नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीत

नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीत
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीत

नाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची आवकही वाढती आहे. गत सप्ताहात बहुतांश फळभाज्यांची आवक वाढती राहिली. मुंबईच्या बाजारपेठेतून मागणी स्थिर राहिल्याने दरही स्थिरावलेले होते. या काळात हापूस आंबा, लिंबू, खरबूज, कलिंगड, कारले या शेतीमालाला मात्र चांगली मागणी होती.  एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाशिक बाजार समितीत हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. गत सप्ताहात हापूस आंब्याची दररोज सरासरी ६५० क्विंटलची आवक झाली. या वेळी आंब्याला प्रतिक्विंटलला ११ हजार ते २४ हजार व सरासरी १७ हजार रुपये दर मिळाले. हापूस शिवाय इतरही वाणांच्या आंब्याची आवक बाजार समितीत होत आहे. या वेळी इतर वाणांच्या आंब्याची साधारण ३२ क्विंटल आवक होती. या आंब्याला या वेळी क्विंटलला १५०० ते २५०० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. गत सप्ताहात खरबूज आणि कलिंगडाला विशेष मागणी वाढली. खरबुजाची सरासरी १२० क्विंटल आवक झाली. या वेळी खरबुजाला क्विंटलला १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाले. तर कलिंगडाची आवक सरासरी ४२० क्विंटल होती. कलिंगडाला क्विंटलला ५०० ते १२०० व सरासरी ९०० रुपये दर मिळाले.  दरवर्षी उन्हाळ्यात लिंबाला मागणी वाढते. मागील दीड महिन्यांपासून लिंबाची आवक ३० ते ४० क्विंटल या दरम्यान स्थिर आहेत. मात्र स्थानिक आणि जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून चांगली मागणी असल्याने लिंबाला तेजीचे दर मिळत आहेत. गत सप्ताहात लिंबाची ३६ क्विंटलची आवक झाली असता, लिंबाला प्रतिक्विंटलला ५००० ते ७५०० व सरासरी ६२५० असे दर मिळाले.  या उन्हाळ्यात स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून कारल्याला विशेष मागणी होत आहे. गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत कारल्याची २६४ क्विंटलची आवक झाली. नाशिकच्या दिंडोरी, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर या तालुक्‍यांतून आवक होते. या वेळी कारल्याला प्रतिक्विंटलला २०८० ते ३००० व सरासरी २२०० रुपये दर मिळाले. एकंदरीतच मागणीच्या तुलनेत कारल्याची आवक कमी असल्यामुळे कारल्याला चांगले दर मिळत असल्याचे चित्र दिसून आले.  कांदा क्विंटलला ३०० ते ७०० रुपये नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या व ४५ उपबाजारांत प्रामुख्याने कांद्याची आवक होते. त्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे या बाजार समित्यात सर्वाधिक आवक होते. लासलगाव बाजार समितीत गत सप्ताहात सुटीचे दिवस वगळता इतर दिवशी सरासरी १८००० क्विंटल कांद्याची आवक झाली. या वेळी कांद्याला ३०० ते ६५० व सरासरी ७०० रुपये दर मिळाले. नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांतही आवक व दराची हीच स्थिती होती. उन्हाळ कांदा हा साठवणारा कांदा असल्याने सद्यःस्थितीत बाजारात आवक कमी आहे. दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. उत्तम प्रतीचा कांदा साठविला जात असून, बहुतांश प्रमाणात दुय्यम दर्जाचा कांदा बाजारात येत आहे. त्यामुळे सध्या कांद्याचे दर स्थिर आहेत. येत्या पंधरा दिवसांतही कांद्याचे सध्याचे दर स्थिर राहण्याची स्थिती आहे. असे लासलगाव बाजार समितीचे सचिव बी. वाय. होळकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com