शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
कृषिपूरक
कासदाहाकडे नको दुर्लक्ष...
कासदाहाचा प्रसार दूषित पाणी, दूषित उपकरणे तसेच दूध काढणाऱ्या व्यक्तींमार्फत होतो. संसर्गजन्य घटकांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आल्यानंतर याचा प्रादुर्भाव होतो. आजाराची लक्षणे ओळखून तातडीने उपचार करावेत.
कासदाहाचा प्रसार दूषित पाणी, दूषित उपकरणे तसेच दूध काढणाऱ्या व्यक्तींमार्फत होतो. संसर्गजन्य घटकांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आल्यानंतर याचा प्रादुर्भाव होतो. आजाराची लक्षणे ओळखून तातडीने उपचार करावेत.
कासदाह हा दुधाळ गायी, म्हशी तसेच शेळ्या आणि मेंढयांमध्ये होणारा सदोष पशू व्यवस्थापनाशी निगडित आजार आहे. या आजारामध्ये दीर्घकाळ दुग्धोत्पादनात घट, दुधातील स्निग्धांश कमी होणे, दूध खराब होते, कास निकामी होते. यामुळे औषधोपचाराचा खर्च वाढतो.
आजाराची कारणे
संसर्गजन्य घटक
- जिवाणू: उदा. स्टेफायलोकॉकस, स्ट्रेप्टोकोकस, एशेरिचिया कोलाय, मायकोप्लाज्मा इत्यादी
- विषाणू: उदा. लाळया खूरकूत आजार, गायीचा देवी आजार इत्यादी
- बुरशी: उदा. कँडीडा, एस्परजिलस इत्यादी
पूर्वनिश्चित घटक
- जास्त दूध देणाऱ्या गायी आणि म्हशी
- अपूर्ण व अनियमितपणे दूध काढणी
- सड आणि कासेमध्ये झालेली जखम
- गोठ्यातील खाचखळगेयुक्त जमीन
- दूध काढण्याच्या अयोग्य पद्धती
- लोंबणारी कास व लांब सडे
- गोठ्यातील अस्वच्छता, अयोग्य व्यवस्थापन
प्रसार
कासदाहाचा प्रसार दूषित पाणी, दूषित उपकरणे तसेच दूध काढणाऱ्या व्यक्तींमार्फत होतो. संसर्गजन्य घटकांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आल्यानंतर याचा प्रादुर्भाव होतो. बहुतेकवेळा याचे जिवाणू हे शरीरांतर्गत निर्माण होणारे असतात. कास, कातडी, जननेंद्रियाचा बाह्य भाग, श्वसननलिका आणि आतडी, इत्यादी अवयवांमध्ये दिसतात.
आजार होण्याची प्रक्रिया
- यामध्ये सर्वप्रथम जिवाणू सडाच्या अग्रावर आणि सडाच्या स्ट्रॅटम कॉर्नीयम या थरामध्ये सूक्ष्म वसाहती निर्माण करून दीर्घकाळ वास्तव्य करतात.
- या सूक्ष्म वसाहती प्रतिजैविके व नैसर्गिक रोग प्रतिकारास अभेद्य असतात. अनुकूल परिस्थिती मिळताच हे जिवाणू सडतील नलिकेचा अडथळा पार करून आतल्या पेशींना चिकटतात. त्यानंतर हा संसर्ग संपूर्ण कासेच्या पेशींमध्ये पसरतो.
- जिवाणू त्यांच्या पुनुरुत्पादानासाठी आवश्यक असणारे विषारी पदार्थ व संप्रेरके निर्माण करतात. हे पदार्थ शरीरातील लिम्फोसाइट या रक्तपेशींना दाहक सायटोकाईन्स व रासायनिक आकर्षके स्त्रवण्यास उत्तेजित करतात. यामुळे रक्तातील न्यूट्रोफील या पांढऱ्या रक्तपेशी कासेमध्ये आकर्षित होतात.
- न्यूट्रोफीलचे मुख्य कार्य जिवाणूंना गिळून मारून टाकणे हे आहे. त्याकरिता या पेशी अनेक संप्रेरके निर्माण करतात. परंतु याच संप्रेरकाच्या अतिरिक्त मात्रेमुळे कासेच्या उतींचे नुकसान होऊन दाह आणि जिवाणू संसर्ग वाढतो.
कॅलिफोर्निया सुप्त कासदाह चाचणी
- चारही सडांमधून प्रत्येकी तीन ते चार धारा काढून टाकाव्यात.
- त्यानंतर प्रत्येक कासेतून एक ते दोन धारा सी.एम.टी. पेडल च्या कपात अनुक्रमे घ्याव्यात.
- त्यामध्ये सारख्या प्रमाणात सी.एम.टी. द्रावण टाकून १० सेकंद घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावे.
