लक्ष्मीपूजनच्या पार्श्वभूमीवर झेंडूने खाल्ला भाव

आमच्या झेंडूला दर बरे मिळत आहेत. दसरा सणानंतर आता दिवाळी सणालाही दर मिळाल्याने तेवढा लाभ होणार आहे. आम्ही दोन दिवस उशिराने झेंडूची तोडणी करून त्याची आज (गुरुवारी) विक्री केली. - दीपक बारी, शेतकरी, शिरसोली, जि. जळगाव
झेंडू फुले विक्रेत्यांनी अनेक लहान, मोठे स्टॉल जळगाव शहरात लावलले होते. यामध्ये कोलकता प्रकारातील झेंडू लक्ष वेधून घेत होता
झेंडू फुले विक्रेत्यांनी अनेक लहान, मोठे स्टॉल जळगाव शहरात लावलले होते. यामध्ये कोलकता प्रकारातील झेंडू लक्ष वेधून घेत होता

नाशिकला प्रतिक्विंटल २५० ते ५०० रुपये नाशिकच्या फूलबाजारात गुरुवारी (ता. १९) प्रति ४० किलो वजनाच्या झेंडूच्या क्रेटला १०० ते २०० व सरासरी १५० रुपये दर मिळाला. अर्थात प्रतिक्विंटलला २५० ते ५०० व सरासरी ४०० रुपये दर मिळाला. नाशिकचा सराफ बाजारातील फूलबाजार, रविवार कारंजा या भागात १०० वाहनांमधून फुलांची आवक झाली. झेंडूच्या एकूण १५ हजार क्रेटची आवक झाली. एका क्रेटमध्ये ४० किलो फुले बसतात. नाशिकसह नगर जिल्ह्यातूनही झेंडू व शेवंतीच्या फुलांची मोठी आवक झाली.  सलग नऊ दिवस पावसाने झोडपल्यानंतरही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी झेंडू पीक वाचवले. एका क्रेटला साधारणपणे ४० रुपयांपर्यंत येणारा खर्च यंदा दुपटीने वाढून ८० रुपयांपर्यंत गेला आहे. या स्थितीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, गुरुवारी (ता. १९) प्रतिक्रेटला सरासरी ३०० रुपये दर मिळेल ही आशा होती. मात्र या वेळी प्रतिक्रेटला १५० रुपयांपर्यंत दर उतरल्याने फुलोत्पादकांचा हिरमोड झाला.  दसऱ्यानंतर सलग नऊ दिवस पावसाने फूलशेतीला झोडपले. पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहावा, यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या प्रतिकूल वातावरणात पीक संरक्षणावरील खर्चात वाढ झाली. उत्पादनात ५० टक्‍क्‍यांहून अधिक घट झाली. या स्थितीत झेंडूला तेजीचा दर मिळेल ही अपेक्षा मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोल ठरली. वसुबारसेच्या दिवशी, सोमवारी (ता. १६) झेंडूच्या क्रेटला २०० ते ४०० व सरासरी ३०० रुपये दर होते. हा दर पुढील तीन दिवस बुधवार (ता. १८) पर्यंत टिकला. गुरुवारी (ता. १९) सकाळपासूनच नाशिक शहराच्या सर्व भागांत झेंडू फुलांची आवक वाढली. परिणामी दर निमम्याने उतरले. गुरुवारी (ता. १९) दुपारी १२ पर्यंत शेतकऱ्यांनी आणलेला माल ९० टक्के आटोपला होता. 

