झेंडू उत्पादकांची बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार

मी यावर्षी २० गुंठे लागवड केली आहे. या क्षेत्रात चार हजार रुपयांचे बियाणे लावले होते. तसेच खत, फवारणी इतर सर्व १० ते १२ हजार रुपये खर्च केलेला आहे. आता हा खर्चही निघेल की नाही हे दिसत नाही. यावर्षी कंपनीने बोगस बियाणे दिल्याने फुलेच लागलेली नाहीत. - शंकर कुळाल, झेंडू उत्पादक, एकलासपूर, जि. वाशीम
झेंडू उत्पादक
झेंडू उत्पादक

वाशीम ः जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात अनेक शेतकरी दरवर्षी झेंडूचे उत्पादन घेतात. एकलासपूर हे गाव झेंडू उत्पादनासाठी ओळखले जाते. या वर्षी झेंडूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी बियाणे कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली आहे. सेनगाव येथील कृषी केंद्रातून केशर गोल्ड नावाच्या झेंडू बियाण्याची खरेदी करीत लागवड केली होती. आता पाच ते सहा महिने होऊनही झेंडूच्या झाडांवर पुरेशी फूलधारणा झालेली नसल्याने फसवणूक झाल्याची बाब समोर आल्याचा दावा केला जात आहे.  एकलासपूर गावात या हंगामात शेकडो शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. मात्र संबंधित कंपनीच्या बियाणे दोषामुळे झेंडू उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. झेंडूच्या झाडांची निर्धारित दिवसांत वाढ झाली असली तरी, अपेक्षित फुले लागली नाहीत. पुढील आठवड्यात नवरात्रोत्सव, दसऱ्यासारखा मोठा सण असून, या वेळी झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी राहते. त्यानंतर दिवाळी येते. या सण, उत्सवांच्या काळात असलेली मागणी लक्षात घेता शेतकरी दरवर्षी नियोजन करीत लागवड करतात. याही वर्षी पेरणी केली. परंतु झाडांवर फुले उमललेली नाहीत.   शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत पाहणी करून पंचनामा करावा, सदर बियाणे उत्पादक कंपनी व विक्रेत्याविरुद्धही कारवाई करावी, अशी मागणी अरविंद कुळाल, संतोष कुळाल, श्रीराम गांधीले, संतोष डहाळके, खुशालराव कुळाल, भागवत सोनुने, सुरेश गवळी, गजानन बांगरे, केशव कुळाल, विठ्ठल गवळी, गणेश गांधिले, गजानन गवळी आदींनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com