दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूला दराची लाली

या वर्षी मी पाच एकरांत झेंडूची लागवड केलेली आहे. सध्या बाजारात समाधानकारक दर मिळत आहेत. मागील वर्षी झालेले नुकसान या वर्षी काही प्रमाणात भरून निघेल, असे वाटते आहे. - उमेश फुलारी, फूल उत्पादक, पातूर, जि. अकोला
दानापूर (जि. अकोला) येथे पुरुषोत्तम घायल यांनी लावलेल्या शेतात अशी फुले उमलली आहेत.
दानापूर (जि. अकोला) येथे पुरुषोत्तम घायल यांनी लावलेल्या शेतात अशी फुले उमलली आहेत.

पुणे ः दसरा सणामध्ये झेंडूच्या फुलांनी मागणी असते. गेल्या वर्षी कमी दर मिळाल्याने यंदा घटलेली लागवड आणि त्यातच पावसाचा खंड, कीडरोगाचे आक्रमण आणि फूलकाढणीच्या वेळी झालेला पाऊस, यामुळे उत्पादन घटले. बाजारात आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. राज्यातील महत्त्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आणि अकोला बाजारपेठांमध्ये झेंडूला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एकूणच यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटले असले, तरी झेंडूला दराची लाली आली आहे. आवक घटल्याने मुंबईत झेंडू तेजीत झेंडू उत्पादन घटल्याने दराने उच्चांक गाठला आहे. दादरमधील फूलबाजारात उत्तम प्रतीच्या झेंडूला ८० रुपये, तर शेवंतीला २०० रुपये किलो दर आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबईतील झेंडू मार्केटमधे सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. यंदाही बदलत्या वातावरणाचा झेंडूला फटक बसला आहे. दसऱ्यासाठी मुंबईत ८० ते १०० ट्रक झेंडू आवक झाली आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या झेंडूचा दर ८० रुपये, तर दुय्यम दर्जाच्या झेंडूला ५० रुपये किलो दर मिळत आहेत. नामधारी झेंडू प्रतिकिलो ५० ते ६० रुपये असून, कलकत्ता झेंडू ८० ते १०० रुपये किलोने विक्री होत आहे. यंदाची झेंडू आवक प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकमधून झाल्याची माहिती स्थानिक फूल व्यापारी पंढरीनाथ पानसकर यांनी दिली.  अकोल्यात ६५ रुपये प्रतिकिलो या वर्षी झेंडूच्या फुलांना चांगले दर मिळत आहेत. गेल्या वर्षी पाच ते दहा रुपये असलेला दर किलोला ६० ते ६५ रुपये आहे. झेंडू फुलांसाठी अकोला ही चांगली बाजारपेठ आहे. या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बुलडाणा, वाशीम, मराठवाड्यातील जिल्ह्यांमधून फुलांची ५० क्विंटलपर्यंत ही आवक आहे. या वर्षी फुलांना ३० ते ४० रुपये सरासरी दर मिळत आहे. हाच दर ५० ते ६० रुपये राहू शकतो, अशी शक्‍यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोल्हापुरात प्रतिकिलोस ८० रुपये​ गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील झेंडू पट्ट्यात यंदा लागवडीत पन्नास टक्के घट झाल्याने यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला दर मिळत आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुंबई बाजारपेठेत झेंडूला ६० ते ८० रुपये प्रतिकिलो इतका दर मिळत आहे. यामुळे यंदाच्य सणासुदीत झेंडू उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात झेंडूचे बंपर पीक आले होते. परंतु एकाचवेळी मुंबईसह अन्य बाजारपेठांतही आवक वाढली. परिणामी झेंडूला तीन ते चार रुपये किलोपर्यंत नीचांकी भाव मिळत होता. गेल्या पंधरा दिवसांपासून झेंडूच्या दरात सातत्य असल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले. किलोस ५० रुपयांच्या आसपास दर आहे. गेल्या आठ दिवसांपासून ८० रुपयापर्यंत दर गेल्याचे फूलबाजारातील सूत्रांनी सांगितले.  औरंगाबादेत किलोला ६० रुपये दर औरंगाबादच्या बाजारपेठेत तीन दिवसांपासून झेंडूचे दर वधारले आहेत. पुरवठा कमी असल्याने शुक्रवारी (ता. २९) झेंडूचे घाऊक दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपये, तर किरकोळ दर ८० ते १०० रुपये होते. