राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरात

गतसप्ताहात देशी आंबे आणि हापूस आंब्याची आवक बऱ्यापैकी झाली. पण मागणी असल्याने त्यांच्या दरात तेजी राहिल्याचे राज्यातील विविध बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले
Mango season is in full swing in the state
Mango season is in full swing in the state

अकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल अकोला ः येथील जनता बाजारातील होलसेल विक्री बंद करण्यात आल्याने यंदा आंबा विक्री शहराबाहेरील बाजारपेठेत हलविण्यात आली आहे. या ठिकाणी सध्या ३० ते ३५ टन आंब्याची आवक होत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या आंध्र प्रदेशातून बदाम, तर कोकणातून हापूस आंब्याची आवक सुरू आहे. आंध्र प्रदेशातील आंब्याची सर्वाधिक आवक होत आहे. दररोज दोन ते तीन ट्रक आंबा येत आहे. हा बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. तर कोकणातून येत असलेला हापूस आंबा सरासरी ७०० ते ७५० रुपये डझनाने विकत आहे. बदाम आंब्याची किरकोळ विक्री सरासरी ७० ते ९० रुपये प्रतिकिलोने केली जात आहे. तर सर्वोत्कृष्ट दर्जाचा आंबा ग्राहकांना १०० रुपयांवरही विक्री केल्या जात आहे. हापूस आंब्याच्या डझनाचाही दर असाच दर्जानुसार मिळत आहे. ८०० ते १००० रुपये डझनादरम्यान विक्री सुरू आहे.

सोलापुरात देशी आंबा ३००० ते ६००० हजार रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात देशी आंबे आणि हापूस आंब्याची आवक बऱ्यापैकी झाली. पण मागणी असल्याने त्यांच्या दरात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात आंब्याची आवक चांगली राहिली. गेल्या आठवड्यात देशी आंब्याची आवक रोज ८० ते १०० क्विंटल आणि हापूस आंब्याची ५०० ते ७०० पेट्यांपर्यंत आवक राहिली. देशी आब्यांची आवक स्थानिक भागातून झाली. तर हापूस आंब्याची आवक रत्नागिरी, चिपळूण भागांतून झाली. देशी आंब्याला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ६००० हजार रुपये आणि सर्वाधिक ११००० रुपये, तर हापूस आंब्याच्या दोन डझनाच्या पेटीला किमान १००० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या आठवड्यातही देशी आंब्याची आवक काहीशी अशीच राहिली. देशी आंब्याला प्रतिक्विंटलला किमान २८०० रुपये, सरासरी ५५०० रुपये आणि सर्वाधिक १० हजार ५०० रुपये, तर हापूस आंब्याला पेटीला किमान १२०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३८०० रुपये असा दर मिळाला. हापूसच्या दरात २०० ते ३०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर काहीसे स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

नाशिकमध्ये क्विंटलला ३५०० ते २५००० रुपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्यांची आवक सुरू झाली आहे. सध्या आवक वाढत असून बाजारात हापूस, लालबाग, बदाम व केशर वाणांच्या आंब्यांची आवक होत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सप्ताहात बाजार आवारात होणारी आंबा आवक वाढती आहे. मागणी व आवेकच्या तुलनेत दराचे गणित ठरत आहे. मागणीनुसार दरात चढ, उतार आहे. बुधवारी (ता.२८) आंब्यांची आवक १९० क्विंटल झाली. हापूसला १७००० ते २५०००, तर सरासरी २०००० रुपये दर मिळाला. लालबागला ३५०० ते ६५०० तर ५५०० रुपये सरासरी दर मिळाला. बदामला ५५०० ते ८००० तर  ७००० सरासरी दर मिळाला. यासह आवक सुरू झालेल्या  केशरला ८५०० ते १२०००, तर १०००० रुपये सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला. मंगळवारी (ता.२७) आंब्यांची आवक ११० क्विंटल झाली. हापूसला १७००० ते २५०००, तर सरासरी २०००० दर मिळाला. लालबागला ३५०० ते ६५०० तर ५५०० सरासरी दर मिळाला. बदामला ५५०० ते ८००० तर ७००० सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला.

