गव्हावर मावा किडीचा प्रादुर्भाव

गव्हावर मावा
गव्हावर मावा

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या काही गावांमधील गहू पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांसह कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी त्वरित प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांना नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले.  गंगापूर तालुक्‍यातील लांझी, गोलवाडी, वडगाव, पाटोदा आणि परिसरातील इतरही काही गावांमधील पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कळविले. कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांसह कृषी अधिकाऱ्यांनी शेतांवर जाऊन केलेल्या पाहणीत हा प्रादुर्भाव जवळपास शंभर एकरांतील गव्हाच्या पिकावर असल्याचे लक्षात आले. गंगापूरचे तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्‍के व कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ व प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी लागलीच लांजी येथील प्रादुर्भावग्रस्त शेताची पाहणी केली. साधारणपणे सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये पेरणी झालेल्या गव्हात हा प्रादुर्भाव आढळून आला नाही. परंतु नोव्हेंबरमध्ये पेरणी झालेल्या गव्हावर हा प्रादुर्भाव आढळून आल्याची माहिती डॉ. झाडे यांनी दिली. एक महिन्यापेक्षा जास्त काळ लांबलेली थंडी, सातत्याने राहिलेली तापमानातील घट यामुळे हा प्रादुर्भाव झाल्याचे ते म्हणाले.  माव्याच्या प्रादुर्भावामुळे गव्हाच्या पानातील शोषले गेलेले हरितद्रव्य व थांबलेली अन्नप्रक्रिया यामुळे गव्हाची ओंबी बाहेर येऊन दाणे भरण्याच्या प्रक्रियेवरच परिणाम झाला. त्यामुळे काही ठिकाणी उत्पादनात ३० ते ४० टक्‍के परिणाम होण्याची शक्‍यता आहे. कडुनिंबावर आधारित कीटकनाशक शिफारशीनुसार किंवा क्‍लोरपायरिफॉस २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्लाही डॉ. झाडे यांनी दिला. गव्हासाठी खतांचा वापर, कमी पाण्यात उत्पादन कसे घेता येईल याविषयीही त्यांनी माहिती दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com