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वानेगाव, पिसादेवी पोखरी तसेच विदर्भातील वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांतूनही विक्रीसाठी थेट शेतकरी शहरात दाखल झाले होते. यंदा कीडरोगाने खर्च वाढवूनही अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याची माहिती वाशीम जिल्ह्यातील मोहजाबंदी येथील नारायण नागरे यांनी सांगितले. नवरात्राच्या पहिल्या चार दिवसांत २० ते २५ रुपये किलो विकल्या जाणाऱ्या झेंडूचे दर वाढतच आहेत. सोमवारपर्यंत (ता. २५) झेंडूचे दर १० ते २५ रुपये, मंगळवारी (ता. २६) ४० रुपये आणि बुधवारी (ता. २७) प्रतिकिलो ५० रुपये तर गुरुवारी (ता. २८) ६० रुपये दर मिळाला होता. कलकत्ता झेंडूफुलाची जवळपास २५ ते ३० क्‍विंटल होणारी आवक शुक्रवारी ५० ते ६० क्‍विंटलवर पोचली. परभणीत पावसाचा खंड, कीड, रोगाने झेंडूच्या उत्पानात घट  पावसाचा खंड आणि करपा रोग, वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील झेंडू पिकाचे नुकसान झाले. परभणी बाजारपेठेत गुरुवारी (ता. २८) झेंडू फुलांची ५ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये मिळाले. शेवडी (ता. जिंतूर) हे जिल्ह्यातील झेंडू उत्पादक गाव आहे. तेथे दरवर्षी ५० एकरवर झेंडू लागवड केली जाते. यंदा मात्र २० ते २२ एकरवर लागवड झाली. त्यापैकी ५० टक्के झेंडू करपा रोगामुळे मोडून टाकावा लागला. नागपूर, हैदराबाद, पुणे, परळी या ठिकाणचे व्यापारी गावातून २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने झेंडूची खरेदी करत आहेत.  जळगावात ८० रुपये किलो येथील घाऊक फूलबाजारामध्ये गुरुवारी (ता. २८) सकाळी कलकत्ता झेंडूला ८० रुपये किलोपर्यंत दर मिळाला. तर गावरान झेंडूला कमाल ४० रुपये प्रतिकिलो दर होता. सध्या धुळे, मलकापूर, बुलडाणा, कन्नड, शिरसोली, सिल्लोड, नशिराबाद आदी ठिकाणांहून २३ ते २४ क्विंटल झेंडूची आवक होत आहे. या महिन्याच्या मध्यात झालेल्या पावसामुळे झेंडूच्या फूलशेतीला फटका बसला. फुलांचा आकार न वाढताच त्यांची गळती झाली. याचा परिणाम बाजारातील झेंडूच्या आवकेवर दिसून आला. गावरान झेंडूला ३० ते ४० व कलकत्ता झेंडूला ६० ते ८० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.  सोलापुरात झेंडूला मागणी वाढली दसरा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने या उत्सवामध्ये मागणी असलेल्या झेंडूची आवक आणि दर वधारले. गुरुवारी (ता. २८) झेंडूला सर्वाधिक प्रतिकिलो ७० रुपये इतका दर मिळाला. उस्मानाबाद, सांगली आणि साताराच्या काही भागांतूनही आवक होते. गेल्या आठवड्यापासून आवकेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात झेंडूची आवक अगदी काहीच नव्हती; पण या सप्ताहात मात्र त्यात लक्षणीय वाढ झाली. पण मागणीही असल्याने झेंडूचे दर वधारले आहेत. त्यातही पिवळा, फिकट भगवा अशा झेंडूमध्ये पिवळ्या झेंडूला मोठी मागणी आहे. दोन दिवसांपूर्वी रोज पाच-पाच गाड्यांपर्यंत अशी आवक होत होती. गेल्या दोन दिवसांत त्यात काहीशी घट झाली; पण मागणी वाढत आहे. गुरुवारीही बाजारात अगदीच एक-दोन गाड्या अशीच झेंडूची आवक झाली. झेंडूला प्रतिकिलोला २० ते ७० व सरासरी ६० रुपये दर मिळाला. स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरील व्यापारीही बाजारात आहेत. त्यामुळे झेंडूला चांगलाच उठाव मिळतो आहे. प्रतिक्रिया मी गेल्या दहा वर्षांपासून झेंडूची लागवड करीत असतो. या वर्षी दोन एकरांत पेरणी केली आहे. सध्या फुलांची काढणी सुरू असून, ४० ते ५० रुपये किलोचा दर मिळत आहे.  - पुरुषोत्तम घायल, फूल उत्पादक, दानापूर, ता. तेल्हारा, जि. अकोला गेल्या वर्षी फुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने मी दररोज दोन गाड्या झेंडू मुंबई बाजारपेठेत पाठवत होतो. यंदा हेच प्रमाण एका गाडीवर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दर चांगले आहेत.  - अनिल कोगनोळे, फूल व्यापारी  मी प्रत्येक वर्षी झेंडूदरासाठी झुंजत असतो. सध्या तरी दर चांगला मिळत आहे. यंदाही पावसामुळे झेंडू काढणी करताना कसरत करावी लागत आहे. - रोहित पाटील,  झेंडू उत्पादक, हातकणंगले गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी एकरभर झेंडू लागवड करत आहे. यंदा पावसाच्या उघडिपीत तांब्याने पाणी घालून झेंडू पीक जोपासले. परंतु करपा पडल्यामुळे ३० गुंठे झेंडू मोडून टाकावा लागला. - प्रल्हाद काळे, शेतकरी, शेवडी, ता. जिंतूर मागील १० ते १२ दिवसांपासून झेंडूच्या फुलांचे तोडे कमी झाले आहेत. त्यांची हातोहात विक्री झाली. दरही बरे होते. आवक तशी कमी असल्याचे दिसून आले.  - दीपक बारी, फूल उत्पादक, शिरसोली, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com