मराठवाड्यातील पाणीसाठ्यात ३५ दिवसांत १३ टक्क्यांची घट

मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ३५ दिवसांत जवळपास १३ टक्‍के घटला आहे. २० नोव्हेंबरअखेर मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांत ९३ टक्‍क्‍यांवर असलेला उपयुक्‍त पाणीसाठा २५ डिसेंबरअखेर ८० टक्‍क्‍यांवर आला आहे.
Marathwada water supply reduced by 13% in 35 days
Marathwada water supply reduced by 13% in 35 days

औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ३५ दिवसांत जवळपास १३ टक्‍के घटला आहे. २० नोव्हेंबरअखेर मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांत ९३ टक्‍क्‍यांवर असलेला उपयुक्‍त पाणीसाठा २५ डिसेंबरअखेर ८० टक्‍क्‍यांवर आला आहे.  

मराठवाड्यातील ८७६ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह गोदावरी, मांजरा, तेरणा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा २० नोव्हेंबर अखेर ९३.६३ टक्‍के होता. त्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांत ९९.७५ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांत ९१.८१ टक्‍के, ७५२ लघू प्रकल्पांत ७८.२९ टक्‍के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यातील ८१.६६ टक्‍के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ९३.७४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश होता.

लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा झपाट्याने घटला आहे. २० नोव्हेबर अखेर ७८ टक्क्‍यांवर असलेल्या सर्व लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठ्यात जवळपास ३० टक्‍के घट नोंदली गेली आहे. २० नोव्हेंबर अखेर मराठवाड्यातील ९५२ लघू प्रकल्पांपैकी औरंगाबादमधील ९६ प्रकल्पांत ७९ टक्‍के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ७६ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ८७ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ८० टक्‍के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत ६७ टक्‍के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ८९ टक्‍के, परभणीमधील २२ प्रकल्पांत ८५ टक्‍के तर हिंगोलीतील २६ लघू प्रकल्पांत असलेल्या ९३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश होता.

२५ डिसेंबर अखेर ८७६ प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ८०.५४ टक्‍क्‍यांवर आला आहे. सद्यःस्थितीत मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ९०.८६ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांत ८२.४९ टक्‍के, ७५२ लघू प्रकल्पांत ४७.९२ टक्‍के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात ७७.४२ टक्‍के तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यात ९३.७४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

६ लघू प्रकल्प कोरडे, २२ जोत्याखाली ७५२ लघू प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामध्ये लातूरमधील ४ तर औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. दुसरीकडे २२ लघू प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी १ तर औरंगाबादमधील ५ व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. २० नोव्हेंबर अखेर ५ लघू प्रकल्प कोरडेठाक पडलेले होते. तर १६ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली होता हे विशेष.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com