तापावर गुणकारी गुळवेल

Heart-leaved moonseed 
Heart-leaved moonseed 

जळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या तक्रारी लहान असल्या तरी आरोग्य बिघडवणाऱ्या असतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता महिलांनी गुळवेलीचे महत्त्व जाणून घेऊन उपयोग करावा. गुळवेल ही हृदयाचा आकार असणारी, हिरवीगार पानांची, एखाद्या वृक्षाच्या आधारे चढणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. परसदारात किंवा तारेच्या कुंपनावरही हा वेल उत्तम पद्धतीने वाढतो. गुळवेलचे काड आणि पाने उपयुक्त असतात. गुळवेली ही वनस्पती तापामध्ये अतिशय उपयुक्त आहे. विशेषतः थंडी ताप, जुनाट ताप, वारंवार येणारा ताप, कडकी या सर्व लक्षणांत गुळवेल उत्तम कार्य करते. त्यासाठी गुळवेलीच्या काडाचा छोटा तुकडा, सुंठ आणि नागरमोथा यांचा दोन कप पाण्यात उकळून काढा घेतल्यास फायदा होतो. जीर्णज्वर, कडकी यासाठी गुळवेलीपासून तयार केलेली संशमनी वटी नावाचे औषध उपलब्ध असते. या गोळ्या योग्य त्या मात्रेत घेतल्यास कडकी कमी होते. वारंवार ताप येणे थांबते.

  • गुळवेलीपासून गुळवेल सत्त्व तयार करतात. उष्णता कमी करण्यासाठी, जुनाट ताप कमी करण्यासाठी गुळवेल सत्त्व जरुर पोटात घ्यावे. गुळवेल सत्त्व तयार करायची कृती पण सोपी असते. गुळवेलीचे छोटे तुकडे ठेचून त्यात पाणी घालून भीजत ठेवावे. १० - १२ तासांनी चांगले भिजले की हाताने कुस्कुरून रवीने घुसळावे. पाणी गाळून घेऊन उन्हात ठेवल्यास पाणी उडून सत्त्व तळाशी बसते. पण या कृतीसाठी घुळवेल भरपूर प्रमाणात असावी लागते.  
  • क्षय, दौर्बल्य, बारीक ताप यासाठी सत्त्व लोणी खडीसाखरेसह रोज घ्यावे. उपयोग होतो.  
  • थंडीच्या दिवसात सांधे आखडणे, दुखणे, अशा तक्रारी हमखास आढळतात. अशावेळी गुळवेल आणि सुंठ पावडर पाण्यात उकळून काढा करून घ्यावा.  
  • बऱ्याचदा टायफॉईड, मलेरिया अशा तापानंतर खूप थकवा आणि हातापायाची जळजळ होते. डोळ्यांची आग होते. ताप नसतो, पण रुग्णांना मात्र गरम असण्याची भवना असते. अशा लक्षणांकडे महिलावर्गाचे दुर्लक्ष होते. पण असे न करता गुळवेल सत्त्व तूप साखरेसह सुरू करावे. ज्यामुळे उष्णता कमी होते आणि ताकद वाढते.  
  • गुळवेलीपासून सत्त्व काढा तयार करणे शक्य नसल्यास संशमनी वटी, गुडुची घन, गुळवेल सत्त्व, गुडुच्यादी धृत या नावाने बरीचशी औषधे उपलब्ध आहेत, त्यांचा योग्य वैद्यांचा सल्ला घेऊन उपयोग करावा.
  • टीपः  वरील कोणतेही उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.

    संपर्कः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com