थंडीतील चढउताराने आंब्याच्या जीवनचक्रात निसर्गाचा आघात

७० टक्‍के फुलोरा आला, पण अजून सेटिंग होणे बाकी आहे. एकदा ठिबकने पाणी दिलंय. माझ्या बागेचा विचार करता माझ्याकडील केशर आंब्याचं येण किमान महिनाभर लांबणीवर पडेल, असं वाटतयं. शिवाय अचानक तापमानात वाढ झाली तर होणारी फ्रुट सेटिंग टिकेल की नाही हा प्रश्‍न आहे. - गवनाजी अधाने, विरमगाव, ता. खुल्ताबाद, जि. औरंगाबाद.
एका आंब्याला आलेला फूलोरा व दुसऱ्या आंब्याला अल्प प्रमाणात असलेला फूलोरा.
एका आंब्याला आलेला फूलोरा व दुसऱ्या आंब्याला अल्प प्रमाणात असलेला फूलोरा.

औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या मराठवाड्यात आंब्याच्या जीवनचक्रात थंडीने आघात केला आहे. घटलेल्या तापमानाने फुलोरा येणे थांबले आहे. आता थोडे तापमान वाढून फुलोरा आला तरी पुन्हा तापमानात अचानक वाढ झाल्यास सेट होणारी फळं टिकतील की नाही हा प्रश्‍न आहे. त्यामुळे यंदा केशरची चव लवकर चाखायला मिळण्याची शक्‍यताही कमीच आहे.  तज्ज्ञांच्या माहितीनुसार, साधारणत: १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान १४ डिग्री सेल्सिअसच्या आत सतत २१ दिवस तापमान असले की आंबा सुप्तावस्थेत जातो व त्यानंतर चांगला फुटतो.  त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ झाली की, आंब्याची सेटिंगही चांगली होते.  यंदा मात्र उत्तर भारताप्रमाणे मराठवाड्यात स्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून अपेक्षित असलेली थंडी पार डिसेंबरअखेरीस रुजू झाली. त्यामुळे जवळपास पंधरवड्याने फ्लावरिंगचा काळ पुढे लोटला. दुसरीकडे मधे अचानक थोड्याबहुत वाढलेल्या तापमानाने फ्लावरिंग झालेल्या झाडांवर फळाची थोडीबहुत सेटिंग झाली. परंतू फुटलेल्या मोहरावर व झालेल्या सेटिंगवर वातावरणातील आंब्याच्या दृष्टीने अनपेक्षित बदलामुळे पावडरी मीडोसह तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे.  संकटाची मालिका समोर उभ्या ठाकलेल्या आंबा उत्पादकांना आपला आंबा वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. कुठ प्रचंड मोहर तर कुठे काहीच नाही असे चित्र अनेक भागात पहायला मिळत आहे. विदर्भातील आंब्याचीही वातावरणातील सततच्या चढ उतारामुळे अशीच अवस्था असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.  विम्याचा प्रश्‍न ऐरणीवर  विम्याचे कवच घेणाऱ्या आंबा उत्पादकांसाठी कमी, जास्त तापमानाचे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी हे कमी तापमानाचे दिवस असल्याचे शासन परिपत्रकात नमूद आहे. साधारणत: तीन दिवस सतत १३ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान राहिल्यास विम्याचा परतावा मिळणे अपेक्षीत आहे. अलीकडे जानेवारीत अनेक दिवस सतत तापमान १३ डिग्रीपेक्षा कमी राहिल्याने आंबा उत्पादकांना क्‍लेम मिळेल का प्रश्‍न आहे. लांबणीवर पडणार केशर  मराठवाड्यात जवळपास १९ ते २० हजार हेक्‍टरवर केशरच्या बागा आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड व हिंगोली या सर्वच जिल्ह्यात केशरच्या बागा आहेत. १० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत फुलोरा फुटलेल्या या बागांमध्ये काही ठिकाणी सेटिंग बाकी आहे. पाणी देणे, पावडरी मिडोसाठी गंधकाची व तुडतुड्यांसाठी निंबोळी अर्काची फवारणी आंबा उत्पादक घेत आहेत. उशीराने दाखल होऊन लांबलेली थंडी, केशरचे येणेही लांबणीवर टाकून गेली आहे. त्यामुळे यंदा मे अखेर किंवा जुनच्या सुरवातील केशर बाजारात दाखल होण्याची शक्‍यता आहे.  प्रतिक्रिया संपूर्ण जानेवारी महिन्यातील तापमान १३ डिग्रीच्या आत राहिले आहे. गत चार दिवसात तर ८ डिग्रीच्या सेल्सिअसच्या आत तापमान राहिले. विमा प्रमाणकातील तरतुदीनुसार सतत तीन दिवस १३ डिग्री सेल्सिअसच्या आत तापमान राहिल्यास आंबा फळपीक विमाधारकास ३६ हजार ३०० रुपये ४५ दिवसांच्या आत मिळणे अपेक्षित आहे. त्याचा लाभ तत्काळ आंबा विमाधारकांना मिळावा.  - संजय मोरे पाटील, ॲग्रोव्हिजन गटशेती संघ, नळविहिरा, ता. जाफ्राबाद, जि. जालना. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com