Meeting the aspirations of the people: Uddhav Thackeray
Meeting the aspirations of the people: Uddhav Thackeray

जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करणार ः उद्धव ठाकरे

नागपूर ः मला राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करायचे आहे, त्यादृष्टीने आमची पावले पडत आहेत. लवकरात लवकर यासंदर्भातील निर्णय करुन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

जनतेला दिलेली सर्व आश्वासने आमचे सरकार पूर्ण करणार आहे. आम्ही वचन पाळणारी लोकं आहोत ती तोडणारी नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. १५) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी ही परिषद पार पडली. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की आमच्या सरकारचा शपथविधी होऊन १५ दिवसांचा काळ झाला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री म्हणून आमची उद्यापासून कारकीर्द सुरू होत आहे. राज्याची उपराजधानी नागपूर येथून आमच्या कारकीर्दीला सुरुवात होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मला राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करायचे आहे, त्यादृष्टीने आमची पावले पडत आहेत. लवकरात लवकर यासंदर्भातील निर्णय करुन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

चहापानावर बहिष्कार टाकायला नको होता माझी अपेक्षा होती प्रथा चहापानाची आहे, पण बहिष्काराची प्रथा सुरू झाली आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. ते पुढे म्हणाले, आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान चहावाले होते, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आजच्या दिवशी तरी चहापानावर बहिष्कार टाकायला नको होता, अशी मिश्कील टिप्पण्णीही त्यांनी केली. 

स्मारकात घोटाळा केल्यास कारवाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात कुणी गडबड घोटाळा केला असेल तर ते अत्यंत गंभीर आणि निंदाजनक आहे. आमच्याकडेही यासंदर्भातील तक्रारी आलेल्या आहेत. या प्रकरणी माहिती घेऊ, संपूर्ण चौकशी करु आणि दोषींवर कारवाई करू असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 

सावरकर यांच्याबद्दल आमची भूमिका कायम सावरकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, आमच्या सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत. आम्ही भिन्न विचारधारेचे लोक एकत्र आलो आहोत. सावरकर यांच्याबद्दल आमची भूमिका कायम आहे. सरकार म्हणून एकत्र येताना आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. पक्ष म्हणून आमच्यात मतभिन्नता भूमिका असू शकतात. पण आम्ही सरकार म्हणून एक आहोत, अशा शब्दात सावरकर यांच्यावरुन भाजपने सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रश्वावर मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्यूत्तर दिले. 

सावरकरांना भारतरत्न देण्याबद्दल भूमिका घ्यावी देशातील परिस्थिती भाजपच्या हाताबाहेर गेली आहे. त्याचमुळे लोकांना चिंतेत ठेवायचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. उलट, सावरकरांना सिंधु नदीपासून देश एकत्र राहावा असे अभिप्रेत होते. पण त्याऐवजी देशात अस्वस्थता निर्माण केली जात आहे. सत्तेसाठी आम्ही आमची मते बदलली असे भाजपला वाटते तर त्यांचा अधिकार आहे, मग आता सावरकरांना भारतरत्न देण्याबद्दल भाजपने भूमिका घ्यावी, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. सावरकरांना मानत असाल तर पंतप्रधानांनी त्या देशातील राज्यकर्त्यांना ठणकावून सांगायला हवे होते, ते न करता त्या देशातील अल्पसंख्याकांना असुरक्षित केले जात आहे. 

मुंबई मेट्रोचे काम पुढील आठवड्यात सुरू तसेच फडणवीस सरकारच्या कोणत्याही विकासकामाला स्थगिती दिलेली नाही हे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करायची नाही का असा सवालही केला. ते म्हणाले, मुंबई मेट्रोचे काम पुढील आठवड्यात सुरू होत आहे. केवळ कारशेडला स्थगिती दिलेली आहे. 

आमचा कार्यकाळ पाच वर्षांचा राज्याच्या तिजोरीची चावी आता आमच्याकडे आली आहे, ती अजून उघडून बघितलेली नाही, पण जनतेला दिलेली सर्व आश्वासने आमचे सरकार पूर्ण करणार आहे. आम्ही वचन पाळणारी लोकं आहोत ती तोडणारी नाही असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात भाजपला लगावला. तसेच सहा दिवसांचे अधिवेशन असले तरी आमचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे, असेही त्यांनी अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याच्या टीकेला उत्तर दिले. 

चहा पानाला मित्र आले नसल्याची खंत ः जयंत पाटील त्याआधी मंत्री जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर मध्ये आलो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा हा पहिला चहापान होता. विरोधकांना यानिमित्ताने चांगली सुरवात करता आली असती. मात्र, मागच्या गोष्टींवर बोट ठेवत आमचे मित्र चहा पानाला आले नाहीत, असे सांगत त्यांनी त्याबद्दल खंत व्यक्त केली.  पत्रकार परिषदेला मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com