बंधारा फुटल्याने साडेचार एकर क्षेत्र गेले वाहून

मंजूर येथील बंधारा फुटला
मंजूर येथील बंधारा फुटला
कोपरगाव, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील मंजूर येथे गोदावरी नदीवर बांधलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा सोमवारी (ता.९) रात्री फुटल्याने सुमारे साडेचार एकर क्षेत्र वाहून गेल्याचे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. २००६मध्ये आलेल्या महापुरातही बंधारा फुटला होता. स्वतंत्र गेटवे आणी संरक्षक भिंतीबाबत अनेक वेळा सांगूनही सरकार व कारखाना प्रशासनाकडून दखल न घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
 
दरम्यान, माजी आमदार शंकरराव कोल्हे यांनी बुधवारी (ता. ११) दुर्घटनास्थळी भेट देऊन बंधारा दुरस्तीबाबत शेतकऱ्यांना अाश्‍वस्त केले. दारणा व गंगापूर धरणांच्या (नाशिक) पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीपात्रात १५ ते २० हजार क्‍यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. 
 
१५ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज असताना त्याआधीच सर्व फळ्या टाकण्यात आल्याने बंधाऱ्यावर पाण्याचा ताण येऊन तो बाजूने खचला. यापूर्वीही बंधारा जेव्हा फुटला तेव्हाही जमीन वाहून गेली होती, असे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.  यानंतर दुरस्ती करण्यात आली होती, परंतू यंदा पुन्हा तोच प्रकार घडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. 
 
बंधारा फुटल्याने शेतीसह त्यावरील ऊस, मका, बाजरी आदी पिकांसह विहिर, मोटारपंप, इलेक्ट्रीक पोल, सायफन वाहून गेले आहेत. शेतकरी माणिकराव राजेभोसले, भाऊसाहेब राजेभोसले, लक्ष्मण राजेभोसले, विठाबाई पांडुरंग वालझडे, शिवाजी वालझडे, अशोक वालझडे, परसराम वालझडे, मच्छिंद्र वालझडे आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी आणि बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीची भक्कम दुरूस्ती व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 
संजीवनी कारखान्याने माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पुढाकारातून सुमारे दीड कोटी रुपये खर्चून १९९५ मध्ये हा बंधारा बांधला. त्याचा फायदा चासनळी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी व मंजूर या पाच गावांतील ८२६ हेक्‍टर क्षेत्र १२७.८५ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या या बंधाऱ्याच्या ओलिताखाली येते. दरम्यान, आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून मदतीची मागणी केली आहे. 
 
काही कुटुंबांचे स्थलांतर
पुणतांबा, ता. राहता : गोदावरी नदीत १४ हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने पुणतांबा येथील गोदावरीवरील बंधाऱ्यात फळ्या टाकून नुकतेच पाणी अडविण्यात आले होते. मंजूरचा बंधारा फुटल्याने येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने वैजापूर रस्ता बंद झाला व पुणतांबे-कोपरगाव रस्त्यावरील कातनाला पुलावर चार फुट पाणी होते. रस्तापूर भागात पाणी शिरल्यामुळे बनकरवस्ती, बजरंगवाडी भागातील काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com