'मांजरा'कडून उसाच्या रसापासून इथेनॉल; मिळतोय साखरेपेक्षा अधिक दर

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती करण्याचा कमी खर्चातील प्रकल्प लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने उभारला आहे.
'मांजरा'कडून उसाच्या रसापासून इथेनॉल; मिळतोय साखरेपेक्षा अधिक दर
'मांजरा'कडून उसाच्या रसापासून इथेनॉल; मिळतोय साखरेपेक्षा अधिक दर

लातूर : पारंपरिक पद्धतीने इथेनॉलची निर्मिती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती करण्याचा कमी खर्चातील प्रकल्प लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने उभारला आहे. या भागातील असा प्रकल्प उभारणारा हा पहिला कारखाना आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी खर्चात कारखान्याच्या इंजिनिअर व कर्मचाऱ्यांनी पथदर्शी प्रकल्प उभा केला आहे, हे या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्टे आहे. 

साखर उद्योगात होत असलेल्या बदलांचा स्वीकार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यात हा कारखाना सतत अग्रेसर राहिला आहे. यातूनच आता उसापासून इथेनॉलनिर्मितीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कारखान्याच्या प्रशासनाने काही एजन्सीला संपर्क साधला होता. पण याकरिता दोन-तीन कोटी रुपये खर्च त्यांना सांगण्यात आला. त्यानंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, डिस्टिलरी प्लान्टचे प्रमुख योगेश देशमुख आदींची बैठक घेतली. त्यांना प्रोत्साहन दिले. श्री. देशमुख आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून या प्रकल्पाची उभारणी काही लाखात केली आहे. यातून त्यांनी कारखान्यांची मोठी बचत केली आहे. 

प्रदूषण झाले कमी  उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मितीचा प्रकल्प उभारल्याने कारखान्याने नियमित वापरल्या जाणाऱ्या पाण्याची बचत, स्टीमची मोठी बचत केली आहे. पण हा प्रकल्प उभारताना ‘स्पेन्ट वॉश रिसायकल’चाही प्रयोग केला आहे. यात घाण पाण्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. यातून ‘ट्रीटमेंट कॉस्ट’ तर कमी केलीच, पण प्रदूषण कमी करण्यासही मदत झाली आहे. 

इथेनॉलनिर्मिती क्षमतेत वाढ  कारखान्याच्या वतीने पारंपरिक पद्धतीने इथेनॉलनिर्मिती केली जात होती. यात प्रति दिन ६० हजार लिटर इथेनॉल तयार केले जात होते. आता या आधुनिक पद्धतीने प्रति दिन ६५ ते ६८ हजार लिटर इथेनॉलची निर्मिती दररोज केली जात आहे. ही निर्मिती प्रति दिन ७५ हजार लिटरपर्यंत नेण्याचा कारखान्याचा मानस आहे. या इथेनॉलला मागणी चांगली आहे. त्यामुळे कारखान्याने गायगाव (जि. अकोला) येथील ऑइल कंपन्यांच्या डेपोला हे इथेनॉल विक्री करण्यासही सुरुवात केली आहे. 

इथेनॉलचे असे आहे गणित  कारखान्याने एक मेट्रिक टन ऊस, बारा रिकव्हरी धरली आहे. यात सी-हेवी या पद्धतीने १२० किलो साखर, ४० किलो मळी, १०.२७ लिटर इथेनॉल तयार होते. यात साखरेचा आजचा ३१ रुपये किलोचा भाव धरला, तर साखरेपासून तीन हजार ७२० रुपये, इथेनॉलचा ४५.६९ रुपये प्रति लिटर दर धरला, तर ४६९.२४ रुपये असे एकूण ४,१८९.२४ रुपये उत्पन्न मिळते. तेच उसाच्या रसापासून मळी १२० किलो, ६९.५५ लिटर इथेनॉल मिळत आहे. यात इथेनॉलला ६२.६५ रुपये प्रति लिटर दर धरला तर ४,३५७.३१ रुपये उत्पन्न मिळत आहे. म्हणजे प्रत्यक्ष उत्पन्नात दीडशे ते दोनशे रुपये जास्त मिळत आहेत. यासोबतच अप्रत्यक्षात पीपी बॅग,  शुगर हॅण्डलिंग, गोदाम शिफ्टिंग, केमिकल याचा मोठा खर्च वाचला आहे. इतकेच नव्हे तर गोदामात सात आठ महिने पडून राहणाऱ्या साखरेवरील व्याजाचीही बचत झाली आहे. 

उपपदार्थावर कारखान्याचा भर  स्व. विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून ऐंशीच्या दशकात मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरुवात झाला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना वाटचाल करीत आहे. कारखान्याला आधुनिकतेशी जोड देऊन साखरेला मिळणारा दर पाहता उपपदार्थ निर्मिती करण्यावर या कारखान्याचा भर राहिला आहे. त्यामुळेच मराठवाड्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख राहिली आहे. 

इथेनॉलला मिळतोय सर्वाधिक भाव  सध्या देशात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. देशातील वाहने व इतर बाबींसाठी लागणारे पेट्रोल परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी परकीय चलनासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च करावी लागत आहे. काळाची गरज ओळखून केंद्र शासनाने साखर कारखान्याकडे मोलासेसपासून इथेनॉल तयार करण्याऐवजी उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. शासनाने बी हेवी व सी हेवी मोलासेसपासूनच्या इथेनॉल दरात अनुक्रमे ३.३४ रुपये प्रति लिटर व १.९४ रुपये प्रति लिटर इतकी वाढ केली आहे. आता बी हेवी मोलासेस पासूनचे इथेनॉलचे दर ५७.६१ रुपये प्रति लिटर व सी हेवी मोलासेसपासूनचे इथेनॉलचे दर ४५.६९ रुपये प्रति लिटरला असणार आहेत. तर उसाच्या रसापासून तयार करण्यात आलेल्या इथेनॉलला ६२.६५ रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच उसाच्या रसापासून तयार झालेल्या इथेनॉलला सर्वाधिक भाव मिळत आहे. 

प्रतिक्रिया... मराठवाड्यात पथदर्शी असा हा प्रकल्प आहे. कारखान्यांना साखरेच्या पेमेंटसाठी बराच वेळ लागतो. पण इथेनॉलचे पेमेंट मात्र  तातडीने मिळते. त्यामुळे कारखान्याच्या व्याजात मोठी बचत होणार आहे. पेट्रोलमध्ये हे इथेनॉल वापरले जात असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच परकीय चलनाची बचत होण्यास मदत होणार आहे.  - जितेंद्र रणवरे, कार्यकारी संचालक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com