मराठा संवाद यात्रा १६ नोव्हेंबरपासून

मराठा संवाद यात्रा १६ नोव्हेंबरपासून
मराठा संवाद यात्रा १६ नोव्हेंबरपासून

मुंबई : शिक्षण आणि सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आरक्षणाच्या संदर्भात सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत क्रांती मोर्चाने येत्या १६ नोव्हेंबरपासून राज्यभरात मराठा संवाद यात्रा काढण्याचे जाहीर केले. ही यात्रा गावागावात जाऊन मराठा समाजाशी आरक्षणाच्या प्रश्नावर संवाद साधणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य मागसवर्ग आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे. हा अहवाल आल्यानंतरच सरकारकडून पुढील हालचाली सुरू होतील. मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मात्र, मराठा समाजाचा सरकारच्या आश्वासनावर विश्वास नाही. त्यामुळे सरकारवर दबाव वाढविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक झाला आहे. या संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक नुकतीच येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत १६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान गावागावात संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ही यात्रा २६ नोव्हेंबरला विधानभवनावर धडकणार असल्याची घोषणा बैठकीनंतर गाभा समितीच्या नेत्यांनी केली.  मराठा अथवा मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने राजकीय पक्ष स्थापन करणाऱ्यांना समाज धडा शिकवेल. या पक्षाशी मराठा समाजाचा काहीही संबंध राहणार नाही. भारतीय जनता पक्षाकडून मराठा समाजात फूट पाडण्याचा कुटील डाव खेळला जात असल्याचा आरोप नेत्यांनी केला. राज्य सरकार मराठा समाजात ''फोडा आणि झोडा'' या नितीचे राजकारण करत आहे. या राजकारणाला मराठा समाज बळी पडू नये म्हणून जागृती संवाद यात्रा काढण्यात येणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत झालेल्या आंदोलनात कोणतीही हिंसा झाली नव्हती. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच्या ठोक मोर्चाला हिंसाचाराचे गालबोट लागले आणि मराठा तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. असे होता कामा नये म्हणून यापुढे मराठा क्रांती मोर्चाचा ठोक मोर्चाशी संबंध राहणार नाही, असे मोर्चाचे समन्वयक विनोद साबळे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com