कळमना बाजार समितीत दहा हजार क्विंटल आवक नागपूर : कळमना बाजार समितीत आंब्याची नियमित आवक होत आहे. गावरान आंबा ३८०० ते ४८०० रुपये क्विंटल होता. त्यासोबतच तोतापल्ली आंब्याची देखील ५०० क्विंटलची सरासरी आवक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. कळमना बाजार समितीत विदर्भासह लगतच्या मध्य प्रदेशातील आंब्याची आवक होत होती. कोरोना प्रतिबंधामुळे त्यावर सद्यःस्थितीत मर्यादा आल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. एप्रिलच्या सुरुवातीला गावरानची आवक १२०० क्विंटल होती. त्यानंतरच्या टप्प्यात ती वाढून २५५१, २८८३, ४२३८, ६४०० क्विंटल कशी वाढत राहिली. गावरानची आवक शुक्रवारी दहा हजार क्विंटलवर पोहोचली होती.

पुण्यात हापूसच्या २० हजार पेट्यांची आवक पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २८) कोकणातून हापूसच्या सुमारे २ हजार, तर कर्नाटक येथून सुमारे २० हजार पेट्या आंब्यांची आवक झाली होती. राज्यातील कोरोना टाळेबंदी आणि शहरांमधील बाजारपेठा बंदचा फटका आंबा व्यापारावर होत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी असून सुद्धा पुरवठा होऊ शकत नसल्याने व्यापाऱ्यांकडून खरेदी होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, घाऊक बाजारात दर कमी असले तरी किरकोळ विक्रीचे दरात तेजी आहे. याबाबत बोलताना कोकण हापूसचे ठोक विक्रेते युवराज काची म्हणाले, ‘‘आज (गुरुवारी) बाजार समितीत कच्च्या आंब्याची सुमारे दोन हजार पेटी आवक झाली होती. या वेळी ४ ते ७ डझनला १ हजार ५०० ते ३ हजार, तर पिकलेल्या आंब्याला २ हजार ते ४ हजार रुपये दर होता. बाजारात तयार आंब्याची सुमारे ३ हजार पेट्या उपलब्ध होत्या.’’ तर कर्नाटक आंब्याचे घाऊक विक्रेते रोहन उरसळ म्हणाले, ‘‘आज सुमारे २० हजार पेट्या कर्नाटक हापूस आणि पायरीची आवक झाली होती. या वेळी कच्‍या आंब्याच्या ४ डझनच्या करंडी, पेटीला ८०० ते १२००, तर तयार आंब्याला १ हजार २०० ते १ हजार ८०० आणि पायरीला ८०० ते १ हजार आणि पिकलेल्या आंब्याला १ हजार दीड हजार रुपये दर होता.’’

औरंगाबादमध्ये सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल औरंगाबाद: लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२९) आंब्यांची ११० क्विंटल आवक झाली. २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळालेल्या आंब्यांचा सरासरी दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. गत काही दिवसांपासून औरंगाबाद बाजार समितीमध्ये दशेहरी, केसर, लालबाग, बदाम व पायरी आंब्याची आवक होते आहे. गुरुवारी केशरला सरासरी ७० रुपये प्रति किलोचा दर मिळाला. लालबागचे दर सरासरी २५ ते ३० रुपये किलो दरम्यान राहिले. बदामला ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो, तर पायरीला ५० रुपये प्रतिकिलोचा सरासरी दर मिळाला. हापुसची ४ ते ५ डझनची पेटी १४०० ते १५०० रुपये राहिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २२ एप्रिल रोजी ६४ क्विंटल आवक झालेल्या आंब्यांला सरासरी ५ हजार रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. २५ एप्रिलला आंब्याची आवक ७० क्विंटल, तर सरासरी दर ४ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २७ एप्रिलला ७२ क्विंटल आवक झालेल्या आंब्याला सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. २८ एप्रिलला ५२ क्विंटल आवक झालेल्या आंब्यांचा सरासरी दर ४५०० रुपये रुपये राहिला.

परभणीत दशहरी २५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल परभणी ः शहरातील फळे विक्रेत्यांकडे तुरळक प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. गुरुवारी (ता. २९) आंब्याचे  दर प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ६००० रुपये, तर सरासरी ४२५० रुपये होते असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमधील व्यवहार बंद आहेत. सध्या परभणी शहरातील फळांच्या व्यापाऱ्यांकडे स्थानिक परिसर, तसेच अन्य जिल्ह्यांतून विविध जातींच्या आंब्यांची कमी प्रमाणात आवक सुरू आहे. अन्य जातीच्या आंब्याची अजून आवक सुरू झाली नाही. गुरुवारी (ता. २९) दशहरी आंब्याचे घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये, तर केसर आंब्याचे दर प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये होते. अनेक शेतकरी तसेच फळ विक्रेते घरपोच किरकोळ विक्री प्रतिकिलो ८० ते १०० रुपये दराने विक्री करत असल्याचे व्यापारी मो. फारुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com