येवला बाजार समितीच्या पुढाकाराने सुरू होणार छावण्या

यावर्षी दुष्काळाची तीव्रता १९७२ सारखी भयानक आहेत. उत्तर-पूर्व भागात तर दोन-पाच किलोमीटर फिरूनही थेंबभर पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे छावण्या सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरस होती. पशुपालकांची मागणी व परिस्थितीची दाहकता लक्षात घेऊन अंदरसूल, राजापूर, नगरसूल परिसरात छावण्या सुरू करण्याला प्राधान्य देण्यात यावे. - किशोर दराडे, आमदार
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

येवला, जि. नाशिक : तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर बनलेला असतानाच जनावरांनादेखील चारा पाणी मिळणे दुरापास्त बनले आहे. या गंभीर प्रश्नाकडे इतके दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असले तरी आता चारा छावण्या सुरू करण्याला प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार असून तहसील प्रशासनाने प्रस्ताव मागवले आहे.

तालुक्यात अल्पपावसामुळे तीव्र दुष्काळ आहे. पालखेड लाभक्षेत्रात किमान पिण्याचे पाण्याची गरज भागत आहे. मात्र दुष्काळी अवर्षणप्रवण उत्तर-पूर्व भागात माणसांना प्यायला पाणी मिळत नसल्याने हाल सुरू आहे. त्यातच पाण्याची काटकसर करून लोक टँकरचे पाणी जनावरांना देत आहे. अंदरसूल, उंदीरवाडी आदी भागात पशुपालकांनी प्लॅस्टिक कागद टाकून छोटे तळे तयार केले व त्यात टॅंकरने विकत पाणी घेऊन जनावरांची तहान भागवत असल्याचेही चित्र आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी गेल्या महिन्यापासून तहसीलदारांकडे सुरू होती. उंदिरवाडी, नगरसूल, ममदापूर, राजापूर आदी भागातून पत्रही दिले गेले होते, पण याकडे इतके दिवस दुर्लक्ष झाले.

दोन दिवसांपूर्वी आमदार छगन भुजबळ यांनी तालुक्यातील दुष्काळी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना तंबी दिली. त्यातच त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांचीही भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. तहसीलदारांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देऊन दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या भागात छावण्या सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा व त्यासाठीचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवावेत, असे पत्रात म्हटले आहे. बाजार समिती संचालक मंडळाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असली, तरी चारा छावणी सुरस करण्यासाठी बाजार समितीने तयारी दर्शविली असल्याचे सभापती उषाताई शिंदे यांनी सांगितले. 

दुष्काळात शेतकऱ्यांची होणारी होरपळ बघून छावण्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. सद्यःस्थितीत उत्तर-पूर्व भागात तीव्र पाणी व चाराटंचाई असल्याने या भागात सर्वाधिक टॅंकर सुरू आहेत. या भागातून छावण्यांची मागणी होत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त परिसरात छावण्यांसाठी चाचपणी करून निर्णय घेतला जाईल, असे ज्येष्ठ नेते  माणिकराव शिंदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com