अल्पभूधारक शेतकरी कन्येचा ‘करिष्मा’... झाली ‘पीएसआय’

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : अवघ्या दीड एकर शेतात राबून आपल्या कुटुंबाचे रहाटगाडगे चालविणारे एक सर्वसामान्य शेतकरी दांपत्य सध्या जाम खूश आहे. कारण ठरले त्यांच्या मुलीने दाखविलेल्या करिष्माचे. लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल नुकताच लागला अन् त्यात यश मिळवत या शेतकरीकन्येने बाजी मारली.
अल्पभूधारक शेतकरी कन्येचा ‘करिष्मा’... झाली ‘पीएसआय’
अल्पभूधारक शेतकरी कन्येचा ‘करिष्मा’... झाली ‘पीएसआय’

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : अवघ्या दीड एकर शेतात राबून आपल्या कुटुंबाचे रहाटगाडगे चालविणारे एक सर्वसामान्य शेतकरी दांपत्य सध्या जाम खूश आहे. कारण ठरले त्यांच्या मुलीने दाखविलेल्या करिष्माचे. लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल नुकताच लागला अन् त्यात यश मिळवत या शेतकरीकन्येने बाजी मारली. करिष्मा ‘पीएसआय’ झाल्याची माहिती कळताच गावात समाधान व्यक्त झाले. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली हे जेमतेम ९०० लोकसंख्येचे गाव. गावाला शैक्षणिक अन् सांस्कृतिक वारसा आहे. गावातील अल्पभूधारक शेतकरी बापूजी मोरे हे आपल्या दीड एकर शेतीच्या माध्यमातून आपले अन् आपल्या कुटुंबीयांचे रहाटगाडगे चालवितात. करिष्मा ही त्यांची लहान कन्या. तिचे प्राथमिक शिक्षण कुडेसावलीतच झाले. यानंतर येनबोडी येथील कर्मवीर विद्यालयातून तिने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मोठा भाऊ अमोल चंद्रपूरला राहत असल्याने तिने नंतर तेथील एफईएस महाविद्यलयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या कुटुंबीयांची परिस्थिती बघता केवळ स्पर्धा परीक्षाच आपले भविष्य घडवू शकते, याची जाणीव करिष्माला होती अन् यातूनच तिने पुणे गाठण्याचा निर्णय घेतला. २०१८ या सत्रात ‘एमपीएससी’ची ‘पीएसआय’ पदाकरिता जाहिरात निघाली अन् ही पोस्ट कुठल्याही स्थितीत काढण्याचे ध्येय बाळगत ती पुण्याला गेली. परीक्षा जवळ होती अन् वेळ कमी, अशाही स्थितीत तिने प्रचंड परिश्रम घेतले. सातत्याने अभ्यास केला अन् परीक्षा दिली. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आव्हान होेते ते मुख्य परीक्षेचे. यातही करिष्माने हे आव्हान पेलत यश मिळविले. ‘फिजिकल’ परीक्षेची पायरी तिने ओलांडली. २०१८ मध्ये दिलेल्या या परीक्षेच्या निकालासाठी करिष्माप्रमाणे अनेकांना प्रतीक्षा होती. पण, आयोगाने तब्बल दोन वर्षांनंतर अखेर नुकताच पीएसआय पदाचा निकाल जाहीर झाला अन् करिष्मा या परीक्षेत उत्तीर्ण झाली. आपली मुलगी पीएसआय होणार, ही बातमी आईवडील, भाऊ व कुटुंबीयांना कळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. शेतात राबराब राबणारे तिचे आईवडील जाम खूष झाले. करिष्माने मिळविलेल्या यशाबद्दल गावातील अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. कुडेसावलीचे सरपंच मारोती मडावी, उपसरपंच राजेश डोडीवार यांनी करिष्माला शुभेच्छा देत आपणास तिचा अभिमान असल्याचे सांगितले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राज्याच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक तरुणांनी स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळविले आहे. आता या यादीत करिष्माने मिळविलेल्या यशाने अनेक तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यशश्वी झालेल्यांची प्रेरणा घेत ते प्रचंड परिश्रम घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना करिष्मा मोरे हिचे यश पुन्हा प्रोत्साहन देणारे ठरले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com