जनावरांमध्ये ताणाची तीव्रता मोजण्यासाठी तापमान-आर्द्रता निर्देशांक

तापमान - अार्द्रता निर्देशांकामुळे जनावारांतील तणावाचे मापन करता येते.
तापमान - अार्द्रता निर्देशांकामुळे जनावारांतील तणावाचे मापन करता येते.

उन्हाळ्यातील वाढते तापमान अाणि आर्द्रतेमुळे जनावरांमध्ये येणाऱ्या एकत्रित तणावाचे मूल्यमापन अगदी सोप्या पद्धतीने जनावरांच्या गोठ्यातच केले जाऊ शकते. त्यामुळे वेळीच उपाययोजना करता येतात अाणि जनावरांचे तणावापासून संरक्षण करता येते.   वाढत्या तापमानाचा गोठ्यातील सूक्ष्म वातावरणावर विपरीत परिणाम होऊन जनावरांमध्ये ताण येतो. त्यामुळे जनावराची उत्पादन क्षमता, प्रजनन क्षमता आणि उत्पादनाची गुणवत्ताही कमी होते अाणि मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तापमान-आर्द्रता निर्देशांक तपासून जनावरातील येणाऱ्या ताणावर योग्य त्या उपाययोजना करता येतात. तापमान-आर्द्रता निर्देशांक

  • तापमान-आर्द्रता निर्देशांक हा जनावरांवर उष्णता आणि आर्द्रता यांच्या एकत्रित प्रभावाची तीव्रता मोजण्याचे किंवा जाणून घेण्याचे एक प्रभावी मापक आहे. यालाच इंग्रजीमध्ये टेंपरेचटर ह्युमिडीटी इंडेक्स (Temperature-Humidity Index (THI)) असेही म्हणतात.
  • निर्देशांक गोठ्यातील तापमान दोन वेगवेगळ्या पद्धतीने (तापमान अ आणि तापमान ब) मोजून मिळवता येतो. या दोन्ही तापमानाच्या संख्या एक सूत्रात टाकून मिळालेल्या संख्येवरून तापमान-आर्द्रता निर्देशांक मिळवता येतो व जनावारामधील तणावाचे मापन केले जाऊ शकते.
  • १) तापमान अ (अंश सेल्सिअस मध्ये) : दैनंदिन उपयोगातील साध्या तापमापकाच्या सहाय्याने नोंदविलेले गोठ्यातील तापमान (कोरड्या तापमापकाने नोंदविलेले तापमान). २) तापमान ब (अंश सेल्सिअसमध्ये) : दैनंदिन उपयोगातील साध्या तापमापकाच्या मर्क्युरी बल्बला ओले कापड किंवा ओला कापूस लावून नोंदविलेले गोठ्यातील तापमान (ओल्या तापमापकाने नोंदविलेले तापमान). तापमान-आर्द्रता निर्देशांकाचे मापन वरील नोंदविलेल्या तापमान अ व तापमान ब च्या संख्या खालील सूत्रात टाकून मिळालेल्या उत्तरावरून जनावरामधील तापमान व आर्द्रता यांच्यामुळे होणाऱ्या तणावाचे अध्ययन करता येते. सूत्र : तापमान - आर्द्रता निर्देशांक = (तापमान अ) + (०.३६ x तापमान ब) + ४१.२

  • वरील सूत्राचा उपयोग करून मिळालेल्या उत्तरावरून जनावरांमधील तणावाची परीक्षा केली जाते. मिळालेली संख्या ही ७० किंवा त्यापेक्षा कमी असले, तर गोठ्यातील वातावरण योग्य असून, जनावरांवर त्याचा ताण नाही, असे समजावे.
  • मिळवलेली संख्या जर ७१ ते ७५ यामध्ये असेल, तर गोठ्यातील जनावरे ही अत्यल्प (अगदी कमी) तणावात आहेत, असे समजावे, जर मिळालेली संख्या ही ७६ ते ८० या दरम्यान असेल, तर गोठ्यातील जनावरे ही मध्यम तणावात असून, उपाययोजनांची गरज आहे, असे समजावे. तसेच, जर ही संख्या ८१ ते ८५ या दरम्यान असेल, तर जनावरे ही तीव्र तणावात असून, तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे, असे समजावे.
  • जनावरांमधील तणावाची लक्षणे व उपाययोजना तापमान- आर्द्रता निर्देशांक (THI) ः ७० पेक्षा कमी तणावाची तीव्रता ः  नगण्य लक्षणे

