मराठवाड्यात पिके चिखलाने माखली 

पाच जिल्ह्यांत अपेक्षित पेरणी होऊ न शकलेल्या मराठवाड्यात नैसर्गिक आपत्ती पिच्‍‌छा पुरविते आहे. पाऊस थांबला, असे वाटत असतानाच पुन्हा जोरदार बरसतो आहे. अजूनही पिच्‍‌छा सोडण्याचे नाव घेत नाही.
मराठवाड्यात पिके चिखलाने माखली  In Marathwada, the crops were covered with mud
मराठवाड्यात पिके चिखलाने माखली  In Marathwada, the crops were covered with mud

औरंगाबाद : पाच जिल्ह्यांत अपेक्षित पेरणी होऊ न शकलेल्या मराठवाड्यात नैसर्गिक आपत्ती पिच्‍‌छा पुरविते आहे. पाऊस थांबला, असे वाटत असतानाच पुन्हा जोरदार बरसतो आहे. अजूनही पिच्‍‌छा सोडण्याचे नाव घेत नाही.  नैसर्गिक आपत्तीने मराठवाड्याच्या अनेक भागांतील पिके होत्याची नव्हती केली. पाणी ओसरल्यानंतर आता पूर येऊन गेलेल्या भागात चिखलाने माखलेली पिके दृष्‍‌टीस पडत आहेत. प्रत्यक्षात पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी जवळपास निम्‍म्याहून जास्त क्षेत्रातील म्हणजे सुमारे २५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.  यंदाचा खरीप हंगाम म्हणजे शेतकऱ्यांची कसोटी पहणारा ठरला आहे. यंदा काही प्रमाणात कपाशीचे क्षेत्र घटले, त्याला पर्याय म्हणून सोयाबीनसारख्या पिकाकडे वळलेल्या शेतकऱ्यांसमोर आधी पावसाचा खंड, कुठे उशिराने आगमन आणि आता काढणीला आलेल्या पिकांची अतिवृष्‍‌टीमुळे धूळधाण, अशी संकटांची मालिका सुरू आहे. 

मराठवाड्यातील पेरणीची स्थिती  पावसाच्या लहरीपणाचा अनुभव घेणाऱ्या मराठवाड्यात यंदा पेरण्याही सरासरीच्या खालीच राहिल्या. त्यातही उस्मानाबाद, जालना व बीड वगळता एकाही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राचा तुलनेत कमीच पेरणी झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या खरिपासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र ४९ लाख ४२ हजार २९ हेक्‍टर होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४७ लाख ६५ हजार ७८ हेक्‍टरवर एकापेक्षा जास्त टप्प्यात पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास १ लाख ७६ हजार हेक्‍टरवर पेरणीच झाली नाही. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत कमी पेरणी झालेल्या जिल्ह्यांपैकी हिंगोली जिल्ह्यात ८० टक्‍के, परभणी ९३, नांदेड ९९, लातूर ९०, औरंगाबाद ९८ टक्‍के पेरणी झाली होती. तर जालना जिल्ह्यात १०१ टक्‍के, बीड १०० टक्‍के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात १०३ टक्‍के पेरणी झाली होती. 

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  जून ते जुलैदरम्यान अतिवृष्‍‌टी झाली. परंतु नुकसानीचा प्राथमिक अंदाज १ लाख १६ हजार हेक्‍टरच्या आसपास होता. त्याचे पंचनामे सुरू करण्याचे काम होत नाही, तोच ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत जवळपास २४ लाख ८२ हजार हेक्‍टरवरील पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे जून ते सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यातील ३५ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्या ३९१ शेतकऱ्यांच्या २५ लाख ९८ हजार २१३ हेक्‍टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाले. जे प्रत्यक्षात पेरणी झालेल्या क्षेत्राच्या निम्म्या क्षेत्रापेक्षा जवळपास अडीच लाख हेक्‍टरने जास्त आहे. पंचनामे करण्याचे आदेश प्रत्येक मंत्र्यांकडून दिले जात आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून आता ओला दुष्‍‌काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते आहे. 

प्रतिक्रिया  अजून पिकातून पाणी वाहते आहे. ऊस आडवा झाला आहे. सोयाबीन चिखलाने माखले आहे. सात भावंडांच्या एकत्र भल्या मोठ्या शेतीच्या क्षेत्रातून केवळ दीड एकरातील उडीद हाती आला आहे. आता थांबतो, असे वाटत असतानाच पुन्हा पाऊस सुरू होतोय. त्यामुळे नुकसान कुठे अन् कोणते झाले, हेही सांगता येईना. 

-नामदेव जगदाळे, महाजनवाडी, जि. बीड  ...... 

पूर्णाकाठच्या शिवारातील माझ्या आठ एकर शेतीपिकातून पूर गेला. सोयाबीन, कपाशी, मका पिकावर गाळ येऊन साचला आहे. अजून कुणी पंचनामा करायला आले नाही. सरकारने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तत्काळ भरपाई द्यावी.  बालाप्रसाद ठोंबरे, जवखेडा ठोंबरे ता. भोकरदन, जि. जालना 

जिल्हानिहाय पेरणी व प्राथमिक अंदाजानुसार नुकसान क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)  जिल्हा... पेरणी... नुकसान  औरंगाबाद... ६६३४४७.. ३२६५०२  जालना... ६०९४२५... २५१६२६  बीड... ७४९२२६... ५२४२१२  लातूर... ५८२२०४... १९६४४१  उस्मानाबाद... ५२१२९९... २२३७७७  नांदेड... ७५६६४४... ५७७५७१  परभणी... ५०५१३६... २९१६३८  हिंगोली... ३४७६९७... २०६४४३ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com