औरंगाबादेत प्रतिकिलो ४० ते ५० रुपये औरंगाबादच्या बाजारपेठेत गुरुवारी (ता. १९)  झेंडूची मोठ्या प्रमाणात आवक झाली. सोबतच औरंगाबादसह नगर जिल्ह्यातूनही शेवंतीची आवक झाल्याने झेंडूबरोबरच शेवंतीची खरेदी करण्यावर ग्राहकांनी भर दिल्याने झेंडूचे ठोकचे दर ४० ते ५० रुपये, तर किरकोळ बाजारात ४० ते ७० रुपयांपर्यंत होते.  औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वानेगाव, पिसादेवी पोखरी भागांतूनच झेंडू फुलांची आवक झाली. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांतूनही शेतकरी झेंडूच्या किरकोळ विक्रीसाठी थेट औरंगाबाद शहरात दाखल झाले होते. यंदा झेंडूचे उत्पादन अत्यल्प आहे. त्याला रोग किडी कारणीभूत ठरल्या असून, उत्पादन खर्च वाढवूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने झेंडूदराकडून शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या. दसऱ्याच्या तुलनेत दिवाळीत जास्त महत्त्व नसले, तरी झेंडू खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. परंतु दसऱ्याच्या तुलनेत आवक तीन ते चार पट वाढल्याने झेंडूचे ठोक बाजारातील दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलो राहिल्याची माहिती झेंडू उत्पादक व विक्रेते विखे पाटील यांनी दिली. सप्टेंबरअखेरीस पहिल्यांदा औरंगाबादच्या बाजारात झेंडूचे दर प्रतिकिलो ४० वर पोचले होते. दसऱ्यात साध्या व कलकत्ता झेंडू फुलांची आवक ५० ते ६० क्‍विंटलवर पोचली  होती.  पुण्यात प्रतिकिलो ५० ते १०० रुपये दर लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या निमित्ताने विविध फुलांना मागणी वाढल्याने दरात वाढ झाली हाेती. पुणे बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) झेंडूला प्रतिकिलाेला ५० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे फूलबाजार अडते असाेसिएशनचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी सांगितले.  गायकवाड म्हणाले, की यंदा पावसाने पुणे जिल्ह्यातील यवत, पुरंदर परिसरांतील फुलांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली हाेती. परिणामी स्थानिक आवक घटली हाेती. मात्र मराठवाड्याच्या विविध भागांतून झेंडूची माेठी आवक झाली हाेती. या वेळी झेंडूला प्रतिकिलाेला ५० ते ८०, तर कलकत्ता गाेंड्याला ६० ते १०० रुपये दर मिळाला. उद्या (शुक्रवारी) पाडवा असल्याने आजच माेठ्या प्रमाणावर खरेदी वाढल्याने दर गेल्या दाेन-तीन दिवसांपेक्षा वाढले हाेते. गणपती, नवरात्र आणि दसऱ्यानंतर दिवाळीसाठीचे नियाेजन केलेले झेंडूचे पीक अंतिम टप्प्यात आले असल्यानेदेखील आवक तुलनेने कमी हाेती.