निरीक्षण तक्ता
निरीक्षण | निष्कर्ष |
एकजीव मिश्रण तयार होणे | कासदाह नाही. |
१० सेकंदानंतर दूध किंचित घट्ट होणे | कासदाहाची सुरवात |
दूध घट्ट होणे, त्यात गुठळ्या/चकत्या होणे | + |
दूध घट्ट होऊन पातळ जेली सारखे होणे | ++ |
दूध घट्ट होऊन जाड जेली होणे | +++ |
चाचणी नंतर सी.एम.टी. पेडल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. |
उपचार
- जनावरांच्या कासदाह बाधित सडातील दूध पूर्णपणे काढून टाकावे.
- आपल्या नजीकच्या नोंदणीकृत पशुवैद्यकाकडून त्वरित उपचार करून घ्यावेत.
- कासदाहावर उपचार करण्यापूर्वी दुधाच्या नमुन्यावर प्रयोगशाळेत प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी (Antibiotic Sensitivity Test) करून योग्य प्रतीजैविकांची मात्रा दिल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. उपचारावरील खर्चात बचत होते.
प्रतिबंध
- जनावरांची कास व दूध काढणाऱ्याचे हात दोहनापुर्वी व नंतर जंतूनाशकाने धुवून घ्यावेत.
- गोठ्याची जमीन नियमितपणे स्वच्छ करावी.
- निर्जंतुक न केलेल्या वस्तू सडामध्ये घालू नयेत.
- सडावरील जखम/फोडाकडे दुर्लक्ष करू नये.
- दुधाची नियमित तपासणी करून घ्यावी.
- दूध काढण्यासाठी ‘पूर्ण मूठ पद्धतीचा’ वापर करावा.
- दूध काढल्यानंतर किमान अर्धा तास जनावरास खाली बसू देऊ नये.
- दूध काढणीनंतर सडे जंतूनाशक द्रावणात बुडवून घ्यावेत.
- कास किंवा सडास इजा पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी.
- मिल्किंग मशिनचे कप स्वच्छ आणि निर्वात दाब योग्य प्रमाणात असावा.
लक्षणे
सुप्त कासदाह
सुप्त कासदाहात शक्यतो कोणतीही दृष्य लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र दूध किंचित घट्ट होणे, दुधाचे प्रमाण कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. दुधातील सोमाटिक पेशीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते. दुधाचा सामू वाढतो.
दृष्य कासदाह
- कास गरम लागते, कासेवर सूज येते, कडकपणा जाणवतो, कास व सडे लालसर दिसतात. वेदनेमुळे जनावरे कासेला हात लावू देत नाहीत.
- दुधामध्ये गाठी आणि चकत्या होतात. दूध दह्यासारखे दिसते. दूध पाण्यासारखे पाताळ किंवा पिवळसर चिकट स्त्रावासारखे येते. रक्तमिश्रित लालसर किंवा पिवळसर रंगाचे दूध, पू मिश्रित दूध येते.
- शारीरिक तापमानात वाढ होते, जनावरे चारा खात नाहीत, डोळे खोल जातात, कासेतील वेदनेमुळे जनावराची हालचाल मंदावते.
निदान
लक्षणांवरून
- स्ट्रिप कप चाचणी
- कॅलिफोर्निया सुप्त कासदाह चाचणी
- प्रयोगशाळेत बाधित जनावरांच्या दुधातील जिवाणूंचे विलगीकरण करून ओळख करणे.
दुधाचा नमुना गोळा करण्याची पद्धत
- दूध तपासणीसाठी दुधाचा नमुना गोळा करताना सडातील दोन ते तीन धारा काढून टाकाव्यात.त्यानंतर निर्जंतुक सिरींजचे मागील पिस्टन काढून त्यात पाच मिलि दूध घ्यावे.
- दूध घेताना हवेचा संपर्क कमीत कमी असावा. नमुना कमीत कमी वेळात घ्यावा. इतर कोणत्याही निर्जंतुक न केलेल्या तसेच औषधांच्या बाटल्यांमध्ये नमुने गोळा करू नयेत.
- दूध सिरींजमध्ये घेतल्यानंतर पिस्टन पूर्ववत लावावा. हा नमुना आवश्यक माहितीसह बर्फावर ठेऊन चार ते सहा तासांत प्रयोगशाळेत पाठवावा.
- बाधित जनावरांना प्रतिजैविके देण्याआधी नमुना गोळा करणे आवश्यक आहे. प्रतिजैविके दिलेली असल्यास उपचार बंद केल्याच्या किमान तीन दिवसांनंतर नमुना गोळा करणे योग्य ठरते.
नमुन्यासोबत पाठविण्याची माहिती
- पशुपालकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्र., नमुना घेतल्याची दिनांक/वेळ
- प्राण्याचा ओळख क्र./खूण, जनावराचा प्रकार, वय, वेत
- आजाराचा पूर्व इतिहास, दिलेली प्रतिजैविक औषधे
संपर्क ः डॉ. महेश कुलकर्णी, ९४२२६५४४७०
डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९
(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
- 1 of 33
- ››