जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे प्रतीक्षा; केसर आंब्याचे थंडीवर गणित
मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला परिपूर्ण मोहर येण्यासाठी कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला परिपूर्ण मोहर येण्यासाठी कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ज्या भागात अपेक्षित थंडी पडली त्या भागात बऱ्यापैकी मोहर, तर थंडी पडलीच नाही तिथे मोहराची प्रतीक्षा असलेल्या केसर आंब्याच्या बागा पाहायला मिळत आहेत. याशिवाय लांबलेल्या पावसाने अनेक बागांमध्ये नवती फुटल्याचे ही चित्र आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, आदी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने केसर आंबा क्षेत्र विस्तारले आहे. जवळपास २० हजार हेक्टरपर्यंत विस्तारलेल्या या क्षेत्रातील केसर आंबा आपल्या चव, सुगंध व इतर गुणांनी ग्राहकांना कायम आकर्षित करीत असतो. त्यामुळे अन्य आंब्याच्या तुलनेत मराठवाड्यातील केसर आंब्याची ग्राहकांना कायम प्रतीक्षा असते.
यंदा थोड्या बहुत अनुकूल वातावरणामुळे केसर आंबा वेळेत येण्याची आशा असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी व तज्ञ सांगतात. काही दिवसांपूर्वी मराठवाड्याच्या काही भागांत पडलेल्या थंडीमुळे त्या ठिकाणच्या केसर आंबा बागा बऱ्यापैकी मोहरल्या.
बागा मोहरण्याने प्रमाण काही ठिकाणी ५० टक्के तर काही बागांमध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यंत आहे. परंतु काही भागांत थंडीच न जाणवल्याने केसर आंबा बागा मोहरण्याची प्रतीक्षा आहे. ज्या बागा मोहरल्या त्या बागांमधील आंबा साधारणतः मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे यापुढील काळात मोहरणाऱ्या आंबा बागांमधील आंबा लांबण्याची शक्यता शेतकरी व तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
यंदा पॅक्लोब्युट्राझोल वाढ नियंत्रकाचा वापरही बऱ्यापैकी वाढल्याची माहिती शेतकरी व तज्ज्ञांनी दिली. अर्थात पुढील काळातील अनुकूल वा प्रतिकूल राहणाऱ्या वातावरणावर आंबा उत्पादनाचा गणित अवलंबून असणार आहे.
आंबा चांगला होण्यासाठी रात्रीचे तापमान किमान तीन आठवडे १४ अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यंदा आम्ही करत असलेली बाग चांगलीच मोहरली आहे. चांगल्या व वेळेत उत्पादनाची आशा असल्याची माहिती पैठणचे केसर आंबा उत्पादक रसूलभाई सांगतात.
यंदा अपेक्षित थंडी न पडल्याने अजून माझ्या बागेतील आंबा मोहरला नाही. मात्र बागेत नवती फुटली आहे. येत्या काळात पोषक वातावरण तयार होऊन आंबा बहरेल अशी आशा आहे.
- मिठूभाऊ चव्हाण, आंबा उत्पादक भांडेगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद
जवळपास पन्नास टक्के बाग मोहरली आहे. येत्या काळात थंडी जोर धरेल
संपूर्ण बाग मोहरेल अशी आशा आहे.
- तानाजी वाडीकर, नागलगाव, ता. उदगीर, जि. लातूर
आंबा वेळेत येण्याची अपेक्षा आहे, अजून डिसेंबर अखेरपर्यंत मोहर फुटणे अपेक्षित असून, सतत तीन आठवडे १४ अंशांपेक्षा तापमान कमी राहिल्यास आंबा मोहरण्याची प्रक्रिया जोमाने होईल. सद्यःस्थितीत बागांना पाणी देण्याच्या भानगडीत न पडता किडी-रोगांपासून बाग संरक्षित करण्याच्या दृष्टीने कीडनाशकांचा योग्य वेळी वापर करावा.
- डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख, फळबाग संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद
- 1 of 653
- ››