राहणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे म्हणाले, की मोहर उशिरा आल्यानंतर त्याला आवश्यक थंडी पडली पाहिजे. तरच आलेल्या मोहराला फळधारणा होऊ शकते.
सुधारित जातीच्या काजू पिकांवर चांगल्या पद्धतीने मोहर येण्यास सुरुवात झाला आहे; मात्र गावठी जातींना मोहर येण्याची प्रक्रिया लांबणार आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे मोहरावर टी मॉस्किटो कीड पसरण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी मोहर करपतोय, पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. यंदाचा हंगाम आंब्यापेक्षा काजूला चांगला राहील, असे रत्नागिरी तालुक्यातील काजू बागायतदार एन. व्ही. बापट यांनी सांगितले.