  • निरोगी व चमकदार त्वचा दिसून येते.
  • श्वसन दर सामान्य असतो.
  • जनावरे सतर्क दिसतात आणि स्पर्शास प्रतिसाद देतात.
  • निरोगी जनावरामध्ये चांगली भूक असते व ते मनसोक्त आहार घेतात.
  • लघवी सामान्य, फिकट पिवळ्या रंगाची असते.
  • आवश्यक उपाययोजना नियमित वैज्ञानिक व्यवस्थापन पुरेसे आहे.

    तापमान- आर्द्रता निर्देशांक (THI) ः  ७१ ते ७५ तणावाची तीव्रता ः  अत्यल्प लक्षणे

  • सावलीचा शोध घेणे.
  • काही प्रमाणात श्वसन दर वाढणे.
  • काही प्रमाणात घाम येणे.
  • थोड्या प्रमाणात आहार मंदावणे.
  • लघवी पिवळ्या रंगाची असते. 
  • आवश्यक उपाययोजना

  • योग्य प्रमाणात हिरवा व कोरडा चारा द्या.
  • पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता असावी.
  • गोठ्यामध्ये पुरेशा सावलीची सोय असावी.
  • तापमान- आर्द्रता निर्देशांक (THI) ः  ७६ ते ८० तणावाची तीव्रता ः  मध्यम लक्षणे

  • आहार कमी होणे.
  • हालचाल कमी होणे.
  • सावली किंवा हवेशीर जागा शोधली जाते.
  • श्वसन दर वाढणे.
  • जास्त घाम येणे.
  • जास्त तहान लागणे.
  • लघवी गर्द पिवळ्या रंगाची असते.
  • दुग्ध उत्पादनात घट होते (२० - ३० टक्के)
  • दुधाची गुणवत्ता घसरणे(स्निग्ध व प्रथिनांचे प्रमाण कमी होते.) 
  • स्वच्छ. थंड पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावे (शरीराचे तपमान सामान्य मर्यादेत ठेवण्यास मदत होईल).
  • शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी मिठाचे चाटण द्यावे.
  • सावली पुरवता येते, परंतु उष्ण वारे रोखता येत नाही. त्यासाठी गोठ्याच्या छपरावर पाण्याचा फवारा मारावा.
  • गोठ्यात हवेच्या नियमनासाठी खिडक्यांची व्यवस्था असावी.
  • दोन्ही शिंगाच्यामध्ये ओल कापड ठेवाव व त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे.
  • भिंती ताट्ट्याच्या असतील, तर त्यावरसुद्धा पाणी शिंपडावे.
  • जनावरांच्या शरीरावर पाणी शिंपडावे.
  • स्थानिक पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
  • तापमान- आर्द्रता निर्देशांक (THI) ः  ८१ ते ८५  तणावाची तीव्रता ः  तीव्र लक्षणे

  • जनावरे सावलीची जागा शोधतात.
  • जनावर कायम उभे राहते खाली बसत नाही.
  • श्वसनास त्रास होणे व उघड्या तोंडाने श्‍वास घेणे.
  • जास्त घाम येणे व लाळ गळणे त्यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होते.
  • अस्वस्थता वाढते.
  • वजन कमी होणे.
  • वारंवार तहान लागणे.
  • दूध उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट होते.
  • दुधाची गुणवत्ता घसरणे (स्निग्ध अाणि प्रथिनांचे प्रमाण कमी होते, तसेच दैहिक पेशींची दुधातील संख्या वाढून दूध पिण्यास अयोग्य बनवते).
  • कासदाह होण्याचा धोका वाढतो. 
  • वेळीच उपाययोजना न केल्यास जनावर दगावण्याचीसुद्धा भीती असते.
  • आवश्यक उपाययोजना मध्यम ताणासाठी दिलेल्या उपाययोजना कराव्यात. संपर्क : डॉ. वैभव सानप, ९४५५१४८१७२ (भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर, उत्तर प्रदेश)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com