जळगावात प्रतिकिलो ४० ते ६० रुपये येथील घाऊक फूल बाजारात गुरुवारी (ता. १९) झेंडूच्या फुलांची २८ क्विंटल आवक झाली. त्याला ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.  लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे सलग तीन दिवस झेंडू व इतर फुलांची मागणी कायम राहणार आहे. या सणासुदीच्या दृष्टीने फूल उत्पादकांनीदेखील तयारी केली. या आठवड्यात तोडणीवर आलेली फुले दोन दिवस विलंबाने तोडायला सुरवात केली. त्यामुळे लक्ष्मीपूजनाला अधिकचे दर त्यांना मिळू शकले. घाऊक बाजारात कन्नड (जि. औरंगाबाद), चाळीसगाव, बुलडाणा, सिल्लोड, धुळे, मलकापूर, नांदुरा, जळगाव जिल्ह्यांतील पहूर, शिरसोली, नशिराबाद, विदगाव आदी ठिकाणचे फूल उत्पादक पहाटेच आले. अगदी पहाटे ५.३० पासून लिलावास सुरवात झाली. कलकत्ता प्रकारातील पिवळ्या व लाल झेंडूला अधिकची बोली लागली. ४० रुपयांपासून बोली लागली. अखेरीस ६० रुपये प्रतिकिलो दरात शेतकऱ्यांनी विक्रीची तयारी दाखविली. कलकत्ता प्रकारातील झेंडूची हातोहात विक्री झाली. इतर प्रकारातील झेंडूच्या फुलांनाही मागणी कायम होती.  या आठवड्यात गुरुवारी झेंडूची सर्वाधिक २८ क्विंटल आवक झाली. एरवी २० ते २२ क्विंटलपर्यंत आवक असते. आवक अधिक झाल्याने दर कमी होतील, असे सुरवातीला वाटत होते, पण सणासुदीमुळे दरही कायम राहिले.  किरकोळ बाजारात ८० रुपये दर घाऊक बाजारात झेंडूला ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला. दुसऱ्या बाजूला किरकोळ बाजारात वेगवेगळे दर होते. साध्या प्रकारातील झेंडूची ४० ते ५० रुपये प्रतिकिलो या दरात विक्री होत होती. तर कलकत्ता प्रकारातील झेंडूची ८० रुपये किलो दरात विक्री सुरू होती.  सांगलीत प्रतिकिलो १०० रुपये दर गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने झेंडू बागांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बाजारात झेंडूची आवक घटली असून, झेंडूचे दर प्रतिकिलोस १०० रुपये असे आहेत. यामुळे फूल उत्पादकांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून फुलांची आवक झाली असली, तर दवर्षीच्या तुलनेत बाजारपेठेत झेंडूची आवक कमी झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील वाळवा, मिरज तालुक्‍यांत झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. झेंडू उत्पादक शेतकरी दसरा आणि दिवाळी सणात झेंडूचे उत्पादन आणि अपेक्षित दर मिळत असल्याने झेंडूची लागवड करतात. मात्र, परतीच्या पावसाने झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने फुलांची तोडणीही शेतकऱ्यांना करता आली नाही. त्याचप्रमाणे फुलांवर रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. याचा परिणाम बाजारपेठतही दिसून आला. यामुळे झेंडूची आवक कमी झाल्याने झेंडूचे दर तेजीत अाहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. दसऱ्याला झेंडूला अपेक्षित दर मिळाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण होते. दसऱ्यातील दर दिवाळीतही टिकून असल्याने झेंडूला प्रतिकिलोस १०० रुपये असा दर मिळतो आहे. अपेक्षित दर मिळाल्याने झालेल्या नुकसानाची थोडीफार भरपाई होईल, असे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. परभणीत प्रतिकिलो ४० ते ६० रुपये परभणी येथील बाजारपेठेत बुधवारी (ता. १८) १० ते १५ क्विंटल झेंडू फुलांची आवक होती. सरासरी ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू होती. यंदा एक एकर झेंडू लावला होता. त्यापासून ४०-५० क्विंटल फुलांचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु, पावसामुळे भिजल्यामुळे काळी पडलेली फुले फेकून द्यावी लागली. निवडलेली १० क्विंटल फुले विक्रीस उपलब्ध झाली असे शेवडी (ता. जिंतूर) येथील संतोष काळे यांनी सांगितले.  वादळी वाऱ्यामुळे झेंडूचे मोठे नुकसान झाले, असे पांगरा शिंदे येथील सूर्याजी शिंदे यांनी सांगितले. पावसामुळे झेंडू सोबतच जरबेरा, जाई या फुलांचेदेखील नुकसान झाले. भिजून काळवंडलेल्या झेंडू फुलांची कमी दराने विक्री करावी लागत आहे, असे मुदखेड येथील शेतकरी गंगाधर कोमावार यांनी सांगितले. परतीच्या पावसाचा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसामुळे भिजून काळवंडलेल्या फुलांना कमी दर मिळत आहे. करपा रोगामुळे झेंडू उत्पादनात घट झाली आहे. फुलांची आवक कमी झाल्यामुळे झेंडू फुलांचे दर वधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात दीर्घ खंड पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तांब्याने पाणी घालून पीक जोपासले होते.

दिवाळीसाठी ठेवलेल्या फुलांपासून चांगले उत्पादन मिळेल अशी आशा या शेतकऱ्यांना होती. परंतु, सहा आॅक्टोबरनंतर वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने थैमान घातले. झाडे मोडून पडली. सततच्या पावसात भिजून फुले काळी पडली. पावसानंतर धुके पडले. करपा रोग पडल्याने फुले खराब झाली. काळी पडलेल्या फुलामधून निवडलेली फुले विक्रासाठी न्यावी लागत आहेत.

प्रतिक्रिया  लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांत झेंडू फुलांना मागणी असते. त्यासाठी व्यापाऱ्यांनी बुधवार (ता. १८) पर्यंतच खरेदी पूर्ण केली. गुरुवारी (ता. १९) स्थानिक ग्राहक खरेदी करतात. या वेळी आवक नेहमीपेक्षा जास्त वाढली. यंदा खर्च जास्त वाढला होता. त्या प्रमाणात कमी दर मिळाले. - सचिन धोंडगे, मातोरी, ता. जि. नाशिक पावसाने बागेचे फार मोठे नुकसान झाले आहे. झेंडूची आवक कमी असल्याने दर चांगले मिळाल्याने आनंदी आहे. - प्रकाश पाटील, शेतकरी, कामेरी, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com