कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची सुविधा

कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची सुविधा
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची सुविधा

मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने राज्याने हाती घेतलेल्या कॉटन मिशनमध्ये ‘एमसीएक्‍स’ने सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांना कापूस साठवणूक करण्याच्या दृष्टीने मल्टी कमोडिटी एक्‍स्जेंचने (एमसीएक्‍स) विदर्भात गोदामे उपलब्ध केली आहेत. कॉटन मिशनअंतर्गत ‘एमसीएक्‍स’ने राज्य सरकारशी सामंजस्य करार केला असून, यात आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा येथे नव्याने कापूस साठवणूक केंद्रे सुरू केली आहेत.  ‘एमसीएक्‍स’च्या मंचावर गुंतवणूकदारांना ‘कॉटन फ्युचर्स’चा पर्याय उपलब्ध आहे. राज्याचा कृषी विभाग आणि महाराष्ट्र स्टेट वेअरहाउस कॉर्पोरेशन यांच्यासोबत ‘एमसीएक्‍स’ने करार केला असून कापूस उत्पादक क्षेत्र असलेल्या विदर्भात कापूस साठवणूक केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये शेतकऱ्यांनी २३ हजार ३०० कापसाच्या गाठी जमा केल्या आहेत. ‘एमसीएक्‍स’च्या भारतातील केंद्रांमध्ये ६ फेब्रुवारीअखेर तब्बल एक लाख ६ हजार ३०० कापसाच्या गाठी साठवणूक केल्या आहेत. ‘एमसीएक्‍स’ने आतापर्यंत ९० शेतकरी गटांना जोडून घेतले आहे. यामुळे जवळपास ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कापूस उत्पादकांना सक्षम करण्यासाठी विदर्भात त्यांना पायाभूत सेवा सुविधा आणि बाजारांशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यात ‘एमसीएक्‍स’चे यापुढेही सहकार्य राहील, असा आशावाद राज्य कापूस महामंडळाचे सचिव एन. नवीन सोना यांनी सांगितले.  शेतकऱ्यांना पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी ‘एमसीएक्‍स कटिबद्ध आहे. मालाची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने तेजीमध्ये शेतमालाची विक्री करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होईल, असे ‘एमसीएक्‍स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांजपे यांनी सांगितले. पायाभूत सुविधा, बाजाराविषयी प्रबोधन, बाजारपेठांशी जोडणे आणि सुरळीत पत पुरवठा उपलब्ध केल्यास कापूस उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्‍वास परांजपे यांनी व्यक्त केला. यामुळे शाश्‍वत शेतीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com