मराठवाड्यात खरीप पिकांच्या सोंगणी, मळणी लगबग

खाण्यापुरती बाजरी घेतो. यंदा दहा गुंठे बाजरी पेरली होती. त्यामध्ये सहा क्‍विंटल झाली. - सुभाष हिरासिंग राजपूत, पाल. ता. फूलंब्री जि. जालना. आमच्या शिवारात बाजरी सोंगून टाकली आहे, मळणी बाकी आहे. लष्करी अळीने संपविलेल्या मक्याची काढणी सुरू व्हायला पंधरवडा लागेल. मूग, उडीद फुलात असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे उत्पादनात मोठा फटका बसला. - सोमनाथ नागवे, खामखेडा ता. भोकरदन, जि. जालना. आठवड्यापासून पाऊस उघडला. त्यामुळे पीक सुकून चालली. परतीच्या पावसाने तरी मेहरबानी करायला हवी. यंदा वाहोणी पाऊस झालाच नाही. २२ जुलैनंतरच्या पेरण्या असल्याने अजून पीक काढणीला येण्यास वेळ आहे. शिवाय परतीचा पाऊस आला नाही, तर रब्बीचीही आशा नाही. - धनंजय सोळंके, नागापूर ता. परळी, जि. बीड
मराठवाड्यात खरीप पिकांच्या सोंगणी, मळणी लगबग
मराठवाड्यात खरीप पिकांच्या सोंगणी, मळणी लगबग

औरंगाबाद: अपेक्षित पावसाचा अभाव असलेल्या मराठवाड्यात पिकांची स्थिती समाधानकारक नाहीच. काढायला आलेल्या बाजरीची कुठं सोंगणी, कुठं मळणी सुरू आहे. दुसरीकडे पावसाळा संपत आला, तरी पाऊस यावा, यासाठी अजूनही शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र मराठवाड्यात पहायला मिळत आहे.

यंदाच्या खरिपात मराठवाड्यातील आठही तालुक्‍यात ४७ लाख ४६ हजार ८९९ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. गतवर्षीच्या खरिपात पेरणी क्षेत्र ४७ लाख ८८ हजार ६५९ हेक्‍टर इतके होते. यंदा त्यात १ लाख ७ हजार हेक्‍टरवर बाजरी, २ लाख ६९ हजार हेक्‍टरवर मका, ४ लाख ५६ हजार हेक्‍टरवर तूर, १ लाख २४ हजार हेक्‍टरवर मूग, १ लाख १३ हजार हेक्‍टरवर उडीद, १३ हजार ३०० हेक्‍टरवर भुईमूग, ४५६४ हेक्‍टरवर तीळ, १९ लाख ९१ हजार हेक्‍टरवर सोयाबीन, तर जवळपास १२ लाख १० हजार हेक्‍टरवरील कपाशीचा समावेश आहे. 

यंदा सुरवातीपासूनच मराठवाड्यात पावसाने निराशा केली. मराठवाड्यात अजूनही वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७१ टक्‍केच पाऊस झाला आहे. तब्बल २५ तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या ६० टक्‍केही पाऊस नाही. यामधील बीड, उस्मानाबाद  व लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या ५० टक्‍केही पाउस नाही. दुसरीकडे केवळ चार तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला आहे. त्यामुळे ना वेळेवर पेरण्या झाल्या, ना पिकांना गरजेच्या वेळी पाऊस झाला. त्यात लष्करी अळीने मक्याचे पीक उद्ध्वस्त केले. खाण्यापुरती बाजरी पेरणाऱ्या शेतकऱ्यांनी आजघडीला तिची सोंगणी सुरू केली आहे. सोंगुन ठेवलेल्या बाजरीच्या कणसांना ऊन देण्याचे काम सुरू आहे.  

मक्याची काढणी येत्या पंधरवड्यात सुरू होण्याची आशा आहे. लष्करी अळीच्या आक्रमणामुळे या पिकाकडून नगदी काही पदरात पडेल, अशी आशा नाही. सर्वाधिक क्षेत्रावरील सोयाबीनची काढणी ऐण दिवाळीच्या धामधुमीत येण्याचीच जास्त शक्‍यता आहे. अनेक भागांत गत आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक ऊन धरत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत परतीच्या पावसाने कृपा न केल्यास सोयाबीनच्या उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. सप्टेंबरच्या सुरवातीला आलेल्या पावसाने कपाशीला वाचविण्याचे काम केले असले, तरी आताही तिला पावसाची नितांत गरज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com