सोलापूर ‘झेडपी’त भाजपविरोधात ‘मविआ’ पुन्हा रिंगणात

 'Mavia' again in the ring against BJP in Solapur 'ZP'
'Mavia' again in the ring against BJP in Solapur 'ZP'

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद भाजपच्या समविचारी आघाडीने मिळवले. त्यानंतर येत्या मंगळवारी (ता. १४) जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापती निवडी होणार आहेत. त्यात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, आता पुन्हा महाविकास आघाडी भाजप समविचारी आघाडीच्या विरोधात रिंगणात उतरणार आहे. त्यासाठी नुकतीच शिवसेना वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची यासंदर्भात बैठक झाली. त्यात सभापतीच्या पदवाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. पण, आता महाविकास आघाडीला यश मिळते की पुन्हा अपयश हे लवकरच ठरणार आहे. 

मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडेल. भाजप समविचारी आघाडीनेही नुकतीच बैठक घेऊन पुन्हा एकदा आपली तयारी पूर्ण केल्यानंतर आता महाविकास आघाडीनेही बैठक घेतली. त्यात आमदार भारत भालके, माजी आमदार गणपतराव देशमुख, राजन पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे ही नेतेमंडळी उपस्थित होती. 

जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. त्यापैकी चार सदस्य करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत. या चारही सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजप व समविचारींची साथ घेऊन अध्यक्षपद आपल्याकडे घेतले. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शिवसेना सदस्य अमर पाटील हे कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहिले आहेत. उपाध्यक्ष निवडीत करमाळ्याचे शिवसेना सदस्य नीलकंठ देशमुख यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रांत पाटील यांना मतदान केले.

शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य भाजपसोबत आहेत. शिवसेनेचे नेतेच आपल्यासोबत आहेत ही बाब कॉँग्रेस-राष्ट्रवादी व शेकापच्या पक्की लक्षात आल्यानंतर त्यांनी या बैठकीपासून शिवसेना नेत्यांना बाजूलाच ठेवले. पण पुन्हा एकदा जोर लावून महाविकास आघाडी भाजप समविचारी आघाडीला लढत देण्यासाठी रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे कोणाच्या पदरात काय पडणार, हे मंगळवारीच स्पष्ट होईल.

सभापतिपदाची नावे उद्या कळणार

जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण अशा चार विषय समित्या आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेस, शेकापला प्रत्येकी एक असे या समितीचे सभापतिपद देण्याचे या बैठकीत ठरले. त्यानुसार याच फॉर्म्युल्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. पण, यासाठी कोणाची नावे ठरवायची, याची जबाबदारी त्या-त्या पक्षाच्या श्रेष्ठींवर सोपवण्यात आली आहे. सोमवारपर्यंत ही नावे सांगण्यात येतील, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com