दिवाळीअगोदरच बाजार समित्या बंद

दिवाळीच्या अनुषंगाने शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणत होते. मात्र असे असताना दिवाळीच्या आठवडाभर अगोदरच शुक्रवार (ता. २९) पासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच १० दिवस जिल्ह्यातील बाजार समित्यांनी लिलावाचे कामकाज बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे
Market committees closed before Diwali
Market committees closed before Diwali

नाशिक : दिवाळीच्या अनुषंगाने शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणत होते. मात्र असे असताना दिवाळीच्या आठवडाभर अगोदरच शुक्रवार (ता. २९) पासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच १० दिवस जिल्ह्यातील बाजार समित्यांनी लिलावाचे कामकाज बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. या गैरसोयीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे पणनने काढलेल्या सूचनेला केराची टोपली दाखवली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. 

अतिवृष्टीच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता वाचलेला शेतीमाल विक्रीसाठी लगबग सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतीमालाला अपेक्षित भाव नसल्याने हाती भांडवल नाही. त्यात दिवाळी कशीबशी गोड करण्यासाठी हाती असलेला शेतीमाल विक्रीसाठी आणल्या जात होता. एकीकडे अतिवृष्टीमुळे खरीप कांद्याचे नुकसान तर साठवलेल्या उन्हाळ कांद्याची वाढत असलेली सड यामुळे शेतकरी धास्तावला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांनी सुट्ट्या जाहीर केल्याने शेतीमाल विक्री करताना कोंडी केली आहे.

आता बाजार आवारात खरेदी-विक्री होणार नसल्याने शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करायची कशी, असा प्रश्‍न समोर उभा आहे. दिवाळीत बाजार समित्या बंद असतात. याचे कारण पुढे करून शेतकरी शेतीमाल घाईघाईने तयार करून बाजारामध्ये आणतो. पर्यायाने आवक वाढते आणि बाजारभाव कमी होतात हे गेले कित्येक दिवसांपासून असेच सुरू असल्याचा आरोप शेतकरी रामदास घोटेकर यांनी केला.    मग आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? दिवाळी सणानिमित्त शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असते. बाजार समित्या बंद ठेवल्या तर शेतकऱ्यांना कुठून पैसा उपलब्ध होणार, आमच्या घरात लेकराबाळांना कपडे, गोडधोड करायचं कसे? अगोदर अस्मानी अन् आता सुलतानी अशा दुहेरी संकटात शेतकरी आहे. मग आम्ही दिवाळी कशी साजरी करायची, अशी उद्विग्नता शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

पुन्हा तोच कित्ता गिरवण्याचा प्रकार  पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद ठेवता येणार नाहीत, अशी तंबी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या. त्यामुळे सूचनेला केराची टोपली अन् पुन्हा तोच कित्ता गिरवण्याचा प्रकार समोर आला आहे.

ऐन दिवाळीच्या काळात शेतकरी कांदा, सोयाबीन इतर हाताशी दोन पैसे मिळतील या आशेवर शेतकरी असतो. त्यातच मार्केट बंद केले याचा फायदा घेऊन सोयबीन मकाचे शिवार सौदे करणारे व्यापाऱ्यांना होईल अन् मात्र शेतकरी अडचणीत येईल. - शांताराम कमानकर, शेतकरी, भेंडाळी, ता. निफाड

ऐनवेळी निर्णय घेऊन शेतकऱ्यांची कुचंबणा केलेली आहे. किमान सोमवारपर्यंत बाजार समित्या सुरू ठेवावयास हरकत नव्हती. आज माल विकता येत नाही. दिवाळी सण उसनवारी करून साजरा करावा लागणार आहे. - योगेश शिरोरे, शेतकरी, खामखेडा, ता. देवळा

व्यापारी व बाजार समितीचे पदाधिकारी हे फक्त शेती मालाचे भाव कमी कसे होतील त्यासाठी एकत्र काम करतात असा प्रश्‍न निर्माण होत आहे. - वाल्मीक सांगळे, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com