रत्नागिरीत आंबा बागायतदारांचे आज आंदोलन

रत्नागिरीत आंबा बागायतदारांचे आज आंदोलन
रत्नागिरीत आंबा बागायतदारांचे आज आंदोलन

रत्नागिरी ः यंदा रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्केच होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून कोकणातील आंबा बागायतदारांना कर्जमाफी मिळावी. यासह २०१५-१६ या वर्षात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली व्याजमाफीचाही लाभ दिला गेलेला नाही, यासाठी आंबा बागायतदाराचे मंगळवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकदिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे.

पावस पंचक्रोशी आंबा उत्पादक संघ, हापूस आंबा उत्पादक संघ रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी हापूस आंबा उत्पादक संघ व समृद्ध कोकण संघटना एकवटल्या आहेत. कोकणातील आंबा बागायतदारांचा विमा उतरवताना अनेक अडचणी आहेत. त्या प्राधान्याने सोडवल्या पाहिजेत. हापुसचा ब्रँड विकसित करून, देशात दलालीशिवाय थेट आंबा विक्री व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. 

पुढील वर्षी मुंबई-पुणे आणि राज्यातील प्रमुख शहरात शंभर ठिकाणी दोन महिन्यांकरिता एप्रिल-मे महाराष्ट्र शासनाने आंबा बाजार आयोजित करावा, हापूस खात्रीने मिळण्याच्या व्यवस्था निर्माण कराव्यात, बाजारात हापूस उत्पादकांना शेतकऱ्यांना त्यांच्या गटांना विनामूल्य स्टॉल्स उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही मागणी बागायतदारांकडून केली जात आहे. याशिवाय विमानतळ बस डेपो राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून थेट आंबा विक्री व्यवस्था निर्माण करावी. 

२०१४ मध्ये आंबा बागायतदारांना व्याजमाफी सरकारने दिली होती ती अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. कोकणातील मुख्य पिके आंबा-काजू असून, सरकारने आंबा-काजू बोर्ड स्थापन केले; मात्र ते कधीच सुरू झाले नाही. या बोर्डाला दरवर्षी ५०० कोटी निधी अर्थसंकल्पात तरतूद करून कोकणातील बागायतदारांच्या विकासाच्या, मार्केटिंग सुविधा उभारणे आवश्यक आहे, या मागण्या शासनापुढे मांडल्या जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com