माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल

माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल
माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल

नातेपुते, जि. सोलापूर (प्रतिनिधी)  : देव गुज सांगे पंढरीसी यारे। प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें।। कायावाचामनें दृढ धरा जीवीं।  सर्व मी चालवी भार त्यांचा।। असे विठ्ठल-वारकरी प्रेमांचे आर्त प्रगट करणारे दिंड्यामधून गायले जाणारे अभंग... डौलाने फडकणाऱ्या पताका... डोळ्यांचे पारणे फेडणारी रथावरील आकर्षक फुलांची सजावट... माउली माउली नामांचा अखंड जयघोष व समीप आलेल्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवत श्रीसंत शिरोमणी ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी (ता. १७) सातारा जिल्ह्यातून धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.

सातारा जिल्ह्यातून हजारो वैष्णवांसह सकाळी १०.२० वाजता माउलींच्या नगाऱ्यांच्या पाठोपाठ माउलींच्या व स्वारांच्या अश्वांचे आगमन झाले. या वेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. दिंड्यापाठोपाठ १०.५० वाजता माउलींच्या रथांचे आगमन झाले. या वेळी जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरीजवळ स्वागतासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, दीपाली भोसले, जिल्हा पोलिस प्रमुख वीरेश प्रभू, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी माउलींचे पूजन करून स्वागत केले. या वेळी पालखी सोहळ्यांचे मालक बाळासाहेब आरफळकर, विश्वस्त, चोपदार राजाभाऊ, रामभाऊ, बाळासाहेब यांचा सन्मान करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख मिलिंद मोहिते, सहायक जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे, आमदार हणुमंतराव डोळस, भाजप नेते उत्तमराव जानकर, तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, खासदार संजय जाधव, फलटणचे तहसीलदार विजय पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते.  

टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. अत्यंत शिस्तबद्धतेने वारकरी आपापल्या दिंडीत भजन करत पुढे मार्गस्थ होत होते. एका वेगळ्याच उत्साहाने वातावरण भारून गेले होते. दुपारचे भोजन उरकून पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ होणार आहे.

दहा जिल्ह्यांतील कलापथकांकडून प्रबोधन स्वागत समारंभानंतर आरोग्य खात्याने या वर्षी सुरू केलेल्या मोटार सायकलवरील आरोग्य दूत या मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी ८.३० पासून माउलींच्या आगमनापर्यंत राज्यांतील १० जिल्ह्यांतील ११ कलापथकांनी पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी हा संदेश घेऊन मान्यवरांच्या समोर आपली प्रबोधनात्मक कला सादर केली. या पथकांतील ७० कलाकारांनी शिक्षणांचे महत्त्व सांगून मुलीची भावी जोडीदाराबद्दलची अपेक्षा पथनाट्याद्वारे सादर केली. दुपारचे जेवण धर्मपुरी बंगला येथे झाले. या वेळी आळंदी देवस्थानने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना महाप्रसाद दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com