‘मराठवाडी’वर अस्वस्थ मने अन्‌ ढिम्म प्रशासन

‘मराठवाडी’वर अस्वस्थ मने अन्‌ ढिम्म प्रशासन
‘मराठवाडी’वर अस्वस्थ मने अन्‌ ढिम्म प्रशासन

ढेबेवाडी, जि. सातारा ः सांडव्याचे बांधकाम केल्याने या वर्षीच्या पावसाळ्यात मराठवाडी धरणात पाणीसाठा वाढणार असून, जलाशयालगतच्या गावांमधील काही घरांना पाण्याचा वेढा पडणार असल्याचे पाटबंधारे विभागाने केलेल्या मार्किंगवरून स्पष्ट होत आहे. पावसाळ्यात गंभीर परिस्थिती ओढवण्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून आवश्‍यक उपाययोजनांसाठी संबंधितांना कडक सूचना देण्याची मागणीही होत आहे. 

जलाशयालगतच्या उमरकांचन, मेंढ, घोटील या गावांत अजूनही काही धरणग्रस्त कुटुंबांचे वास्तव्य असल्याने प्रत्येक पावसाळ्यात फुगवटा वाढल्यावर त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहतात. या वर्षी सांडव्याच्या बांधकामामुळे धरणात ६४३ मीटर पाणीसाठा होईल, असा अंदाज असल्याने अंतर्गत गावांतील काही घरांना पाण्याचा वेढा पडणार, हे निश्‍चित आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने संबंधित गावांतील घरांवर मार्किंग करून पाणी नेमके कुठपर्यंत पोचेल, हे स्पष्ट केले आहे. संबंधित कुटुंबांचा सर्व्हे करून तेथील व्यक्ती व अन्य बाबींची माहिती घेण्यात आली आहे. 

स्थलांतरासाठी आजूबाजूच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी तात्पुरते निवारा शेड उभारणीचे कामही सुरू आहे. रिकाम्या शाळा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणारी गावठाणे, उंचावरील मोकळ्या जागा अशी ठिकाणे शेड उभारणीसाठी निश्‍चित करण्यात आली आहेत. या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असते. दहा बाय १५ च्या पत्र्यांच्या शेडमध्ये प्रापंचिक साहित्य कुठे ठेवायचे, जनावरे कुठे बांधायची आणि राहायचे कुठे, असे अनेक प्रश्न असल्याने धरणग्रस्त कुटुंबे अस्वस्थ आहेत. 

दहा वर्षांपूर्वी केलेल्या अंशत: घळभरणीनंतर सांडव्याचे बांधकाम झाले नसतानाही प्रत्येक पावसाळ्यात या धरणाच्या पाण्याच्या वेढ्याने धरणग्रस्त गावांमध्ये जनजीवन विस्कळित होते, हे वास्तव समोर असताना आता नव्याने झालेल्या सांडव्याच्या बांधकामामुळे मोठीच बिकट परिस्थिती होण्याची चिन्हे आहेत.

पावसाळ्याच्या तोंडावर संतप्त प्रतिक्रिया धरणातील ०.६० टीएमसीवरील पाणीसाठा १.०५ टीएमसी म्हणजे जवळजवळ दुपटीच्या जवळपास जाणार असल्याने तातडीने आवश्‍यक उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. पावसाळा अगदीच तोंडावर आला असतानाही प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com