आंब्याचे उत्पादन दहा टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता 

ढगाळ वातावरणासह पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकावर कीडरोग, तुडतुड्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन आंब्याचे उत्पादन सुमारे दहा टक्के घटण्याची शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे;
आंब्याचे उत्पादन दहा टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता  Mango production is likely to decline by ten per cent
आंब्याचे उत्पादन दहा टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता  Mango production is likely to decline by ten per cent

अलिबाग : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये रिमझीम पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरणासह पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकावर कीडरोग, तुडतुड्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन आंब्याचे उत्पादन सुमारे दहा टक्के घटण्याची शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे; मात्र शेतकऱ्यांनी वेळीच औषध फवारणी केल्यास हा धोका टाळता येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.  जिल्ह्यात सुमारे १४ हजार हेक्‍टर आंब्याचे क्षेत्र असून, उत्पादनाचे क्षेत्र १२ हजार ५०४ हेक्टर इतके आहे. आंब्याची लागवड करणारे जिल्ह्यात ३५ हजारांहून अधिक शेतकरी आहेत. जिल्ह्यातील आंब्याला नवी मुंबईपासून मुंबई, पुणे तसेच अन्य राज्यात, देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आंब्याला मोहर येण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुखावून गेला होता; परंतु अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने रायगड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अलिबाग, खालापूर, महाड अशा अनेक तालुक्‍यांमध्ये रिमझीम पाऊस पडला. या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ढगाळ वातावरणासह रिमझीम पावसामुळे तुडतुड्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यात मोहर काळा पडल्याने आंबा उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आंब्याची फळ धारणा कमी होऊन सुमारे दहा टक्के आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. 

कांदा उत्पादकही अडचणीत  अलिबाग तालुक्‍यातील कार्ले, खंडाळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात. अलिबागमधील कांदा चविष्ट व औषधी समजला जात असल्याने या कांद्याला प्रचंड मागणी असते. अलिबागसह रोहा तालुक्‍यात पांढऱ्या कांद्याची लागवड सुमारे २८० हेक्‍टर क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत कांदा तयार होऊन बाजारात येण्याची शक्‍यता होती; परंतु ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसामुळे पांढरा कांदा अडचणीत आला आहे. या कांद्याला बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

प्रतिक्रिया अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळ उत्पादनाचे नुकसान झाले आहे. फळबागांसह भाजीपाल्यालाही त्याचा फटका बसला आहे. या पावसामुळे आंब्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होणार आहे.  -चंद्रकांत मोकल, आंबा उत्पादक शेतकरी. 

प्रतिक्रिया ढगाळ वातावरणामुळे पांढऱ्या कांद्यावर बुरशीजन्य तर आंब्यावर तुडतुड्यासारखा रोग येण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी औषध फवारणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.  - दत्तात्रय काळभोर, कृषी उपसंचालक. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com