मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत अपेक्षेपेक्षा निम्म्या पावसाचीही वानवा

मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत अपेक्षेपेक्षा निम्म्या पावसाचीही वानवा
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत अपेक्षेपेक्षा निम्म्या पावसाचीही वानवा

औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७६ पैकी तब्बल २६ तालुक्‍यांत अजनूही जून ते ऑक्‍टोबर दरम्यानच्या सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे. हवामान खात्याचा अंदाज पावसाचा मुक्‍काम वाढण्याचे संकेत देत असला तरी, प्रत्यक्षात मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सार्वत्रिक पावसाचा अभावच दिसून आला आहे. 

नुसता ढगाळा पण पाऊस नाही, आला तरी रिमझिम असेच चित्र मराठवाड्याच्या बहुतांश भागात पाहायला मिळते आहे. मराठवाड्यात जून ते ऑक्‍टोबरदरम्यान सरासरी ७७९ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. या अपेक्षेच्या तुलनेत पावसाळ्याचे जवळपास तीन महिने संपले असताना १७ सप्टेंबरअखेरपर्यंत केवळ ४४५.३४ मिलिमीटर म्हणजे अपेक्षेच्या ५५.९२ टक्‍केच पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ६७५.४६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत ४६२.२८ मिलिमीटर म्हणजे ६८.४४ टक्‍के पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात सरासरी ६८८.३१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना ४०१.२२ मिलिमीटर अर्थात अपेक्षेच्या केवळ ५८.२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यात पावसाची सरासरी ७७४.६२ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात ४५६.८० मिलिमीटर म्हणजे ५८.९७ टक्‍केच पाऊस झाला आहे. 

हिंगोली जिल्ह्यात पावसाची सरासरी ८९२.७६ मिलिमीटर आहे. त्या तुलनेते जिल्ह्यात ४९९.१९ मिलिमीटर अर्थात ५५.९२ टक्‍केच पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी ९५५.५४ मिलिमीटर पाऊस पडत असताना जिल्ह्यात केवळ ६६७.१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याची टक्‍केवारी सरासरी पावसाच्या ६९.८१ टक्‍के इतकी आहे. बीड जिल्ह्यावर पावसाची वक्रदृष्टी कायम आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी ६६६.३६ मिलिमीटर असताना केवळ २८३ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या केवळ ४२.५९ टक्‍केच पाऊस झाला. 

बीडमधील ११ पैकी दहा तालुक्‍यांत सरासरी पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. लातूर जिल्ह्यात पावसाची सरासरी ८०२.१३ मिलिमीटर असताना जिल्ह्यात केवळ ४२६.५९ मिलिमीटरच पाऊस झाला आहे. जो सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ५३.१८ टक्‍केच आहे. बीडप्रमाणेच उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत अवकृपा कायम आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी ७७६.८१ मिलिमीटर असताना या जिल्ह्यात केवळ ३६५.७६ मिलिमीटर अर्थात सरासरी पावसाच्या केवळ ४७.०९ टक्‍केच पाऊस झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com